मार्गशीर्ष महिन्याचे अध्यात्मिक महत्त्व..!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 05:38 AM2019-11-28T05:38:34+5:302019-11-28T05:41:03+5:30
भगवद््गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, ‘मासानां मार्गशीर्षोहं’. महिन्यांमध्ये मार्गशीर्ष हे माझे स्वरूप आहे.
- शैलजा शेवडे
भगवद््गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, ‘मासानां मार्गशीर्षोहं’. महिन्यांमध्ये मार्गशीर्ष हे माझे स्वरूप आहे. अत्यंत पवित्र महिना. श्रद्धेने, भक्तीने, चांगली कामे करावीत. सतत भगवंताचे स्मरण करावे. भक्ती कशी करावी, तर यथा व्रजगोपिकानां... कृष्णाचे रूपलावण्य अद्वितीय होते... गोकुळाला त्याच्या लावण्याने, वेणुवादनाने वेड लावले होते... मुरलीची धून आली कानी, मनमोहना भेटण्या झाले अधीर मनी... अशी स्थिती गोपिकांची व्हायची. अशाच एकदा कामधाम विसरून कृष्णाला भेटायला सर्व जणी आल्या. कृष्णाने त्यांना घरी जायला सांगितले. त्या दु:खी झाल्या. म्हणू लागल्या-
तोडून साऱ्या संसारपाशा,
आलो इथे रे, आम्ही श्रीहरी। का सांगसी निष्ठुरा, प्राणनाथा, परतून जाण्या, आम्हाला घरी?
तुझे रूप, चित्तास मोहिनी घाली, मना खेचते रे, तुझी बासरी, गोपस्त्रिया आम्ही, नादावलो रे, वसे तूच रे तू, आम्हां अंतरी
तुझ्याविण ते कोण प्रेमास पात्र? हृदयी वसे रे, तू एक मात्र,
जखडलो तुजपाशी आम्ही, कसला दिस, कसली रात्र?
नको दूर लोटू, मुरलीधरा रे, जाणून घे तू, या भावना रे,
ना ऐकती पावले आमुची ही, माघारी जाऊ कशा रे?
वा दग्ध होऊ विरहाग्नि आम्ही, देहास या आणि, त्यागून देऊ, लावून ध्यान, तुझ्या पावलांशी,
तुझ्यातच, चिर-मीलित होऊ। कृष्णा, मनमोहना रे, सखा,
वल्लभा तूच, अमुचा पती,
तुजविण आम्हां नाही गती रे,
तुजविण आम्हां नाही गती।
हे परमेशा, आमच्या मनात अशी भक्ती निर्माण कर;
रुजू दे हृदयी, ईश्वरा, उत्कट तव भक्ती,
अमृतमय आनंद देती जे, मिळो मैत्र संगती
स्मरण, कीर्तन परमात्म्याचे, तोच सदा चित्ती,
भुवनमंगल परमेशा रे, नको मोक्षमुक्ती...