ज्ञान-विज्ञानातील भाव समजावणारा श्रीगणेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 07:57 AM2019-09-02T07:57:23+5:302019-09-02T07:59:25+5:30
भगवान श्रीगणेश मंगलदायक व सुखदायक आहेत. श्रीगणेश विद्यादाता आहेत.
भगवान श्रीगणेश मंगलदायक व सुखदायक आहेत. श्रीगणेश विद्यादाता आहेत. मानवाचे जीवन सुखी व संपन्न करण्यासाठी विद्या आवश्यक आहे आणि त्याच विद्येचे दैवत म्हणून श्रीगणेशाकडे पाहिले जाते. विद्या म्हणजे ज्ञान. ज्ञानाने अज्ञान दूर होते. ज्ञानी माणूस आत्मतृप्त होतो ते ज्ञान आध्यात्मिक आहे. आध्यात्मिक ज्ञान साक्षात ईश्वराची वाङ्मय मूर्ती आहे. श्री गणेशाची वाङ्मय मूर्तीचे स्वरूप पाहूया. श्रीगणेशाला चार हात आहेत. त्यापैकी एका हातात परशू आहे. परशू हे अस्त्र आहे. परशूने श्रीगणेश चुकीच्या कल्पनांचा छेद करून मनुष्याला सन्मार्गावर नेण्याचे काम करतो. एका हातात मोदक आहे. मोदक हे गोड खाद्य आहे. मोदक सेवनाने आनंद मिळतो. मोदक तात्त्विक विचारांचे खाद्य आहे. तात्त्विक विचार मनुष्याला आत्मिक आनंद देतात. श्रीगणेशाच्या हातात अकुंश आहे. परशूप्रमाणे अंकुश हेही शस्त्र आहे. अंकुशाने श्रीगणेश चांगल्या-वाईटाची निवड करतात. अंकुशरूपी विवेकाने योग्य-अयोग्याची निवड करता येते. त्यामुळे जीवनाच्या यशस्वी मार्गावर वाटचाल करता येते. विवेक हा आपल्या जीवनाचा मूळ पाया असला पाहिजे. अंकुशरूपी विवेकाने श्रीगणेशची नजर आपल्या भक्तांवर राहाते. आपल्या भक्ताला तो वाईट मार्गाला जाऊ देत नाही.
श्रीगणेश हे शब्दब्रह्माचे रूप आहे. ध्वनी आणि वाणी हे शब्दरूपाने प्रकटतात. शब्दांची निवड करूनच आपले जीवन पार पडत असते. शब्दानेच आपण व्यवहार करतो. तसेच आपल्या भाव-भावना शब्दानेच प्रकट करतो. श्रीगणेश आपल्याला अभय देतो. जो आशीर्वादरूपी हात आहे तो हात आपल्या भक्तांच्या मनातील भीती घालवतो. सर्व कार्याचा आरंभ करणारा, सर्व कार्याचा आधार असणारा, श्रीगणेश आशीर्वाद देतो. तो करुणासिंधू आहे. आपल्या बुद्धीला प्रकाश देणारा श्रीगणेश. भक्तांच्या सर्व इच्छा, वासना व मनोरथ पूर्ण करणारा देव आहे. श्रीगणेशच्या रूपाला तुलना नाही एवढे ते अपूर्व व अलौकिक रूप आहे. त्या श्रीगणेशाचा नामोच्चार, त्याचे केवळ चिंतन आणि मनन भक्ताला वेडे करणारे आहे. सर्व विश्वाला व्यापू शकणारा श्रीगणेश आपल्या पोटात विश्व साठवतो. जगाची निर्मिती व पूर्ण ब्रह्मांड गणेशाच्या पोटात आहे. गणेशाचे पोट त्यामुळेच मोठे आहे. गणेशाचे वाहन मयूरपण आहे. संपूर्ण पृथ्वी, पाताळ व स्वर्ग आपल्या एका सोंडेने व्यापून टाकणारा श्रीगणेश आहे. विश्वमय असलेल्या गणेशाने भव्य व विशाल रूप धारण करून भक्तांचे रक्षण केले आहे.
श्रीगणेशाचा पराक्रम अलौकिक व सर्वश्रेष्ठ आहे, तो प्रसिद्ध आहे. श्रीगणेश दीन, आर्त व दु:खीजनांचा आश्रयदाता आहे. श्रीगणेश पंचप्राणांचा स्वामी आहे. श्रीगणेश शिव-शक्तीचा आवडता व लाडका आहे. सर्व विश्वाचा विकास करणारा, प्रकाशित करणारा व मार्गदर्शन करणारा आहे.
श्रीगणेश प्रणवस्वरूप आहे. प्रणवस्वरूपाने मंगलध्वनी प्रकट होतात. संपूर्ण विश्वाचा जनक श्रीगणेश आहे. ग, ण, ई, श ही अक्षरे नाहीत, तर त्या अक्षरांचा ध्वनी, वर्ण व रूप या सृष्टीचे मूळतत्त्व आहे. श्रीगणेशाचे लहान डोळे प्रकाशमान व तेजस्वी आहेत. ती दृष्टी अधांग व विशाल आहे. त्या बारीक नजरेने तो भक्तांचे रक्षण करतो. शत्रूंचा नाश करतो. भक्तांवर एकदा नजर टाकली की त्यांना स्फूर्ती व प्रेरणा मिळते. श्रीगणेशाला जास्वंदीचे फूल वाहिले जाते. त्यामुळे सजीवतेचा अनुभव घेणारे मन प्रसन्न होते. श्रीगणेशाला जांभूळ हे फळ आवडते. गणेशाच्या बीजमंत्रात पाच देवतांचा वास आहे, ब्रह्मा, विष्णू, सूर्य, शिव-शक्ती. तुझ्या मंत्राचे अष्टांगे पठण करतात. श्रीगणेशाच्या मंत्रजपाने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. कपाळावर असणारा चंदनाचा टिळा, छातीवरचे जानवे व मस्तकावर शोभणारा चंद्र पाहिल्यास भक्ताला आपोआप बळ प्राप्त होते. चंदनाच्या टिळ्यातून शांत वास घरात राहातो. जानवे घातल्यांने वेदमंत्राची परवानगी मिळते. वेदाचे ज्ञान घेण्यात सामर्थ्यशाली आहे याची जाणीव ते देते. मस्तकावर शोभणारा चंद्र आत्मजाणिवा स्वच्छ कल्पना प्ररित करतो. सोंडेतून निघणारे जलस्राव सर्व कार्यांना प्ररित करते. मंदार वृक्ष-फूल गणेशाला प्रिय आहे. दूर्वा, शमीरंग गणेशाला वाहिल्याने मनाची काळजी मिटते. भक्तांना अखंड वरदान देणारा श्रीगणेशाचे मूषक वाहन उद्योगचे ज्ञान देणारे आहे. सोनेरी मुकूट विशाल दिव्यशक्तीचे कोठार आहे. पायातील पैंजण व त्याचा ध्वनी भक्तांना आकर्षित करणारा आहे. श्रीगणेशाचे विविध भक्त आहेत. ज्ञानी, योगी व उपासना करणारे भक्त आहेत. श्रीगणेशाच्या कृपेमुळेच मन, चित्त व आत्मा आनंदमय होतो. आत्मा चैतन्य आहे. त्याची ओळख श्रीगणेश करून देतो. ज्ञान-विज्ञान यातील नेमका भाव समजावतो. श्रीगणेश असामान्य व अलौकिक शक्तीस्वरूप आहे. गणेश कृपेमुळे मन व बुद्धीवर ताबा ठेवता येतो.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)