अध्यात्मिक : मोले घातले रडाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 03:00 AM2019-12-23T03:00:09+5:302019-12-23T03:00:20+5:30
मनुष्याचा पृथ्वीतलावरचा प्रवास संपला की त्याच्या गुणकर्मास आठवून इष्टमित्र व नातेवाइकांस
मनुष्याचा पृथ्वीतलावरचा प्रवास संपला की त्याच्या गुणकर्मास आठवून इष्टमित्र व नातेवाइकांस अश्रू अनावर होतात. हे स्वाभाविकही आहे. ज्याच्याबरोबर खेळलो, बागडलो, सुख-दु:खाचे अनेक प्रसंग वाटून घेतले तो आयुष्याचा साथीदार जर निघून गेला तर दु:खाचा बांध फुटतोच; परंतु ज्याचे कुणीच नाही, ज्याने जगताना सुख-दु:ख कधी वाटून घेतले नाही, कुणाच्या हाकेला कधी धावून गेला नाही अशा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर रडायचे कुणी? पण कुणीतरी गेल्यावर, कुणीतरी रडणे ही तर एक जगरहाटी आहे. म्हणून अशा एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर जर एखाद्या सहृदयीच्या वतीने दोन-चार लोकांना पाच-पन्नास रुपये दिले तर ते गेलेल्या व्यक्तीविषयी किती रडणार? ज्या व्यक्तीविषयी ज्यांच्या मनात माया व संवेदना नाही, त्या व्यक्तीसाठी भाडोत्री रडणारे त्याच्या गुणकर्माला आठवून रडत नाहीत तर केवळ पाच-पन्नास रुपयांच्या मजुरीपुरते रडतात. ज्याचा संबंध आंतरिक भाव-भक्तीचा प्रेममय जिव्हाळा व कोरडा भाडोत्रीपणा यांच्याशी जोडताना संत तुकोबाराय म्हणतात,
मोले घातले रडाया, नाही आसू अन् माया
तैसा भक्तिवाद काय, रंग बेगडीचा न्याय।
वेठी धरल्या दावी भाव, मागे पळावयाचा पाव ।
काजव्याच्या ज्योती, तुका म्हणे न जगे वाती ।
भक्तीच्या क्षेत्रात धूप, दीप, नैवेद्याचा सुकाळ दीपांची आरास व राजस सोहळ्याची बेगडी प्रवृत्ती असली तर त्या भक्ताची अवस्था मोलाने रडणाऱ्या संवेदनहीन माणसासारखी होते. तो हसतोही खोटे आणि बोलतोही खोटे. पण या खोट्यांच्या कपाळी गोटा मारण्याऐवजी त्यांच्याच भोवती अज्ञानी भक्तांची भाऊगर्दी होते. कधी नामगर्जनेच्या रूपाने, कधी प्रेमानंदाच्या उन्मादाने आज अनेक नवे कृष्णावतार आणि राधेमाँ निर्माण होत आहेत. अंतरंगात भावभक्तीचा फुलोरा फुलला पाहिजे तरच सत्य, ज्ञानानंद ईश्वरी ज्ञानाचा दिवा मन नावाच्या मंदिरात पेटतो.