परमार्थ साधनेत गुरुकृपा अत्यंत महत्त्वाची
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 08:16 AM2019-10-28T08:16:50+5:302019-10-28T08:21:24+5:30
योगशक्तीने गूढ मनाला स्वच्छ करून त्याचा ताबा घेता येतो. आपला अहंकार काढून सर्व शक्ती गुरुकृपेतच आहे ही भावना या योगमार्गात महत्त्वाची ठरू शकते.
परमार्थ मार्गात शक्तिपान अथवा गुरुप्रसाद याला विशेष महत्त्व आहे. कोणताही मंत्र सिद्ध झाल्याशिवाय त्याची शक्ती उपयोगात येत नाही. परमार्थरूपी साधनेत एकदा उडी घेतली की त्याची नाव पैलतीराला लागतेच असे नाही. कारण गुरुकृपा फार महत्त्वाची आहे. गुरुपासून (मंत्रोपदेश) याचा अर्थ शक्तीचे दान असा आहे. ती एक शक्ती असते. शक्ती जागृत झाली की, ती सुषुम्नेच्या द्वारा ब्रह्मरंध्र्रापर्यंत जाते व तेथे असणाऱ्या शिवाचे व तिचे ऐक्य होते. हेच शक्ती जागृतीचे प्राप्तव्य. तेथेच त्याला परमानंदाचा लाभ होतो. परंतु हे सर्व गुरुकृपेशिवाय अशक्य आहे हा योग सर्व अधिकारी मनुष्याला येऊ शकतो. कर्म, जाती, अवस्था यांचा अडसर यात येत नाही. मनुष्याला एकदा गुरुकृपेने योगशक्ती प्राप्त झाली की, मनुष्याच्या मनावरचे दुष्ट संस्कार नष्ट होत असतात. कारण गूढ मन अथवा मनाचा अज्ञात भाग हा वासना संस्कारांचा बनलेला असतो. तो नाहीसा करण्यासाठी योगशक्ती महत्त्वाची आहे.
योगशक्तीने गूढ मनाला स्वच्छ करून त्याचा ताबा घेता येतो. आपला अहंकार काढून सर्व शक्ती गुरुकृपेतच आहे ही भावना या योगमार्गात महत्त्वाची ठरू शकते. गुरुकृपेने साधकाच्या मनातील शंका-कुशंका निघून जातात. मन स्वैरात्वाकडे धावत नाही. मनातील विकार, वासना नष्ट होऊन मन प्रसन्न राहते. एकदा गुरूंनी कृपाकटाक्षे न्हाळिले म्हणजे जे नव्हते ते होते. असाध्य ते साध्य होते. याचा अर्थ दिव्यज्ञानाचा जन्म होतो. पापाचा क्षय होऊन पुण्याची पहाट उजाडते. गुरुकृपेने वासनांचा नाश होऊन मनशुद्धीचा मार्ग खुला होतो. गुरुकृपेने योग साध्य झाल्यास मन, प्राण व शरीर याला संघटित करून एक दिव्यशक्ती प्राप्त होते. त्यामुळे आपले इष्टकार्य सिद्धीस जाते. योगमार्गाने गेल्यास साधकाला वेगवेगळे अनुभव येतात. मानवाला आपली योग्य जाणीव होते. चांगल्या विचारांनी आपले जीवन घालवतो. अध्यात्माशी एकरूप होतो व आपले जीवन धन्य करून घेतो. म्हणून गुरुकृपेशिवाय योग साध्य होत नाही.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)