अध्यात्मिक : अनुसरणाचा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 06:03 AM2019-12-24T06:03:52+5:302019-12-24T06:04:08+5:30
अनुसरलेला देवाला शोधत असतो व देव त्याला शोधत असतो.
अनुसरणात देवाचा अनुग्रह असतो. गीता म्हणते, अनुकरण वाईट नाही. पण ते श्रेष्ठांंचं करावं, अनुकरणाने अनुसरणाच्या मागे चालावंं, स्वत्वातून तत्त्वाकडचा प्रवास अनुसरलेला आदर्श निर्माण करतो. तो संत असतो, विचारवंत असतो, कुणीही असतो. या अनिकेताला विश्व हेच घर असतंं.
संंत नामदेव महाराज म्हणतात,
‘‘अनुसरे त्यासी फिरोनेदी मागे
राहे अंग संगे समागमे’’
अनुसरलेला देवाला शोधत असतो व देव त्याला शोधत असतो. अशी ही मौज आहे. पहिलं तो देवाला अनुसरतो, नंंतर देवच त्याला अनुसरतो. अनुसरणात विवेक जागा असतो. अनुकरणात नाही. एका प्रवचनात श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या, प्रवचनकार चकित झाले. टाळ्या घेण्यासारखंं मी तर बोललो नाही. टाळ्या कशा? सभेत नजर फिरवली व लक्षात आलंं, मागच्या श्रोत्याने चुना लावून तंंबाखू मळली, थापटली; तो आवाज ऐकून पुढच्यांंनी टाळ्या दिल्या. हेच अनुकरण. अनुकरणात मन पांंगलेलं असतं आणि अनुसरणात एकवटलेलं असतंं.
संंत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
‘‘ते एकवटूनी जियेक्षणी
अनुसरलेगा माझेये वाहानी
तेव्हाचि तयाची चिंंतवनी
मजची पडली’’
असंच स्वामींचंं सूत्र श्रेष्ठांचंं अनुकरण व परमेश्वराचं अनुसरण करा असं सांंगतं. माणसाच्या विचाराला पीळ व आचाराला बळ देणारं हे सूत्र आहे. अनुसरण म्हणजे वस्त्र धारण करणे नाही, सन्मार्गावर चालत स्वत:ला उन्नत करणे होय. परतंत्र शब्दाचा अर्थ परक्याचं तंत्र असा नसून पर म्हणजे परमेश्वर, त्याचं तंत्र असा आहे. दिव्य विचाराची पूर्णता व शुद्ध आचाराची निपुणता यालाच अनुसरण म्हणतात.