अध्यात्म - विश्वमूर्ती कृष्णा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 06:13 AM2019-08-15T06:13:55+5:302019-08-15T06:14:13+5:30
एखाद्या व्यक्तीचा दुसरा कुणीही आप्त नसतो, तेव्हा कृष्ण त्याचा आप्त असतोच
‘स्नेहपाशमिमं छिन्धि दृढं पाण्डुषु वृष्णिषु।’
कुंती भगवंताला केलेल्या प्रार्थनेत म्हणते,
‘हे विश्वेशा, विश्वात्म्या रे, विश्वमूर्ती कृष्णा,
आप्तांचे मम स्नेहपाश दृढ, तूच तोड कृष्णा’
तिचे मागणे अजबच वाटते. ती कृष्णापाशी संकटे मागते, त्यामुळे तिला सदैव परमेश्वराची आठवण येईल. हे मागणे जितके अलौकिक, तितकेच आप्तांबद्दल, पांडव, यादव कुटुंबीयांबाबत असलेले दृढ स्नेहपाश तोडायला सांगते. हेसुद्धा विलक्षणच नाही का? आपण लोक मुलाबाळांसाठी आयुष्य मागतो, सुख मागतो, त्यांच्यात असलेले प्रेमाचे बंध अजून बळकट व्हावेत, म्हणून प्रार्थना करतो. पण कुंती! का बरे तिने असे मागणे मागितले असेल? आपल्या धर्मात चार आश्रम सांगितले आहेत. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. तिची प्रार्थना संन्यासाश्रम स्वीकारायच्या आधीची आहे. सगळी सुखदु:खं बघून, उपभोगून झाली आहेत. आता केवळ परमेश्वराशीच नाते राहावे, अशी इच्छा आहे. पण ते सहजासहजी कुठे जमते. अजून आप्तांच्या सुखदु:खात मन गुंतले आहे. पण तिला माहीत आहे, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा दुसरा कुणीही आप्त नसतो, तेव्हा कृष्ण त्याचा आप्त असतोच. ती प्रार्थनेत म्हणते,
कुळधन विद्ये मदांध त्यांना, तू न कधी दिसतो,
कोणीही नाही ज्यांना तुजविण त्या दर्शन तू देतो. ज्यांना कोणी नाही, त्यांना परमेश्वर दर्शन देतो. अर्थात तितकी आर्तपणे प्रार्थना केली तर..! पण आपण तर हा माझा मुलगा, ही माझी सून करत त्यात विलक्षण गुंतलो आहोत. का मला परमेश्वर आप्त म्हणेल....!
माझे माझे करीशी का रे, खरोखरी हे मृगजळ सारे,
रामाविण तुज कोण दुजा रे, स्मर रामा रे, स्मर रामा रे
अशी मनात भावना निर्माण झाली पाहिजे. असे वैराग्य निर्माण झाले पाहिजे तर मग तो विश्वात्मा आपला सखा निश्चित असणारच.