अध्यात्म आणि जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 03:03 PM2018-09-22T15:03:00+5:302018-09-22T15:04:02+5:30
निसर्ग नियमान्वये जीवन जगण्याचं शास्त्र ,जीवन मार्ग म्हणजे अध्यात्म होय
- नंदकिशोर हिंगणकर
अध्यात्म आणि धर्म याचा सहसंबंध असल्याचा समज हा खरा वाटत असला तरी अध्यात्म आणि धर्म अगदी वेगवेगळे आहेत.
हो, असे म्हणता येईल की धर्म हा अध्यात्मिक सिद्धांतांवर रचलेली जीवन पद्धती आहे. अध्यात्म जीवनाला परिपूर्णता प्राप्त करुन देतो. मात्र बऱ्याचदा धर्म आणि अध्यात्म एकच असल्याचे भासविले जाते.
सृष्टीची निर्मिती आणि सृष्टीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा कार्यकारण भाव प्रकट करणारे अध्यात्म एक शास्त्र आहे.
अध्यात्म आणि विज्ञान कुणाला वेगळं करता येणार नाही तर त्याचा परस्पर सहसंबंध अधिकाधिक घट्ट व्हावा असे वाटते.
अधात्म म्हणजे संपूर्ण ब्रम्हाडांचं ज्ञान....
ज्ञान म्हणजे प्रकाश...या प्रकाशाने जीवन हे उजळून जाते. स्वयंप्रकाशित होते.. जीवन जगण्याच्या मार्गातील अंधार दूर होतो. परम् अर्थाने जीवन फुलविणे सुकर होते.
धर्मा-धर्मातील अविवेकी संघर्षातून धर्मनिरपेक्षता ह्या शब्दाला मोठा अर्थ प्राप्त झाला आहे. या संकल्पनेने अध्यात्माच्या परिभाषेला एक व्यापकता प्राप्त झाली आहे. अध्यात्माच्या परिभाषेत व्यक्तीगत वा व्यक्ती समूहाचे हितसंबध वा एकांगी विचार प्रवाहाला कुठलेही स्थान नाही* संपूर्ण जीवसृष्टीत मानवी जीवन अगदी नगण्य आहे. संपूर्ण सजीवांच्या जीवनाचा व्यापक अर्थाने प्रगटन म्हणजे अध्यात्म होय....
या अर्थाने मनुष्याचा जन्म आणि मृत्यू या मधील कालावधीतील आपले जीवनाच्या परम् अर्थाचा शोध घेवून त्यातील शाश्वत आणि सत्य जाणणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.. निसर्ग नियम हा अध्यात्मिक संशोधनाचा विषय आहे...
या विषयाचा चिकित्सक व संशोधनात्मक व सखोल अभ्यास जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनाला प्रबळ करते.
जीवन हे सुंदर आहे. ही सुंदरता अनुभवता येणे प्रत्येकाला शक्य नाही आणि म्हणूनच जीवनात सुख आणि दुखः हा ऊन सावलीचा खेळ सारखा सुरु असतो. रात्रीनंतर दिवस उजाळतोच. म्हणून रात्रीचं प्रयोजन नाकारण्याचा मानवी स्वभाव हा अनैसर्गिक ठरतो...
जीवनाचा परम् अर्थ ज्याला कळला त्याचं जीवन हे समृद्ध आणि सर्वव्यापी झाल्याशिवाय रहात नाही हा बोध अध्यात्मातून मिळतो.
घरदार, गाव सोडून हिमालयातील एखाद्या गुहेत जावून तपश्यर्या करणे म्हणजे आध्यात्मिक जीवन नव्हे. तर अहंकार मुक्त होत परम्यात्म्याला समर्पित होणं होय. ईश्वर स्वरुप होणं याचा अर्थ स्व ची ओळख होय. हा आत्मभाव अध्यात्मिक जीवनाकडे घेवून जातो. पूर्णत्व प्राप्त करुन देतो. हा अध्यात्म ज्ञानाचा प्रारंभ होय. ही जाणीव अंतरंगात रुजविणे आणि परम् अर्थाने जीवन जगणं हा अध्यात्मिक ज्ञान प्राप्तीचा प्रारंभिक विषय आहे.
अध्यात्मिक जीवन हे खऱ्या अर्थाने ईश्वरीय असतं. ईश्वर हा निर्गुण निराकार आहे. या ईश्वराप्रती कृतज्ञभाव प्रकट होणे आणि या ईश्वराला जीवन समर्पित करणे ही ईश्वर आणि मनुष्य जीवनातील आंतरक्रिया आहे. या प्रक्रियेत ईश्वर आणि मनुष्य यातील अंतर नाहीसे होते. मी ईश्वर रुप आहे हा आंतरिक भाव प्रकट होतो आणि मनातील सर्व विकार, विषय, वासना आपोआप नाहीशा होतात.
ही अवस्था प्राकृतिक विश्वात विस्मय, महिमा आणि रहस्या प्रति एक अधात्मिक दृष्टीकोन आहे. हा दृष्टीकोन गुरफटलेल्या मानवी जीवनाला मुक्त करीत एक प्राकृतिक जीवनशैली विकसित करण्यास उपयुक्त ठरते. हीच मोक्ष प्राप्तीची संकल्पना आहे. हेच सत्य आहे,हेच शाश्वत जीवन आहे. सत्य हे शिव आहे आणि शिव हे सुंदर आहे.
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)