चांगल्या कर्माने जीवन बनवा सुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 07:25 AM2020-03-02T07:25:42+5:302020-03-02T07:26:16+5:30
काही कर्माचे फळ तत्काळ मिळते, तर काही कर्माचे फळ उशिराने मिळते; पण कर्माचे फळ मिळतेच.
मानवी जीवनात प्रत्येकाला आपले कर्म भोगावे लागते. आपल्या केलेल्या कर्माची गती आपल्याला भोगावीच लागते. कारण कर्मगती फार गहन आहे. मानवी जीवन जगताना कोणी माणूस सुखी तर कोणी दु:खी, कष्टी आहे. कारण आपण लगेच म्हणतो त्याचे कर्म तसे असेल. जैसी करणी तैसी भरणी. या जगात प्रत्येकालाच आपल्या कर्मानुसार फळ मिळते. जो जसे कर्म करेल तसे त्याला फळ मिळेल. आपण सकाळी उठल्यापासून सायंकाळी झोपेपर्यंत जी क्रिया करतो ती सर्व कर्मेच होत. खाणेपिण्यापासून शारीरिक अथवा मानसिक सर्व क्रिया कर्मातच मोडतात. काही कर्माचे फळ तत्काळ मिळते, तर काही कर्माचे फळ उशिराने मिळते; पण कर्माचे फळ मिळतेच. या पृथ्वीतलावर परब्रह्म स्वरूप असणारे राम-कृष्ण इत्यादींनासुद्धा कर्मगतीनेच जावे लागले.
सृष्टीचा कायदा कर्मावरच अवलंबून आहे. कर्मरूपी कायद्यात वकिलांची चतुराई, जज्जांची बुद्धिमत्ता किंवा कोणाची मध्यस्थी चालत नाही. माणसाने जे केले ते त्याला भोगणे आहेच. धार्मिक पुराणात अनेक दाखले देण्यात आले आहेत. संत कबीर एका दोह्यात म्हणतात, ‘कबिरा तेरा पुण्यका जब तक हो भंडार। तब तक अवगुण माफ है करो गुनाह हजार’ कर्मसिद्धांत कुणालाही सुटत नाही. त्याच्यातून कोणाचीही सुटका नाही. त्यामुळे आपण नेहमी कर्म चांगले करावे. प्रत्येक मनुष्याने न्यायनीतीच्या मार्गाने चालावे. अविरतपणे सत्कर्म करीत राहावे. जे मिळेल त्यात समाधानी राहावे. सत्कर्मावरचा विश्वास कधी ढळू देऊ नये. आपण आपले कर्म करित राहावे. फळाची अपेक्षा ठेवू नये.
श्रीमद्भगवद्गीतेत म्हटले आहे, ‘कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन’ कर्म करण्याचे कर्तव्य तू करत जा- त्याच्या फळाची अपेक्षा करू नको. चांगले कर्म करा- चांगली गती मिळेल. शुभ कर्म केले तर शुभ फळ मिळेल. अशुभ केले तर अशुभ फळ मिळेल. कर्म तर सुटूच शकत नाही. जन्मापासून मरेपर्यंत काही ना काही कर्म करावेच लागतात. आपली इच्छा असो अथवा नसो कर्म तर घडतातच. म्हणून सांगतो, चांगले कर्म करा व जीवन सुखी बनवा.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)