अध्यात्म; हरिमुरत देखी तिन तैसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:25 PM2019-06-10T12:25:26+5:302019-06-10T12:26:01+5:30

नामस्मरण मोठे नाही आणि लहान नाही. मोठे आहे जागृत राहून, मन स्थिर करून पवित्र श्रद्धेने करणे. मग तुमच्या आवडीचे कोणतेही नाम असो. ते एकाच अर्थी असते.

Spirituality; Namsmaran | अध्यात्म; हरिमुरत देखी तिन तैसी

अध्यात्म; हरिमुरत देखी तिन तैसी

Next

-तुकड्यादास

नागपूर: 
प्रिय मित्र -
आपण विचारले की नामस्मरणातच सर्व काही आहे असे संत म्हणतात, तेव्हा कोणते नाम सर्वात मोठे व ते किती वेळ जपावे म्हणजे आत्म्याला शांती व मोक्षसुख मिळेल? मित्रा ! नामस्मरण मोठे नाही आणि लहान नाही. मोठे आहे जागृत राहून, मन स्थिर करून पवित्र श्रद्धेने करणे. मग तुमच्या आवडीचे कोणतेही नाम असो. ते एकाच अर्थी असते. उगीच नामानामात भेद पाडून जे त्यात लहान मोठेपण निर्माण करतात, हे सर्व पंथमार्गी लोक आहेत. मी त्यांना असा सवाल करतो की, तुम्ही सांगितलेल्या मोठ्या नावानेही किती लोक इमानदार व व्यवहारशुद्ध झाले आहेत? त्यांना तरी साक्षात्कार झाला आहे का ? याचे उत्तर तुम्ही असे द्याल की.
‘जाकी रही भावना जैसी,
हरिमुरत देखी तिन तैसी’
असे जर आहे तर मग भावना, चारित्र्य, स्थिरता हेच महत्त्वाचे आहे असे का नाही सांगत ? असे मी पंथवादी लोकांना म्हणत असतो.
मित्रा, म्हणून माझे तुला सांगणे आहे की नामस्मरण हे आपल्यासमोर दिव्य पुरुषांचे चरित्र नेहमी उभे रहावे याचे द्योतक आहे. मनुष्य जसजसा भावना धरून जपतो तसतसा तो त्या चारित्र्याला प्राप्त होतो. अंती त्या महापुरुषाचे रूप बनतो. जसे संत तुकोबा म्हणतात.
‘तुका म्हणजे अळी । झाली भिंगोटी सगळी’
याचे कारण जसे निदिध्यास आहे तसेच जपाचेही कारण निदिध्यासानेच पूर्ण होते व स्मरण करणाराला चिरंतन शांती मिळते. तो जेव्हा तनाने, मनाने त्या नामस्मरणरूपी ध्येयाला समर्पण होतो तेव्हा त्याच्या दैहिक वासना नामस्मरणात विलीन होतात. ही संधी उपासकाला मिळते. तेव्हा अनेक सिद्धी त्याला आडव्या येतात. अनेक कामिक भक्त त्याला त्रास देतात. त्याच्या पुढे अनेक लोकेषणांचे राक्षस उभे राहतात. जर का तो त्यात भुलला व महत्त्वाचे संधान त्याने सोडले की त्या नामस्मरण करणाराचे पतन होते व नको असेल तीच दिशा त्याला लागते आणि भोगप्रवृत्ती होऊ लागते. असे होऊ नये म्हणून वैराग्य, ज्ञान याची संगती नामस्मरण करणाराला मिळाली तरच त्याची नाव पार होते.
मित्रा ! पण जर का हा दैहक सुखाकरिता, लोक-प्रतिष्ठेकरिता, राजसत्तेकरिता आपल्याला या नामस्मरणाचा लाभ व्हावा असे मनात चिंतत असेल तर तेही सुख प्राप्त होणे स्वाभाविक आहे. पण गंगेवर स्नानाला जाणारा माणूस जसा डबक्यात स्नान करून यावा, अमृताकडे जाणारा माणूस जसा दारूकडे वळावा तशी या नाम घेणाऱ्याची गती होते. शेवटी ते नामस्मरण उद्देशहीन रूप धारण करते व त्याने जीवाची हानी होते. तेव्हा नाम कोणते घ्यावे, याचे उत्तर आवडेल ते घ्यावे, पंथ कोणता असावा याचे उत्तर आवडेल तो, आपल्या बुद्धीला पटेल तो. पण तत्त्व मात्र एकच असते. ते साधण्याची साधना ‘मने, कायावाचे-उच्चारावे नाम’ ही असावी.याला संसार सोडावा लागत नाही. पण अनायसेच त्याच्या बुद्धीत फरक पडल्यामुळे संसारातील सार त्याला मिळतो आणि मग तो आत्मशांतीला व मोक्षाला पात्र असतो.

Web Title: Spirituality; Namsmaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.