स्वभावाचं अध्यात्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 05:22 AM2019-11-15T05:22:08+5:302019-11-15T05:22:11+5:30
माणसांचे अगणित स्वभाव असतात. जसा एक चेहरा दुसऱ्याशी न जुळणारा असतो तसेच स्वभावाचे असते.
- विजयराज बोधनकर
माणसांचे अगणित स्वभाव असतात. जसा एक चेहरा दुसऱ्याशी न जुळणारा असतो तसेच स्वभावाचे असते. हे स्वभाव येतात कुठून, असा प्रश्न निर्माण झाला तर त्याला एकच उत्तर ते म्हणजे पिढ्यान्पिढ्यांच्या पेशीतत्त्वातून येत असतात. स्वभाव आपलं अस्तित्व घेऊन येत असतो. एकाच घरात एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली मुले वेगवेगळ्या स्वभावाची असतात. सख्खी भावंडे अशी वेगवेगळ्या स्वभावाची का, असाही प्रश्न पडतो. यामागचे कारणसुद्धा पिढ्यान्पिढ्यांच्या अगोदरच्या पूर्वजांच्या स्वभाव, गुण, दोष पेशीतत्त्वातून आलेले असतात. ग्रहताऱ्यांचेसुद्धा एक विज्ञान आहे. असे म्हणतात की, स्वभाव जरी बदलता येत नसला तरी विचार मात्र बदलता येतो. विचारक्षमतेमुळे अनेक स्वभाव बदलले आहेत. माझा स्वभाव हा असाच आहे आणि मी असाच वागणार अशा हट्टी स्वभावांची माणसे आपल्या पायावर धोंडा पाडून घेत असतात. हे अनेकदा आजूबाजूच्या घटनांवरून लक्षात येत राहते. आपल्या बाह्य वातावरणाचा, तिथल्या माणसांचा आपल्या मनावर परिणाम होत राहतो म्हणून चांगल्याच्या संगतीत नेहमी राहणारी माणसे बदलत जातात. अनेक ठिकाणी माणसे आपल्या स्वभावामुळे प्रगती करतात किंवा अधोगतीलाही पोहोचतात. यश आणि अपयश हे बरेचसे मानवी स्वभावावर अवलंबून असते. अनेक राजे, राजकारणी, उच्च अधिकारी, कलावंत स्वभावामुळेच स्वत:चं अस्तित्व निर्माण करून गेलेत किंवा आयुष्य मातीमोल करून गेले. जे वेगाने
सकारात्मक बदलत गेलेत त्यांची वेगाने प्रगती झाली. ज्यांनी हट्टाने स्वत:ला आहे त्याच स्वभावाला टिकवून ठेवले ते प्रगतीच्या बाबतीत सीमितच राहिले. जगासोबत मी चालेन, असे म्हणणारे जगाच्या गळ्यातले ताईत बनलेत. स्व-भाव हे एक अध्यात्म आहे. चंचल मन
स्थिर झाले की झपाट्याने विकासाचा मार्ग नक्कीच मोकळा होतो.