कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आत्मविश्वासाची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 08:32 AM2019-04-01T08:32:43+5:302019-04-01T08:39:13+5:30
स्वत:मध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर आपण आपले ध्येय पूर्ण करू शकतो. आपल्या कर्तृत्वाने आपण सिद्ध होत असतो. स्वकर्तृत्वच माणसाला प्रेरणा देत असते.
स्वत:मध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर आपण आपले ध्येय पूर्ण करू शकतो. आपल्या कर्तृत्वाने आपण सिद्ध होत असतो. स्वकर्तृत्वच माणसाला प्रेरणा देत असते. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी स्वकर्तृत्वाने समाजात आपले स्थान निर्माण केले आहे. स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे. आत्मविश्वासासाठी मनाची दुर्दम्य इच्छाशक्ती महत्त्वाची असते. मनुष्याच्या जीवनात अनेक कल्पना, अनेक विचार येतात. कधी चांगले, तर कधी वाईट विचार येतात. विचारांची साखळी तर मनात सुरूच असते; परंतु आपल्या विचारांवर आपण ठाम असले पाहिजे. माणसाने नेहमी मनाची विचारश्रेणी सकारात्मक ठेवावी. नकारात्मक विचारश्रेणी अपयशाकडे धाव होते. माणसाचा आत्मविश्वास प्रबळ असला की सकारात्मकतेत वाढ होते.
कोणताही विचार करताना आपला तोल जाऊ देऊ नये. आपण आपल्या विचारांवर ठाम असले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या विचारांपासून कधीही विचलित झाले नाहीत. आपल्या जीवनात कितीही वाईट प्रसंग आले तरी आपल्या ध्येयापासून विचलित न होणे ही सकारात्मक विचारश्रेणी होय. माणसाचे काळीज फाटून जाईल एवढे दु:ख निर्माण झाले तरी आपल्या विचारांपासून, ध्येयापासून माघार न घेणारे अनेक शूरवीर-महापुरुष पाहता येतील. मनाच्या या तत्त्वनिष्ठ घडणीमुळे माणसाचा आत्मविकास होत असतो. बुद्धीचा आणि मनाचा एकसंवाद यातून दिसून येतो. मग आपल्या कर्तृत्वाचा गौरव आपणच पाहत असतो. म्हणजे ज्ञानस्वी सूर्याने मनावर मिळवलेल्या नव्या विजयाचे नवे शिल्पकार आपणच होतो. मनातील सूक्ष्म राक्षसी विचारांना ठार मारून, वाईट विचारांना छेद देऊन, आपणच आपल्या भूमिकेवर ठाम राहून, मनुष्य जातीचे स्वातंत्र्य भोगल्याचे सुख आपल्याला मिळते. म्हणजे मनास एक प्रकारचे पवित्र समाधान वाटू लागते. अशावेळी आपले अंत:करण उदात्त भावनांनी भरून येते. येथे आपल्या जीवनप्रवासाचा मार्ग सुखकर बनतो. कारण आपण आपल्या विचारश्रेणीने जगलो तर आपल्यालाच समाधान लाभते. तेच समाधान महत्त्वाचे असते. त्यासाठी एवढा खटाटोप असतो. मनाला इच्छाशक्तीच्या क्षितिजापुढे जाता येते आणि मन आत्मानंदाने न्हाऊन निघते.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)