अध्यात्म - निष्काम बुद्धी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 07:01 AM2019-10-05T07:01:45+5:302019-10-05T07:01:55+5:30
भगवंतांनी आपले अतिभव्य विश्वरूप दर्शन आपल्या अत्यंत लाडक्या परमभक्ताला भक्तश्रेष्ठ अर्जुनाला घडविले तेव्हा ते परमेश्वरी दिव्य स्वरूप पाहून अर्जुन आश्चर्यमुग्ध झाला.
भगवंतांनी आपले अतिभव्य विश्वरूप दर्शन आपल्या अत्यंत लाडक्या परमभक्ताला भक्तश्रेष्ठ अर्जुनाला घडविले तेव्हा ते परमेश्वरी दिव्य स्वरूप पाहून अर्जुन आश्चर्यमुग्ध झाला. परंतु ते ब्रह्मांडव्यापी स्वरूप त्याला सहन होईना, तो भयकंपित झाला तेव्हा स्वत: भगवंत अर्जुनाला म्हणाले की,
मा ते व्यथा माच विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीहृदमेदम्।
व्यपेतभी: प्रीतमना: पुनरत्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य।।
पार्था, हे माझे आक्राळविक्राळ रूप पाहून तू भेदरून गेला आहेस, हे माझ्या पूर्ण लक्षात आले आहे, परंतु तू घाबरू नकोस, व्यथितसुद्धा होऊ नकोस. तुझ्यातला मूढभाव जो या क्षणी जागृत झाला आहे त्याला तू प्रयत्नपूर्वक बाजूला सार. मी भगवंत तुझा रक्षणकर्ता आहे. तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे तू लक्षात ठेवून तू निर्भय हो, नि:शंक हो. हे माझे दिव्य चतुर्भुज रूप पाहून घे. प्रसन्नपणे माझे हे भगवंत स्वरूप मनसोक्तपणे अनुभवून घे. ही अप्रतिम संधी तुला साधनेच्या बळावर प्राप्त झाली आहे. ती तू पुन्हा पुन्हा अनुभवून घे. त्यातून तुला आत्यंतिक महत्त्वाचे ज्ञान आणि जाणीव प्राप्त होणार आहे. मानवी योनीतला तू एकमेव माझा परमभक्त आहेस. म्हणून तर हे अत्यंत दुर्मीळ विश्वरूपदर्शन तुला अत्यंत भाग्याने प्राप्त झाले आहे. हे भाग्यही इतक्या सहजासहजी प्राप्त झाले नव्हते. त्यासाठी आवश्यक असलेल्या खडतर कसोट्या अर्जुनाने पार केलेल्या होत्या. भगवान श्रीकृष्ण आपल्या परमभक्तावर अत्यंत प्रसन्न झाले होते म्हणून तर भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाची विश्वरूप दर्शनाची इच्छा पूर्ण केली होती. अर्जुनाला भगवंतांचे चतुर्भुज दर्शन झाले ते केवळ भगवंतांवरील अतूट भक्तीमुळेच. प्रापंचिक वृत्तीला पूर्णपणे छेद केल्यावर, ‘हवे-नको’चा खेळ संपल्यावर, निष्काम बुद्धीने कर्म करण्याची प्रवृत्ती वाढल्यावर, भक्तीमयी आयुष्याची खरी सुरुवात होते. जीवनाचे खरे सार यातच आहे.