हसत हसत जगण्यातच आनंदाचे मूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 02:31 PM2019-01-07T14:31:24+5:302019-01-07T14:32:22+5:30

संत वाङ्मयात हा दृष्टांत दर क्षणाला उलगडत जाणाऱ्या आयुष्याला दिला जातो. ‘घडी-विघडी-उघडी’ असे शब्द वापरले जातात. तेव्हा क्रमाक्रमाने उलगडण्याचाच उल्लेख केला जातो.

Stay Happy When Life Is Stressful | हसत हसत जगण्यातच आनंदाचे मूळ

हसत हसत जगण्यातच आनंदाचे मूळ

Next

रमेश सप्रे

नवीन शाल किंवा साडी किंवा धोतर आपण आणतो तेव्हा त्यांची एक छान छोटीशी घडी असते; पण त्या एका घडीत अनेक उभ्या आडव्या घड्या असतात. एकेक उलगडल्यावरच सर्व वस्त्र पूर्णपणे उघडले जाते. 

संत वाङ्मयात हा दृष्टांत दर क्षणाला उलगडत जाणाऱ्या आयुष्याला दिला जातो. ‘घडी-विघडी-उघडी’ असे शब्द वापरले जातात. तेव्हा क्रमाक्रमाने उलगडण्याचाच उल्लेख केला जातो. अनेकरंगी, विविध नक्षीकाम केलेले वस्त्र असेल तर पुढची घडी किंवा आतली घडी कोणत्या रंगाची-नक्षीची असेल याची कल्पना नसते. 

जीवनाचे वस्त्रही असेच असते. त्याच पुढच्या क्षणाला घडणाऱ्या घटनेबद्दल रहस्य असते. यामुळे जीवनात रोमांचकारी, रम्य अशा घटनाही असतात. तशाच दु:खदायी, करुण, निराशाजनक प्रसंगही असतात. ते आपण कसे स्वीकारतो यावर जीवनातील सुख-दु:ख अवलंबून असते. आनंदाचे तसे नसते. कोणतीही भलीबुरी घटना अचानक घडली तरी तिचे स्वागत करता येते. 

जीवन जसे उलगडत जाईल तसे हसत हसत जगण्यातच आनंदाचे मूळ आहे. एक सत्यकथा पाहा. तो होता न्यायाधीश तर त्याची पत्नी होती एका महाविद्यालयाची प्राचार्या. दोघांचीही व्यक्तिमत्व आकर्षक होती. दोघांचाही रुबाब वाखाणण्यासारखा होता. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होतेच; पण त्यापेक्षा एकमेकांचा अभिमान वाटत असे दोघांना. त्याच्यापुढे मागे नेहमी कोर्टाचे शिपाई किंवा पोलीस तर तिच्या भोवती कायम विद्यार्थी, पालक यांचा गराडा पडलेला. 

वर्षामागून वर्षे गेली. दोघेही पती-पत्नी निवृत्त झाले. वयानुसार प्रकृती खचत गेली. त्याला तर एका दुर्धर, उपाय नसलेल्या व्याधीने ग्रासले. तो खंगत गेला. पराधीन, परावलंबी बनला. ती स्वत:च्या ढासळलेल्या प्रकृतीमुळे आधीच बेजार झालेली. त्यात नव-याचे सगळे तिलाच करावे लागे. तशी कामाला बाई, शुश्रुषेला दाई ठेवली होतीच. मुले परदेशात. त्यांना इकडे घरी यायला फुरसत नाही. 

ही सारी परिस्थिती हळूहळू विकोपाला चालली होती. हाताबाहेर चालली होती. दोघाही पती पत्नींना एकमेकांच्या त्रासाबद्दल मनस्वी वाईट वाटे. आपल्या पतीला होणाऱ्या शारीरिक यातना व मानसिक क्लेश याचा तिला अधिक त्रास होई. भूतकाळातील न्यायाधीश म्हणून असलेल्या त्याच्या दिमाखदार जीवनाच्या आठवणी काढून ती अधिकच हळवी होई. तिची तळमळ खूपच वाढे. बरे, नवऱ्याकडे त्या आठवणी काढल्या तर त्याला अधिक वेदना होतील या कल्पनेने ती मनातल्या मनात कुढत राही. 

त्याचवेळी त्यालाही तिचे पूर्वीचे सौंदर्य, तेजस्वी रुप आठवायचे. तिचे झालेले सत्कार, तिला मिळालेले मानसन्मान या साऱ्या प्रसंगाची उजळणी तो मनातल्या मनात करत राही. दोघांच्याही मनात चालू असलेल्या परिस्थितीतून बाहेर कसे पडावे हा विचार चालू असे. 

एक दिवस खूप विचार करून तिने ठरवले, किती दिवस औषधे देऊन आपल्या नवऱ्याचे आयुष्य नि त्यातील अगतिकता वाढवत राहायची. यावर उपाय म्हणून त्याच्या पिण्याच्या औषधात अगदी कणभर विष मिसळू लागली. हेतू हा की अगदी सावकाश पण निश्चितपणे त्याचे सध्याचे दयनीय आयुष्य कमी होऊन लवकर संपेल. 

त्याचवेळी आपल्या पत्नीला आपली करावी लागत असलेली सेवाशुश्रुषा, तिची स्वत:ची वेगाने बिघडणारी प्रकृती या साऱ्याचा विचार करून आपले आयुष्य वाढवणारी औषधे तो न घेता तिच्या नकळत ओतून टाकू लागला. 

काय प्रारब्ध असते पाहा! पतीचे नरकमय आयुष्य कमी व्हावे म्हणून ती करत असलेला संथ विषप्रयोग (स्लो पॉयझनिंग) पती स्वत: ते औषध न घेता ओतून टाकत असल्याने असफल होत होता. दोघांचा उद्देश चांगला होता; पण नकारात्मक होता. जीवन संपवणारा. एका अर्थी एकमेकांचे दु:ख कमी करणारा वाटला तरी त्यापेक्षा अधिक प्रभावी उपाय करता आला असता. जे घडत होतं ते तसेच्या तसे आनंदाने स्वीकारायचा. आपण जीवनात उगीचच केलेला हस्तक्षेप व्यर्थ असतो. जीवन जसे उलगडत उघडे पुढे उभे ठाकले तितक्यात सहजतेने त्याला आलिंगन देणे आवश्यक असते. ही वृत्ती आनंदाची गंगोत्री आहे. 

Web Title: Stay Happy When Life Is Stressful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.