अपशकुनाची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 05:38 AM2019-02-08T05:38:34+5:302019-02-08T05:39:05+5:30
मनबुद्धीतून वैचारिक अध्यात्म विरघाळायला लागलं की मनुष्य पशुवत वागायला सुरुवात करतो. शेकडो संत महात्म्यांनी उत्तम विचारांचे संस्कार जनमानसावर करण्याचे प्रयत्न करूनही आजचा प्रगत माणूस स्वैराचाराला का जवळ करतो हे एक मोठं कोडंच आहे.
- विजयराज बोधनकर
मनबुद्धीतून वैचारिक अध्यात्म विरघाळायला लागलं की मनुष्य पशुवत वागायला सुरुवात करतो. शेकडो संत महात्म्यांनी उत्तम विचारांचे संस्कार जनमानसावर करण्याचे प्रयत्न करूनही आजचा प्रगत माणूस स्वैराचाराला का जवळ करतो हे एक मोठं कोडंच आहे. आंधळ्या श्रद्धेने तर हजारो मनांचा ताबा घेतलाय. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाचा उलट स्वैराचार जास्तच फोफावत चाललाय. बुरसटलेल्या विचारधारा आणि आजचं विज्ञानयुग याची सांगड घालणं हे एक आव्हान वाटायला लागलं. या आंधळ्या विचारधारेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. अशीच एक सत्य घटना घडून गेली. त्याला वीस-पंचवीस वर्षे नक्कीच झाली असतील. एका गावात एका शिक्षकाच्या मुलीचे लग्न होते. मुलीचा भाऊ दूर शहरात नोकरीला होता. तोच घराचा आर्थिक आधार होता. लग्नाच्या दोन दिवस अगोदर मुलीचा भाऊ स्वत:च्या गाडीने लग्नाचा बस्ता घेऊन गावाकडे निघाला आणि दुर्दैवाने पहाटे पहाटे गाडी चालवताना त्याची गाडी एका अवजड यंत्रावर आदळून भावाचा जागीच मृत्यू झाला. गावात बातमी आली. हिरव्या मांडवात हाहाकार माजला. सर्व घर धाय मोकलून रडलं, खचलं. एकुलता एक मुलगा शुभ प्रसंगी जग सोडून गेला. अर्थातच लग्न स्थगित झालं. दुखवट्याच्या सहा महिन्यांनंतर मात्र दु:खाच्या छायेतच लग्नविधी पार पडला. मुलगी आपल्या सासरी निघून गेली. मुलाच्या मृत्यूच्या पोकळीने वडील खचले असताना काही वर्षांतच मुलगी बाळंत झाली. पहिलं अपत्य जन्माला आलं. दु:खाचा वाळवंट जरा ओलावला. घर किंचित हसायला लागलं. त्यानंतर काही वर्षांनी तिला दुसरं मूल झालं आणि पुन्हा एका संकटाचा परीघ मुलीच्या पुढ्यात उभा राहिला. मुलीच्या सासूने, नवऱ्याने तू अपशकुनी आहे, अशी सून घरात नकोय म्हणून दोन्ही मुलं आपल्या ताब्यात ठेवून तिला माहेरी पाठवून दिलं. आईचं हृदय, मुलीसाठी ती रोज रोज आकांत करू लागली. स्वत:च्या मुलीला पाहण्याची तिला परवानगी नव्हती. याच काळात तिचे वडील स्वर्गवासी झाले. एका बहिणीचे लग्न झाले. आई एकटी पडली. एकट्या आईसोबत ही दिवस काढता काढता पोटच्या मुलींच्या विरहात हळूहळू भ्रमिष्ट होऊ लागली आणि एक दिवस या मुलीने आत्महत्या करून या अपशकुनाच्या लावलेल्या शिक्क्यातून आपली सुटका करून घेतली. पहिले झाला तो भावाचा अपघात. ते दु:ख होतेच. अपघात हा भावाच्या अतिआत्मविश्वासामुळे झाला. सोबत एखादा वाहनचालक ठेवला असता तर ही वेळच आली नसती. इतकं साधं समजायला त्या अभागी मुलीच्या नवºयाला सुबुद्धी झाली नाही आणि अपशकुनी म्हणताना त्याची त्याला आणि त्याच्या आईला थोडी ही खंत वाटली नाही. खरं तर हा अंधश्रद्धेचा बळी होता. या आईच्या आत्महत्येचा तिच्या मुलीच्या मनावर कायम वाईट परिणाम झाला असावा किंवा त्याही अंधश्रद्धेच्या मार्गाला तरी लागल्या असाव्यात. म्हणूनच समाजाला आज विचार अध्यात्माची गरज आहे. जुन्या रूढीग्रस्त विचारांना मूठमाती नव्या दमाच्या तरुणांनी द्यायला हवी. म्हणूनच राष्टÑसंत तुकडोजी महाराज म्हणतात.
ऐशा ज्या ज्या वाईट रीती।
झुगारोनी द्याव्या हातोहाती
करावी पुन्हा नवीन निर्मिती।
समाज नियमांची।। ग्रामगीता