होम-हवन करताना मंत्रांच्या शेवटी 'स्वाहा' का म्हटलं जातं? जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 04:44 PM2019-03-29T16:44:44+5:302019-03-29T16:50:39+5:30
हिंदू धर्मात होम-हवनाला सर्वात पवित्र धार्मिक कार्य मानलं जातं. लग्न असो वा कोणताही धार्मिक कार्यक्रम नेहमीच लोक होम-हवन करतात.
(Image Credit : solutionastrology.com)
हिंदू धर्मात होम-हवनाला सर्वात पवित्र धार्मिक कार्य मानलं जातं. लग्न असो वा कोणताही धार्मिक कार्यक्रम नेहमीच लोक होम-हवन करतात. होम-हवन करताना काही मंत्रांचा जप करून 'स्वाहा' म्हणून काही पदार्थ किंवा वस्तू अग्निमध्ये टाकल्या जातात. यात देवाला काही नैवेद्यही अर्पण केलं जातं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, प्रत्येक मंत्रांच्या शेवटी स्वाहा का म्हटलं जातं? अनेकदा तुम्हीही गंमतीने कधी स्वाहा म्हटलं असेल. चला जाणून घेऊ याचा अर्थ.
श्रीमद्भगवत गीता आणि शिव पुराणात स्वाहाचं वर्णन आढळतं. स्वाहा चा अर्थ आहे योग्य पद्धतीने पोहोचवणे म्हणजे कोणतीही वस्तू त्याच्या प्रिय व्यक्तीपर्यंत सुरक्षित आणि योग्य पद्धतीने पोहोचवणे. पुराणांनुसार, 'स्वाहा' ही अग्नि देवाची पत्नी आहे. त्यामुळेच होम-हवनाच्या प्रत्येक मंत्रांनंतर या शब्दाचा उच्चार केला जातो.
तसेच असेही मानले जाते की, कोणताही हवन हा तोपर्यंत सफल मानला जात नाही, जोपर्यंत देवता त्या हवनाला ग्रहण करत नाही. पण देवता हे ग्रहण तेव्हाच करतात जेव्हा अग्नि द्वारे आणि स्वाहाच्या माध्यमातून ते अर्पण केलं जात नाही.
स्वाहाबाबत असेही म्हटले जाते की, स्वाहा ही प्रजापति दक्षची मुलगी होती. तिचा विवाह अग्नि देवासोबत झाला होता. अग्निदेव त्यांची पत्नी स्वाहाच्या माध्यमातूनच हविष्य ग्रहण करतात.
स्वाहाशी निगडीत आणकी एका आख्यायिकेनुसार स्वाहा ही निसर्गाचीच एक कला होती. तिचा विवाह अग्निसोबत देवतांच्या आग्रहावरून संपन्न झाला होता. भगवान श्रीकृष्णाने स्वत: स्वाहाला हे वरदान दिला होतं की, केवळ तिच्याच माध्यमातून देवता हविष्य ग्रहण करू शकतील. त्यामुळेच कोणताही यज्ञ तेव्हा पूर्ण मानला जातो, जेव्हा आवाहन केल्या गेलेल्या देवताना त्यांच्या आवडीचा भोग पोहोचवला जातो.
तसेच असेही सांगितले जाते की, हवनाचे केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिकही लाभ आहेत. राष्ट्रीय वनस्पती अनुसंधान संस्थेद्वारे करण्यात आलेल्या शोधानुसार, यज्ञ आणि हवनादरम्यान निघणाऱ्या धुरामुळे हवेत असलेले हानिकारक जीवाणू ९५ टक्क्यांपर्यत नष्ट होतात. सोबतच या धुराने वातावरण शुद्ध होतं, ज्यामुळे पसरणारे आजार होण्याचा धोकाही कमी असतो.