" आ चल - मैं तुझे , मैं लेके चलूँ , एक ऐसे गगन के तले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 08:06 PM2020-01-04T20:06:28+5:302020-01-04T20:06:52+5:30
ताणतणावाच्या या स्पर्धेच्या युगात आनंदाने जीवन जगण्यासाठी मनाला सबळ व निर्मळ करणं ही अत्यावश्यक बाब..
- डॉ . दत्ता कोहिनकर -
अपयशाने खचलेला, भविष्यातील करियरच्या चिंतेने नैराश्यात गेलेला तरुण, प्रेमभंग असह्य झाल्याने किंवा घटस्फोटामुळे आत्महत्यापर्यंतचा विचार करणारी मुले - मुली , दारुचे व्यसन सुटत नसल्यामुळे संसार रस्त्यावर यायची वेळ आलेली तरुण जोडपी , शिक्षणात अपयश , बेरोजगारी , मानसिक आजाराने त्रस्त झालेला युवा वर्ग , घरात होणाऱ्या त्रासाने घुसमटलेले स्त्री - पुरुष , न्युनगंड व भित्रा स्वभाव यामुळे आत्मविश्वास गमावलेले व जगायचं कशासाठी ? या विचारांनी अर्धमेले झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी या सगळ्यांचे समाजातील प्रमाण खूप झपाट्याने वाढते आहे.
त्याचसोबत पोटच्या मुलाकडून - सुनेकडून होणाऱ्या छळाला वैतागलेले आजी - आजोबा , वासनेने , क्रोधाने , द्वेष, लोभाने पछाडलेले मन , त्यामुळे जीवनात झालेली घालमेल - नैराश्य , दु : ख , वैफल्यता अशा अनेक गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी निरनिराळ्या मार्गाचा शोध घेणारी मंडळी विपश्यना ध्यान केंद्रावर जातात. तिथे कृतज्ञतेचा भाव जागतो आणि शिबिर संपताना डोळ्यातून अश्रू ओघळतात , मन शांत व निर्मळ झालेले असते .
२५०० वर्षांपूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी दुःख मुक्तीसाठी ' विपश्यना ' ही महासंजीवनी शोधून काढली . ही शास्त्रोक्त साधना असून , कालांतराने भारतातून लुप्त झाली . १९६९ मध्ये पूज्य आचार्य श्री सत्यनारायण गोयंकाजीनी म्यानमारमधून भारतात आणली व प्रशिक्षण कार्यास आरंभ केला . इगतपुरी हे प्रमुख केंद्र असून जगात जवळजवळ १८० केंद्रे विनामूल्य चालविली जातात. ताणतणावाच्या या स्पर्धेच्या युगात आनंदाने जीवन जगण्यासाठी मनाला सबळ व निर्मळ करणं ही अत्यावश्यक बाब असल्यामुळे , मित्रांनो दहा दिवसासाठी नक्कीच मनाच्या व्यायामशाळेत जा ! मनाच्या व्यायामशाळेत जाता जाता आपण या मनासाठी एकच गाणं म्हणू या - " आ चल - मैं तुझे , मैं लेके चलूँ , एक ऐसे गगन के तले , जहाँ गम भी ना हो - आँसू भी ना हो , बस प्यार ही प्यार पले । "