उलटसुलट विरुद्ध ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 10:58 PM2019-03-24T22:58:24+5:302019-03-24T22:58:28+5:30
उलटसुलट विचार का येतात कारण स्वत:बद्दलचा डळमळीत झालेला आत्मविश्वास!
उलटसुलट विचार हे मनाच्या कमकुवतपणाचं लक्षण असू शकतं. ठाम विचार हे मनाच्या सुदृढतेचं लक्षण मानलं गेलं. उलटसुलट विचार का येतात, त्याचा उगम कुठे असतो आणि त्या उलटसुलट विचारांचा मारा थांबविण्यासाठी कमकुवत मनासाठी काय केलं पाहिजे हा जटिल प्रश्न नेहमीच शिल्लक राहतो.
उलटसुलट विचार का येतात कारण स्वत:बद्दलचा डळमळीत झालेला आत्मविश्वास! त्याचा उगमसुद्धा अस्ताव्यस्त जीवनशैलीतून जन्म घेत असतो आणि अशा उलटसुलट विचारांच्या माऱ्याला थांबविण्यासाठी आपणच आपुले गुरू बनणे पहिले महत्त्वाचे काम असते. माणूस हा इतरांचे दोष काढण्यात सदैव अग्रेसर असतो. परंतु स्वत:च्या दोषाकडेसुद्धा तितक्याच अलिप्तपणे पाहून त्यावर मनन आणि चिंतन करून आपणच त्या उलटसुलट विचारांचा नायनाट करून विचारांना उत्तम तत्त्वाने प्रेरित केले पाहिजे. उलटसुलट विचाराचा निर्माता हा स्वत:च्या मनातच ठाण मांडून बसलेला असतो.
नको ते बघणे, नको ते ऐकणे, त्यावर विचार न करता बोलणे, त्यातून उद्भवलेल्या परिस्थितीला आणखी चिघळत नेणे, त्यातून हट्टाच्या भूमिकेमुळे माघार न घेणे, तारतम्याची भूमिका न घेता आपणच कसे योग्य आहोत आणि इतर बोलणारे-वागणारे कसे चुकीचे आहेत, असा गोड गैरसमज करून घेतल्यामुळे बाजू आपल्यावर उलटत जाते. त्यातून निर्मिती ही दु:खाची आणि फक्त निराशेची. योग्य वेळी योग्य विचार मनात आणणे आणि उद्भवलेल्या परिस्थितीपुढे त्याचे तारतम्याने प्रकटीकरण करणे हेच पहिले सुंदर उचललेले पाऊल असू शकते. आपल्या रजोगुणाकडून आपण सत्गुणाकडे सरकतोय असे स्वत:ला वाटले
पाहिजे. आपला विचार वास्तवाच्या दिशेने नेला पाहिजे.
-विजयराज बोधनकर