प्रतीकपूजा व कर्मकांड ; मानवी जीवनाचा अविभाज्य भाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 09:25 PM2019-01-15T21:25:42+5:302019-01-15T21:32:51+5:30
धर्म-अध्यात्माच्या नावाखाली आज जे काही सर्वत्र चालू असताना दिसतं, ते म्हणजे प्रतीकपूजा व कर्मकांडाचे सोपस्कार. प्रत्येक धर्मात कमी-जास्त प्रमाणात हा प्रकार दिसतोच. अनेक सुधारक मंडळी या सर्व सोपस्कारांना वाईट समजतात पण याच्या मूळ स्वरूपाला समजल्याशिवाय कोणत्या प्रकारच्या कर्मकांडाला व प्रतीकपूजेलावाईट मानावे व कुणाला चांगले हा निर्णय करणे कठीण असते. म्हणून सरसकट सर्वांनाच अंधविश्वास व अंधपरंपरेच्या नावाखाली नाकारणे अयोग्य ठरेल. प्रतीक व कर्मकांडाची बौद्धिक चिकित्सा केल्यास असे दिसून येते की मानवी समाज याशिवाय जगूच शकत नाही.
धर्म-अध्यात्माच्या नावाखाली आज जे काही सर्वत्र चालू असताना दिसतं, ते म्हणजे प्रतीकपूजा व कर्मकांडाचे सोपस्कार. प्रत्येक धर्मात कमी-जास्त प्रमाणात हा प्रकार दिसतोच. अनेक सुधारक मंडळी या सर्व सोपस्कारांना वाईट समजतात पण याच्या मूळ स्वरूपाला समजल्याशिवाय कोणत्या प्रकारच्या कर्मकांडाला व प्रतीकपूजेलावाईट मानावे व कुणाला चांगले हा निर्णय करणे कठीण असते. म्हणून सरसकट सर्वांनाच अंधविश्वास व अंधपरंपरेच्या नावाखाली नाकारणे अयोग्य ठरेल. प्रतीक व कर्मकांडाची बौद्धिक चिकित्सा केल्यास असे दिसून येते की मानवी समाज याशिवाय जगूच शकत नाही.
हा त्याच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आदी काळात भाषा नसल्यामुळे रोजच्या व्यवहारात मनुष्य समाज प्रतीकांचाच उपयोग करीत होता. म्हणून त्या प्राचीन समाजाला सिम्बोलिक सोसायटी म्हणत. मानवी जीवनाचे अथवा व्यक्तिमत्त्वाचे अनिवार्य अंग असलेले विचार व भाव हे सूक्ष्म आहेत. यांना समाजाच्या दुसऱ्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी त्याला भाषा, लिपी, इंद्रियांच्या हालचाली जसे हस्तांदोलन, नमस्कार, चरणस्पर्श, राष्ट्रध्वज व महापुरुषांना सलामी देणे इत्यादी असंख्य प्रतीकांची व कर्मकांडाची गरज भासते. माणसाचे नावसुद्धा एक प्रतीकच आहे. भाषा, लिपी, राष्ट्रध्वज, पदक, नाणी, मंदिरावरील ध्वज यांना सुद्धा एक प्रकारची प्रतीकेच म्हणता येईल, जी प्रत्येक समाजाने आपापल्या सोयीसाठी आपापल्या लोकांसाठीच बनविलेली असतात. सभ्यतेच्या विकासासोबत या प्रतीकांमध्ये वाढ सुद्धा झाली आहे. मनुष्याला प्रत्येक वेळी पूर्ण गोष्ट सांगणे अथवा लिहिणे शक्य नसते. असंख्य भाव असे असतात ज्यांना प्रतीकांच्या माध्यमाने दुरून बघूनच समजल्या जाऊ शकते. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक क्षेत्रात अनेक प्रतीकांचा वापर आम्ही नित्य करीत असतो. एका अर्थाने प्रतीके व कर्मकांड ही लोकशिक्षणाला सोपी करणारी साधने आहेत. पूजेच्या वेळी केलेल्या इंद्रियांच्या तसेच प्रतीकांच्या विविध हालचाली व क्रिया यांना आपण कर्मकांड म्हणतो. ठराविक आचार-विचाराने वागणे याला सुद्धा कर्मकांड म्हणतात. या दृष्टीने पाहिल्यास वेद वाङ्मयातील संहिता प्रकाराला कर्मकांड नावाने संबोधिले जाते. कारण त्यात माणसाने दैनंदिन व्यवहारात आणावयाच्या आचार-विचारांचा समावेश करण्यात आलेला आहे. हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिस्ती, मुसलमान, यहुदी, पारसी धर्मात अनेक
विशिष्ट कर्मकांडाची रेलचेल दिसते. काबाकडे तोंड करून नमाज पडणे, हज यात्रेत तेथे स्थापिलेल्या ‘संगे असवद’ या पवित्र दगडाचा बोसा घेणे, शैतानच्या भिंतीवर दगड मारणे यासारखे कर्मकांड ते करतात. निधर्मी लोक सुद्धा राष्ट्रध्वज, महापुरुषांचे पुतळे, चित्रे यांना माल्यार्पण करण्याचे व त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक क्रिया करीत असतातच. लाल बावटाचा सन्मान, लेनिनच्या पुतळ्याविषयी असणारा श्रद्धा भाव अथवा तिरस्कार हा अनुक्रमे पुष्पचक्र समर्पित करून अथवा मूर्ती खाली खेचून पाडणे याद्वारे व्यक्त होताना आपण सर्वांनी बघितला आहेच. हा सुद्धा कर्मकांडाचाच एक भाग आहे.
एकंदरीत सांगायचे झाल्यास मनुष्य समाज हा प्रतीके व कर्मकांडाशिवाय जगूच शकत नाही. त्याला आपल्या भावभावनांना व्यक्त करण्यासाठी यांचा आधार घ्यावाच लागतो. यात महत्त्वाचे हे आहे की प्रतीके व कर्मकांड ही श्रद्धा भाव व्यक्त करण्यासाठी असलेली साधने आहेत, साध्य नव्हे. यांची आवश्यकता फक्त आपल्या विविध
भावभावनांना व्यक्त व विकसित करण्यासाठी आहे. जेथे धर्मअध्यात्माचा हेतू असलेला भावनांचा परिष्कार पूर्ण होत असेल तेथे ती प्रतीके व कर्मकांड ही योग्यच ठरतात आणि जेथे आत्म परिष्काराचे साध्य बाजूला ठेवून फक्त या साधनांनाच सर्व महत्त्व देण्यात येते तेथे ती अंधश्रद्धा ठरते.
हेमंत बेंडे
गायत्री परिवार प्रचारक, मो. ९३७१४९३७०९.