तस्मै श्रीगुरवे नमः
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 07:32 PM2020-07-18T19:32:13+5:302020-07-18T19:33:32+5:30
अज्ञानाचा अंधकार निवारण्यासाठी ज्ञानाची ज्योत पेटवणारा गुरु व जीवन विकासाची कामना राखणारा शिष्य यांचा संबंध अलौकिक असतो म्हणूनच गुरु हा आपल्यासारख्या अस्थिर आणि अव्यवस्थित मनाच्या मानवासाठी मार्गदर्शक बनतो..!
- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )
गुरुचे अनेक प्रकार आहेत. जसे की - मार्गदर्शक गुरु, पृच्छक गुरु, दोष विसर्जक गुरु, चंदन गुरु, विचार गुरु, अनुग्रह गुरु, स्पर्श गुरु, वात्सल्य गुरु, कूर्म गुरु, चंद्र गुरु, दर्पण गुरु, क्रौंच गुरु वगैरे. या प्रत्येक गुरूची वेगवेगळी विशेषता आहे.
१) मार्गदर्शक गुरु शिष्याच्या जीवनाला योग्य मार्गदर्शन करतो. गुरु शिष्याचा जीव एकमेकांत संपूर्णपणे एकरूप झालेला असेल तरच खरे मार्गदर्शन शक्य बनते. शिष्य स्वतःला अनुकूल असते तेवढीच गोष्ट स्वीकारतो व प्रतिकूल गोष्ट स्वीकारू शकत नसेल तर गुरु मार्गदर्शक बनू शकत नाही.
गुरोराज्ञा ह्यविचारणीया ॥
याप्रमाणे स्वतः चे नावडते देखील मानण्याची तयारी असेल त्यालाच हा मार्गदर्शक गुरु मिळण्याचा संभव असतो.
२) पृच्छक गुरूची देखील आगळी भूमिका आहे. सामान्यरित्या शिष्य विचारतो आणि नंतरच गुरु उत्तर देतो. विचारल्याशिवाय कोणाला काही सांगू नये, अशी स्मृतींची आज्ञा आहे.
नापृष्ट कस्यचित ब्रूयात् ॥
परंतु येथे तर शिष्याबरोबरच्या घनिष्ट व आत्मीय संबंधामुळे पृच्छक गुरु स्वतःच शिष्याला प्रश्न विचारून योग्य उत्तरांचे संकेत किंवा सूचना यांच्याद्वारे त्याच्या जीवनाला खऱ्या रस्त्याकडे वळवतो.
३) दोष विसर्जक गुरुजवळ शिष्य आत्मीय भावाने विनासंकोच स्वतःचे दोष सांगतो. त्याची खात्री असते की, गुरूला दोष सांगूनदेखील मी त्याच्या नजरेतून उतरणार नाही. तसाच गुरु माझ्या दोषांचा गैरफायदाही उठवणार नाही. जशी चिखलात पडलेल्या बालकाला आई हात धरून वर उठवते तसा दोषांच्या चिखलात पडलेल्या मला माझा गुरु हात पकडून बाहेर काढील एवढेच नाही तर चिखलात बरबटलेल्या मला स्वच्छ देखील करील ह्याची खात्री असते. चिखलातून कमळ निर्माण करण्याची शक्ती ह्या गुरुमध्ये असते.
४) ज्याच्या केवळ समागमानेच जीवनात सुगंध निर्माण होतो तो चंदन गुरु. चंदन स्वतः ला घासून घेऊन दुसऱ्यांना सुगंध देते. त्याप्रमाणे असा गुरु प्रभुकार्यासाठी स्वतःला झिजवून जगात सौरभ पसरवितो. असा गुरु वाणीने नाही तर स्वतःच्या वर्तनाने उपदेश देत असतो. सत्कार्यासाठी संकटे सहन करून संस्कृतीचा सुवास पसरविण्याचे शिक्षण शिष्याला गुरुच्या जीवनातून मिळते.
५) विचार गुरु मिळणे फारच दुष्कर आहे. शिष्याच्या अंधकारमय जीवनात तो प्रकाशप्रदीप प्रगटवितो. अशा गुरूचा स्वतःच्या बुद्धीवर तसाच शिष्याच्या बुद्धीवर पूर्ण विश्वास असतो आणि म्हणूनच तो दुराग्रही न बनता शिष्याला समजावून, त्याच्या बुद्धीत स्वतःचे विचार उतरवून त्याला सन्मार्गावर घेऊन जातो. याच्यासाठी लागणारे अपेक्षित धैर्य त्यांच्याजवळ विपुल प्रमाणात असते. तो समजावताना थकत नाही किंवा कंटाळत नाही. अर्जुनाचा मोह नष्ट करण्यासाठी तसेच त्याच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी गीतेचे १८ अध्याय सांगायला भगवान श्रीकृष्ण कंटाळला नाही आणि एवढे सांगितल्यानंतर ही अर्जुनाच्या विवेक बुद्धीवरील विश्वास तो अनाग्रही राखू शकला आहे. अशा गुरुच्या सानिध्यात शिष्याची बुद्धिनिष्ठा फुलते.
६) अनुग्रह गुरु अतिशय कृपाळू असतो. अपंग बालकाला आई जशी कडेवर घेऊन पर्वतावर चढते तसा अशा अपंग बालकासारख्या, मंद बुद्धीच्या शिष्यावर अनुग्रह करून हा गुरु त्याला पुढे घेऊन जातो. गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही याचं अर्थ असा की, गुरु आपल्याला आपला विकास व अधिकार पाहून ज्ञान देतो. योग्यतेशिवाय मिळालेली विद्या पचत नाही; ती फुटून निघते. न पचलेले अन्न जसे दुर्गंधी निर्माण करते तसे न पचलेले ज्ञान देखील जीवनाला दुर्गंधी बनवते. अनुग्रह गुरु आपली योग्यता व अधिकार अनुरूप ज्ञान आपल्याला देतो. एवढेच नाही तर त्याचा कृपाप्रसाद आपली योग्यता व अधिकार वाढविण्यालाही सहाय्यभूत होतो. अधिकार पाहून उपदेश करतो, पात्र पाहून वाढतो हे सामान्य गुरुबद्दल म्हटले असेल पण ज्याने जगावर मातृप्रेम केले असेल असा हा गुरु तर योग्यता व पात्रता निर्माण करण्यात गौरव मानतो.
या लेखात आपण गुरुच्या सहा प्रकारांची माहिती पाहीली पुढील लेखांत आपण बाकी सहा प्रकारांची माहिती पाहूया..!
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )