पौष महिन्यात लग्न?; नको रे बाबा!... पण असं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 06:19 PM2019-01-02T18:19:40+5:302019-01-02T18:25:09+5:30

तरुणाई 'फास्ट फॉरवर्ड' झाली असली, तरी अजूनही बहुतांशी लग्नं ही मुहूर्त काढून, पत्रिका पाहून होतात. हा मुहूर्त ठरवताना, पौष महिना टाळण्याकडेच सगळ्यांचा कल दिसतो.

there is no base to avoid marriage in paush month | पौष महिन्यात लग्न?; नको रे बाबा!... पण असं का?

पौष महिन्यात लग्न?; नको रे बाबा!... पण असं का?

googlenewsNext

'अरे, आमचा प्लॅन जानेवारीचाच होता. जानेवारी एन्डला तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच उडवायचा होता लग्नाचा बार. पण नेमका पौष महिना येतोय. म्हणून मग आता फेब्रुवारीतला मुहूर्त काढलाय...' हे असे उद्गार बऱ्याचदा ऐकायला मिळतात. मांजर आडवी जावी, तसाच हा पौष महिना लग्नाळू मंडळींना आडवा येतो. पौष महिन्यात लग्न करत नाहीत, असा एक दंडकच पूर्वीपासून पडलाय. पण, पौष महिन्यानं असं काय घोडं मारलंय की या महिन्यात वरातीचं घोडं अडतं, हे शोधण्याचा प्रयत्न केला असता, बिच्चारा पौष महिना अकारणच बदनाम झाल्याचं लक्षात आलं.

ज्योतिषशास्त्र, भविष्य, ग्रह-तारे, पत्रिका, मुहूर्त हे सर्व मानणारा मोठा वर्ग आजही आहे. तरुणाई 'फास्ट फॉरवर्ड' झाली असली, तरी अजूनही बहुतांशी लग्नं ही मुहूर्त काढून, पत्रिका पाहून होतात. हा मुहूर्त ठरवताना, पौष महिना टाळण्याकडेच सगळ्यांचा कल दिसतो. एकतर लग्न अलीकडे - मार्गशीर्षात केलं जातं किंवा मग पुढे ढकललं जातं. हे असं का?, पौष महिन्यात लग्न का करत नाहीत?, शास्त्र काय सांगतं?, पौष आणि लग्न यांच्या छत्तीसच्या आकड्याला काही शास्त्राधार आहे का?, हे जाणून घेण्याचा 'लोकमत डॉट कॉम'ने प्रयत्न केला. त्यातून जे समोर आलं ते चकित करणारंच आहे.        

'हे आहे या वर्षाचं पंचांग. १८, १९, २३, २५, २६, २८, २९ जानेवारी आणि १ फेब्रुवारी या पौष महिन्यातील तारखांना विवाह मुहूर्त असल्याचं यात ठळकपणे छापलंय. जर शास्त्रानुसार पौष महिना लग्नासाठी योग्य नसेल, अशुभ असेल, तर हे मुहूर्त कसे काय दिले असते?', असा प्रश्न पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी हसत-हसत केला. त्यांच्या प्रश्नातच आपल्या प्रश्नाचं उत्तर दडलं आहे. पौष महिन्यात लग्न करू नये, असं कुठलंही शास्त्र सांगत नाही. पौष महिना अजिबात वाईट नाही, लोकांनी असा समज का करून घेतलाय ठाऊक नाही, पण तो चुकीचा आहे हे नक्की, असं त्यांनी सांगितलं. 

या संदर्भात, ज्योतिष अभ्यासक विक्रमादित्य पणशीकर यांना विचारलं असता, त्यांनी मजेशीर गोष्ट सांगितली. लोकांना काढीव मुहूर्त (म्हणजे त्या दिवशी लग्न मुहूर्त नसतो, पण शुभ दिवस असतो)चालतात, तिथे ही मंडळी अॅडजस्टमेंट करू शकतात; मात्र पौष महिना म्हणताच चेहरे पडतात. वास्तविक, गेल्या शंभर वर्षांपासून दाते पंचांग प्रसिद्ध होतंय. त्यात कुठेही पौष महिना लग्नासाठी वर्ज्य असल्याचा उल्लेख नाही. पौषातील लग्नमुहूर्तही पंचांगात दिले जातात. पण एखादी गोष्ट समाजात रूढ झाली की शास्त्र वगैरे मागे पडतं, तशातलाच हा प्रकार म्हणावा लागेल. माघ, फाल्गुन, वैशाख आणि ज्येष्ठ हे विवाहासाठी उत्तम महिने सांगितले आहेत. मार्गशीर्ष मध्यम आहे. पण उर्वरित महिन्यांमध्ये लग्न करूच नये, असं कुठेही नमूद नाही, असं पणशीकर यांनी स्पष्ट केलं. 

पौष महिन्यात लग्न न करण्याची 'प्रथा' कशी पडली असावी, याबद्दल बोलताना एक गुरुजी जुन्या काळात घेऊन गेले. पूर्वीच्या काळी लग्न घरच्या मांडवातच होत असली, तरी लग्नाच्या खरेदीसाठी दूरगावी जावं लागायचं. पौष महिन्यात दिवस छोटा असतो. त्यामुळे घरी परतताना अंधार पडायचा आणि वाटमारीची भीती असायची. त्यामुळे पौषात लग्न करणं शक्यतो टाळत असावेत, असं ते म्हणाले.

हल्ली वेळेचं गणित, आर्थिक गणित, हॉलची उपलब्धता या गोष्टींमुळे पौष महिन्यात काही लग्नं होतातही. पण, अशा लग्नांची पत्रिका पाहून अनेकांच्या भुवया उंचावतात. या सर्व 'काळजीवाहू' मंडळींना आता तुम्ही बिनधास्त सांगू शकता - 'जस्ट चिल'. शास्त्रच आहे हे!

Web Title: there is no base to avoid marriage in paush month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न