येता सोबत काहीच नव्हते, जाता सारे येथेच राही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 01:40 PM2019-02-06T13:40:56+5:302019-02-06T13:41:05+5:30
या जगात येताना मनुष्य एकटाच रिकाम्या हाताने येतो व एकटाच रिकाम्या हाताने जगाचा निरोप घेतो. जाण्यापूर्वी निर्माण केलेले घरदार, पैसा, नातेसंबंध येथेच सोडून द्यावे लागते, हेच खरे जीवनाचे स्वरुप आहे.
या जगात येताना मनुष्य एकटाच रिकाम्या हाताने येतो व एकटाच रिकाम्या हाताने जगाचा निरोप घेतो. जाण्यापूर्वी निर्माण केलेले घरदार, पैसा, नातेसंबंध येथेच सोडून द्यावे लागते, हेच खरे जीवनाचे स्वरुप आहे.
एक दिवस सगळ्यालाच तुम्हाला रामराम करायचा आहे. अगदी तुमच्या शरीराचासुद्धा तुम्हाला निरोप घ्यायचा आहे. प्रत्येक जण कधी ना कधी जाणार. फरक ऐवढाच, काही लोक लवकर जातील तर काही उशीरा जातील. मृत्यू कधी येणार? कसा येणार आणि कुठे येणार? हे कोणीही सांगू शकत नाही.
कोठे व्हावा जन्म आपला। मरणही कोठे कसे यावे?
स्वाधीन नाही यातील काही। पदरी पडले गोड मानावे।।
विश्वनियत्या प्रभुने साऱ्यांचे पासपोर्टस तयार करुन ठेवले आहेत. त्यावर शिक्केही मारले आहेत. तारखाही लिहुन ठेवलेल्या आहेत. तो दिवस आलाकी, तुम्हा-आम्हा सर्वांनाच मुकाट्याने इहलोकातून प्रस्थन करावे लागणार आहे. हे वास्तव आहे.
काळाची हे उडी पडेल बा जेंव्हा। सोडविना तेंव्हा रावरंक।
म्हणून संत सांगून गेले की, या जगात जगत असताना दोन गोष्टींचा कधीही विसर पडू देवू नका. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरे म्हणजे आपला मृत्यू. उद्या आपल्याला जायचे आहे याचाच विसर माणसाला पडला आहे. त्याची सारखी धावाधाव सुरु आहे या ब्रम्हांडाच्या पसाºयात आपले अस्तित्व नगण्य आहे. संकटाच्या क्षणी फक्त परमेश्वराचा आधार असतो ह्याची आठवण ठेवणे अगत्याचे आहे.
अजुनी तरी होई जागा। तुका म्हणे पुढे दगा।।
मृत्यूचा प्रवास खूप लांबचा आहे. ह्या प्रवासात तुमच्या मदतीला कोणीही धावून येवून शकत नाही. तुमच्या घरात अन्नधान्याचे भांडार असले तरी प्रवासाला निघतांना तुम्हाी चिमूटभर पीठही नेवू शकत नाही.
उंच उंच माडी, लाल हवेली। हे घर म्हणशील माझेरे
अखेर शेवटी तुझ्या नशीबी। स्मशानी काया उघडी रे
सोन्या चांदीचे तांब्या पितळचे। हे भांडे म्हणशील माझे रे
अखेर शेवटी तुझ्या नशीबी। मातीचे एक मडके रे।।
पैसा खूप काही होवू शकतो पण सर्व काही कधीही होवू शकत नाही. ज्यांनी पैशालाच सर्वस्व मानले त्यांच्यावर आयुष्याच्या शेवटी पश्चाताप करण्याची वेळ येते. शिकंदर बादशहाने मरणापूर्वी आपल्या जवळ असलेली प्रचंड संपत्ती पाहिली. त्याचे डोळेअश्रूंनी भरले. कारण त्याला समजले की, ही अलोट संपत्ती आपल्यासोबत नेता येणार नाही.
‘‘लाया तू क्या शिकंदर और साथ ले जा रहा क्या?
दोनो हाथ थे खाली, बाहर कफनसे निकले।
इकठ्ठे कर जहॉके जर, सभी मुल्कोके माली थे।
सिकंदर जब गये दुनियासे, तो दोनो हाथ खाली थे।’’
देश घडविणारी युगंधर व्यक्तीमत्त्वांची मांदियाळी ह्याच पद्धतीने मृत्युच्या द्वारापर्यंत पोहचली, हा निसर्गाचा नियमच आहे. प्रत्येक माणसाने ही जाणीव ठेवूनच जीवनाचे कल्याण कसे होईल याचे वेळापत्रक करायला हवे. वेळापत्रकाप्रमाणे सर्व गोष्टी होतीलच असे नाही परंतु जीवनप्रवासाचा शेवट चांगला होईल. संतजणांनी आम्हाला सांगितले आहे की, एखाद्याची प्रेतयात्रा रस्त्यावरुन जाताना ‘अरेरे, बिचारा गेला’ असे कधीही म्हणू नका. कारण ह्याच रस्त्याने आपणाला जायचे आहे. अर्थी निघण्यापूर्वी आपण जीवनाचा अर्थ समजून घ्यायला हवा.
‘‘कर्ता निमित्त मी, मज नको- चिंता काळाची मनी।
ठेवा ईशनाम मुखी, गुरुला स्मरोनि- आनंद भोगाजनी।
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा। मंत्र हा जपावा सर्वकाळ।।.
- ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर मिरगे, शेगाव