म्हणोनि जाणतेणे गुरु भजिजे..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 06:37 PM2020-07-04T18:37:48+5:302020-07-04T18:37:57+5:30
गुरुपूजन म्हणजे सत्याचे पूजन.. गुरुपूजन म्हणजे ज्ञानाचे पूजन.. गुरुपूजन म्हणजे अनुभवांचे पूजन.. ज्ञानाचा सूर्य, प्रेमाचा महासागर आणि शांतीचा हिमाचल म्हणजे गुरु..! आणि अशा गुरुच्या पूजनाचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा..!
- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )
आषाढ पौर्णिमा म्हणजे व्यास पूजेचा दिवस. व्यास पूजेच्या पवित्र दिवशी संस्कृती घडविणारांचे पूजन होते. संस्कृती घडविण्याचे काम हे विविध रीतींनी अनेक ऋषींनी केलेले आहे पण वेद व्यासांनी सर्व विचारांचे संकलन करून आपल्याला संस्कृतीचा ज्ञानकोष-रूप 'महाभारत' ग्रंथ दिला.
भारत: पंचमो वेद: |
त्यांच्या या ग्रंथाला पाचव्या वेदाची उपमा प्राप्त झाली आहे. महाभारताच्या द्वारे त्यांनी सांस्कृतिक विचार दृष्टांतासहित सरळ भाषेत समाजासमोर ठेवले.
मुनिनामप्यहम् व्यास: |
असे म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्यांची बिरुदावली गायलेली आहे. वेद व्यासांचे जीवन व कवन अमर बनविण्यासाठी त्यांच्या अनुयायी चिंतकांनी, संस्कृतीचा प्रचार करणाऱ्या सर्वांनी त्यांच्यासाठी "व्यास" हे संबोधन निश्चित केले. सांस्कृतिक विचार ज्या ' पीठा ' वरुन सांगितले जातात त्या
'पीठा' लाही आज ' व्यासपीठ ' म्हटले जाते. या व्यास पीठावर आरूढ होऊन जो निःस्वार्थ भावाने स्वतःची उपासना किंवा भक्ती समजून स्वकर्तव्य रुपात संस्कृतीच्या प्रचाराचे जीवन व्रत घेतो, त्याची पूजा गुरुपौर्णिमेला करून माणसाने कृतकृत्य व्हावे..!
व्यासांनाच आपण हिंदू धर्माचा पिता मानू शकतो. व्यक्तीचा मोक्ष आणि समाजाचा उद्धार या दोन्ही आदर्शांकडे अभेद दृष्टीने पाहणाऱ्या, अभ्युदय व नि:श्रेयस या दोहोंचा समन्वय साधणाऱ्या, अध्यात्म परायण अशा व्यासांपेक्षा अधिक योग्यतेचा कोणीही समाज शास्त्रज्ञ नाही. त्यांचे वैदिक व लौकिक ज्ञान एवढे अमर्याद होते की, सर्वज्ञ लोकांनी कृतज्ञतापूर्वक म्हटले आहे की,
व्यासोच्छिष्टं जगत् सर्वं..! आणि व्यासांच्या महाभारताला सारं विश्वस्य..! म्हटले आहे.
महर्षी व्यास हे जीवनाचे खरे भाष्यकार आहेत. कारण, त्यांनी समग्र रुपात जीवन जाणलेले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आपले जीवन तर काळया-पांढऱ्या तंतूनी विणलेले वस्त्र आहे. सद्गुण आणि दुर्गुण जीवनात बरोबरीनेच पाहायला मिळतात.
आंग्ल कवी शेक्सपियर व संस्कृत भाषेतील महाकवी कालिदास ही व्यासांच्या तुलनेत कमी ठरतात. जीवनाची केवळ काळी बाजू पाहणारा शेक्सपियर हा कृष्ण पक्षाचा कवी ठरतो तर जीवनाच्या उजळ बाजूचा महिमा गाणारा महाकवी कालिदास हा शुक्ल पक्षाचा कवी ठरतो पण जीवन हे केवळ कृष्ण पक्ष किंवा शुक्ल पक्ष नाही हे विचारात घेऊन महर्षी व्यासांनी मात्र त्यांच्या सर्व पात्रांच्या गुण दोषांची चर्चा अगदी मोकळ्या व शुद्ध मनाने केलेली आहे. त्यांनी भीम, अर्जुन किंवा युधिष्ठिर यांचे दोष दाखविले आहेत तर दुर्योधन व कर्ण यांच्या गुणांचेही त्यांना विस्मरण झालेले नाही..!
There is something worst in the best of us and there is something best in the worst of us..!
आणि या रीतीने जीवनाला त्याच्या समग्र रुपात पाहण्याची हिम्मत बाळगणारा पवित्र द्रष्टा ऋषीच जीवनाचा खरा भाष्यकार, मानवाचा खरा पथ दर्शक किंवा परम गुरु असू शकतो. व्यास समाजाचे खरे गुरु होते म्हणूनच परंपरागत व्यासपूजा ही गुरुपूजा मानली गेली व व्यास पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा म्हणून साजरी होऊ लागली. निर्जीव वस्तू वर फेकण्यासाठी जशी सजीव वस्तूची गरज भासते तशीच साधारणत: जीवन हीन व पशू तुल्य बनलेल्या मानवाला देवत्त्वाकडे पाठविण्यासाठी जिवंत व्यक्तीची आवश्यकता भासते आणि ही व्यक्ती म्हणजेच गुरु..! मानवाला देव बनण्यासाठी स्वतःच्या पशू तुल्य वृत्तींवर संयम ठेवावा लागतो. ही संयमाची प्रेरणा त्याला गुरुच्या जीवनातून मिळत असते म्हणून आपण आपला गुरु निवडताना जाणतेने हे काम केले पाहिजे. आमची ज्ञानराज माऊली म्हणते -
म्हणोनी जाणतेणे गुरु भजिजे | तेणे कृतकार्य होईजे |
जैसे मूळ सिंचने सहजे | शाखा पल्लव संतोषी ||
गुरुपूजन म्हणजे सत्याचे पूजन.. गुरुपूजन म्हणजे ज्ञानाचे पूजन.. गुरुपूजन म्हणजे अनुभवांचे पूजन.. ज्ञानाचा सूर्य, प्रेमाचा महासागर आणि शांतीचा हिमाचल म्हणजे गुरु..! आणि अशा गुरुच्या पूजनाचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा..!
|| जय जय रघुवीर समर्थ ||
( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )