कृष्णावतारी... म्हणून 'संत ज्ञानेश्वरांना' श्रीकृष्णाचा अवतार मानतात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 09:53 AM2020-08-11T09:53:33+5:302020-08-11T11:19:46+5:30

कृष्णावतारी संत ज्ञानेश्वर

Therefore, Saint Dnyaneshwar is considered to be the incarnation of Lord Krishna | कृष्णावतारी... म्हणून 'संत ज्ञानेश्वरांना' श्रीकृष्णाचा अवतार मानतात

कृष्णावतारी... म्हणून 'संत ज्ञानेश्वरांना' श्रीकृष्णाचा अवतार मानतात

googlenewsNext

प्रा.सुलभा जामदार, नाशिक

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात त्यांच्या जीवनाच्या सत् आचार ,सत् विचार व सत् उच्चार या गोष्टीचा प्रत्यय येतो.संत ज्ञानेश्वरांनी अलौकिक ज्ञानामृत प्रेमाने सर्वसामान्यांना पाजलं म्हणून त्यांना " ज्ञानियाचा राजा " तसेच " ज्ञानेश्वर माऊली "म्हणतात.त्यांचं चरित्र इतकं अलौकिक आहे की, ते शब्दांकित करणं अवघड आहे. सर्व संत ज्ञानेश्वरांना श्रीकृष्णाचा अवतार मानतात.कारण संत ज्ञानेश्वरांचा जन्म पण श्रीकृष्णाच्या जन्मदिनी (श्रावण कृष्ण अष्टमी),त्याचवेळी (मध्यरात्री)व त्याच नक्षत्रात झाला.तसेच श्रीकृष्णाने  संस्कृतमधून  भगवत् गीता अर्जुनाला सांगून वेदातील सार- ज्ञानयोग,कर्मयोग, भक्तीयोगाद्वारे अध्यात्माचे तत्वज्ञान जगाला सांगितले.

ज्ञानेश्वरांच्या काळात सर्व वेद, उपनिषदे, पुराणे इ.फक्त संस्कृत भाषेतच होती.गीतापण संस्कृत भाषेतच सांगीतली गेली.त्या वेळेस संस्कृत ही देवांची भाषा आहे असं मानलं जाई.त्या मुळे संस्कृत शिकण्याचा अधिकार फक्त उच्चवर्णियांनाच होता.सामान्य जनतेला संस्कृत शिकण्याचा अधिकार नव्हता.त्यामुळे सर्व अध्यात्म,तत्वज्ञानांची मक्तेदारी उच्चवर्णियांकडे (ब्राह्मण, क्षत्रिय) होती.त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग  समाजकल्याणासाठी न करता स्वतःच्या चरितार्थासाठी करू लागले.सामान्य जनता अज्ञानी असल्याने शूद्राची पिळवणूक, अनिष्ट रुढी व परंपरा, जातीभेद इ.समाजात पसरले.

अशा परिस्थितीत स्वतः समाजाकडून अतिशय छळ सोसून संत ज्ञानेश्वरांनी भगवत् गीतेतील अध्यात्म व तत्वज्ञान  सामान्य जनतेला समजण्यासाठी प्राकृत (मराठी) भाषेत सांगून त्यांना भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग याचे ज्ञान करून दिले. ज्ञानेश्वरीच्या रूपाने परम पवित्र व अजरामर श्रेष्ठ  ग्रंथ निर्माण करून सामान्य लोकांना विश्वकल्याणाचा मार्ग दाखवला."गीता"ही जशी श्रीकृष्णाची वाड्:मय मूर्ती आहे त्याप्रमाणे  "ज्ञानेश्वरी"ही संत ज्ञानेश्वर महाराजांची वाड्:मय मूर्ती म्हणता येईल.

संत ज्ञानेश्वरांनी ईश्वरनिष्ठाची मांदियाळी जमवून वारकरी संप्रदायाची उभारणी केली.भागवतधर्माचा प्रसार केला.त्यांनी आपल्या वाड्:मय साहित्यातून समा जजागृतीचे कार्य करून सामान्य लोकांना ज्ञानाचे कोठार खुले केले. लोकांमध्ये स्वाभिमान, भक्तिभाव, समानता, समर्पण, बंधूभाव निर्माण केला.सर्वसामान्यांना प्रेमाने ब्रह्मरसाचे (भक्तीचे) अमृत पाजून सत् चिद् आनंद म्हणजे मोक्षप्राप्तीची वाट दाखवली.

संत ज्ञानेश्वरांचे खरे चरित्र म्हणजे  त्यांची ज्ञानेश्वरी (भावार्थ दीपिका), हरिपाठ, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, अभंग यातून त्यांची भक्ती, प्रगल्भता, आत्मज्ञान , गुरूभक्ती इ. गुण प्रकर्षाने जाणवतात. एवढं अजरामर साहित्य वयाच्या अवघ्या पंधरा-सोळाव्यावर्षी निर्माण करून, गीतेतील तत्वज्ञान व भक्तीयोग जनसामान्यांच्या मनात रुजवला.अशाप्रकारे अलौकिक कार्य करून त्यांनी आपले जीवन कृतार्थ/कृतकृत्य केले आणि वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षीच त्यांनी क्षेत्र आळंदी येथे प्रत्यक्ष विठ्ठल व थोर संतांच्या उपस्थितीत संजीवन समाधी घेतली.

अशा या संतश्रेष्ठ ज्ञानियाचा राजा, उत्तम कवी, निरूपणकार, तत्ववेत्ता कृष्णस्वरूप ज्ञानेश्वरांना कोटी कोटी  दंडवत.

Web Title: Therefore, Saint Dnyaneshwar is considered to be the incarnation of Lord Krishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.