ही आहेत प्रीतीची लक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 04:14 AM2019-08-13T04:14:54+5:302019-08-13T04:15:04+5:30
प्रीती असेल तर देण्याघेण्याचा व्यवहार होतो. नाही तर श्रीकृष्ण दुर्याेधनाचं मिष्टान्न घेत नाही व त्याला साथही देत नाही.
- बा.भो. शास्त्री
वस्तू हे प्रेमाचं प्रतीक आहे. एखादं फूलही आपल्याला फुलवून जातं. साधा नावाची बाई स्वामींची रिंगणीच्या फुलांनी अष्टांग पूजा करते. आई फाटक्या गोधडीत झोपलेल्या आपल्या काळ्याकु ट्ट मुलाला ‘माझ्या सोन्या’ म्हणते. तसं स्वामी त्या गंधहीन फुलाला सोन्याचं फूल म्हणतात. त्याचं वर्णन बा.भो. करतात,
‘‘तुला पाहूनी रिंगणीचेही
फूल फुलत गेले
तव स्पर्शाचा परिस लागता
सोनेचे झाले’’
फूल साधे पण भाव सोन्याचा होता. स्वामी साधेच्या प्रीतीचा विषय झाले. सुदामाचे पोहे श्रीकृष्ण खातो, राम राजपुत्र शबरीची उष्टी बोरं खातो हे आहे प्रीतीला पात्र होणं. हाच व्यवहार माणसांची मनं सांभाळणारा आहे. माणसं जोडणारा आहे. मातंगाचा लाडू व चर्मकाराची सुपारी घेऊन स्वामींनी दलित मोठा केला व साध्या व्यवहारातच परमार्थ उभा केला. एका श्लोकात प्रीतीची सहा लक्षणं सांगितली आहेत.
‘‘ददाति प्रीति गृह्याती
गृह्या माख्याति पृच्छति
भुड्क्ते भोजयते चैव
षड्विधं प्रीति लक्षण्म
प्रीती असेल तर देण्याघेण्याचा व्यवहार होतो. नाही तर श्रीकृष्ण दुर्याेधनाचं मिष्टान्न घेत नाही व त्याला साथही देत नाही. प्रीती असेल तर गुपित सांगितलं जातं व पुसलं जातं. जेवण घेणं व देणं प्रीतीच्याच ठिकाणी आहे. तीच नसेल तर जीवनात किती अडचणी येऊ शकतात. जेवणावर बहिष्कार का घातला जातो, एक देश दुसऱ्या देशाला मदत बंद करतो. रहस्य राखूनच बोललं जातं. संकट प्रसंगीही मदत घेतली जात नाही. कार्यक्रमातून न जेवताच निघून जाणं, याचं कारण प्रीतीचा अभावच असतो.