या देवी सर्वभूतेषु
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 02:04 AM2019-12-05T02:04:38+5:302019-12-05T02:04:57+5:30
ज्या देवीला सर्व प्राणिमात्रातील विष्णुमाया म्हणतात, तिला नमस्कार..!
- शैलजा शेवडे
मार्गशीर्षातला गुरुवार. महालक्ष्मीची पूजा तर करायचीच. पण खरोखर महालक्ष्मी म्हणजे काय, देवी म्हणजे काय, याचा शोध घ्यायचा. दुर्गासप्तशतीत म्हटले आहे, अत्यंत सौम्य आणि अत्यंत रौद्ररुपिणी देवीला विनम्र असे आम्ही नमस्कार करतो. जगाची प्रतिष्ठा आणि कृतिरुपिणी देवीला नमस्कार! ती तर प्रत्येक प्राणिमात्रात आहे. ज्या देवीला सर्व प्राणिमात्रातील विष्णुमाया म्हणतात, तिला नमस्कार..! जी देवी सर्व प्राणिमात्रातील चेतना म्हणून संबोधली जाते, तिला नमस्कार! ती देवी सर्व प्राणिमात्रात बुद्धीरूपाने आहे. ती देवी सर्व प्राणिमात्रात निद्रारूपाने आहे. ती देवी सर्व प्राणिमात्रात क्षुधारूपाने आहे. ती देवी सर्व प्राणिमात्रात छायारूपाने आहे. ती देवी सर्व प्राणिमात्रात शक्तिरूपाने आहे. ती देवी सर्व प्राणिमात्रात क्षमारूपाने आहे. ती देवी सर्व प्राणिमात्रात जातिरूपाने (उत्पत्ती रूपाने) आहे. किती सुंदर आहे ही प्रेरणा. (त्यामुळेच व्यक्ती दुष्कृत्य करायला धजावत नाही.) ती देवी सर्व प्राणिमात्रात शांती रूपाने आहे. ती देवी सर्व प्राणिमात्रात श्रद्धारूपाने आहे, ती देवी सर्व प्राणिमात्रात कान्तिरूपाने आहे. ती देवी सर्व प्राणिमात्रात लक्ष्मीरूपाने आहे. ती देवी सर्व प्राणिमात्रात स्मृतिरूपाने आहे. ती देवी सर्व प्राणिमात्रात दयारूपाने आहे. ती देवी सर्व प्राणिमात्रात तुष्टीरूपाने आहे. ती देवी सर्व प्राणिमात्रात मातृरूपाने आहे. किती सुंदर भाव! प्रत्येकात आई दडलेली असते. अशा प्रकारे ही देवी तुमच्यात आहे, माझ्यात आहे. मग तरीही आपला देह दुर्गुणांनी का व्यापला जातो? का आपण आपल्यातल्या या सहजसुंदर भावनांना वाईट भावनांनी झाकले जाऊ देतो? स्वत:ला ओळखू या. स्वत:तील देवत्वाला वर आणू या. अरे म्हणलं, की का रे येतं. म्हणून आपण दुसऱ्यांच्याही केवळ सद्भावना जाग्या करू या. जी सहजपणे दुसºयाबद्दल स्नेहभाव दाखवते, सर्वशक्तीने युक्त अशा हे दुर्गे देवी, आमचे भयापासून रक्षण कर! देवी, तुला नमन असो..!