हे स्पर्शाचे गुण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 05:04 AM2019-11-11T05:04:34+5:302019-11-11T05:04:45+5:30

स्पर्श ही मानवी जीवनाला लाभलेली इंद्रिय सुखाच्या पलीकडची एक महान शक्ती आहे.

These touch points | हे स्पर्शाचे गुण

हे स्पर्शाचे गुण

googlenewsNext

- प्रा. शिवाजीराव भुकेले
स्पर्श ही मानवी जीवनाला लाभलेली इंद्रिय सुखाच्या पलीकडची एक महान शक्ती आहे. यात्रेत हरवलेल्या बालकाने चुकून आईचे बोट सोडून द्यावे आणि हुरूऽऽ हुरूऽऽ नजरेने मातेचा शोध घ्यावा व ती आता भेटत नाही, म्हणून हंबरडा फोडावा. अशात आईने धावत येऊन बालकाला आपल्या हृदयासी कवटाळावे आणि रडणाऱ्या बालकाने आईच्या उबदार स्पर्शाने तिच्या कुशीत झोपी जावे. अशा वेळी वाटते, खरंच पंडिताच्या हजारो प्रवचनांपेक्षा आणि गुरू मंडळींच्या गुरुलीलेपेक्षा अक्षरांचे राजवाडे स्वप्नात न पाहिलेल्या आईचा स्पर्श किती महान आहे. ज्याला कुठल्याच शब्दकोशाच्या चिमटीत पकडता येत नाही, असा नि:शब्द भावनेचा राजमार्ग म्हणजे स्पर्श. कधी तो लाजाळूच्या वेलीसारखा आपल्या रुजुत्वाला प्रकट करतो, तर कधी अंगणात पडणाºया प्राजक्ताच्या सड्याप्रमाणे तनामनाला सुगंधित करतो. संतांना जेव्हा आपल्या आराध्याचा स्पर्श सुखाची तळमळ लागली, तेव्हा जनाईसारखी पारमार्थिक विद्युलता म्हणू लागते -
देव खाते देव पिते, देवावरी मी निजते ।
देव देते-देव होते, देवा सवे व्यवहारिते
देव तेथे-देव तेथे, देवावीन नाही रिते ।
जनी म्हणजे विठाबाई, भरुनी उरले आंतर बाही ॥
वर-वर थोडेसे स्वैर व स्वच्छंद वाटणारे जनाबाईचे हे शब्द तिचा पारमार्थिक अधिकार तर सिद्ध करतातच, पण स्पर्श नावाच्या आंतरिक शक्तीने ईश्वराशी थेट नाते जोडता येते, याचाही अनुभव देते. या स्पर्शशक्तीनेच नास्तिक नरेंद्र आस्तिकतेचे महामेरू व भारतीय संस्कृतीची त्यागमय पताका जगाच्या वेशीवर फडकविणारे स्वामी विवेकानंद यांच्या रूपाने विख्यात झाले. जर राधाकृष्णाच्या स्पर्शाने विवेकानंदांचे अंतरंग उजळून निघाले नसते, तर कदाचित भारत वर्षास बुद्धिमान नरेंद्र भेटला असता; परंतु संस्कृती पुत्र विवेकानंद भेटले नसते. हीच स्पर्श नावाची शक्ती जेव्हा विषयामध्ये परावर्तित होते, तेव्हा मात्र तनामनात वासना विकाराच्या नागिणी सळसळू लागतात. केवळ एका स्पर्श सुखासाठी माणसासकट वस्त्या जाळल्या जातात. स्त्री देहाकडे माता, देवी, भगिनी, भवानी, आदिशक्ती म्हणून पाहण्याचे दिवस इतिहासजमा होतात आणि तिला फक्त स्पर्शसुख देणारी एक वस्तू मानले जाऊ लागते. तेव्हा स्पर्श नावाचा विषय जीवनातील शिवत्वालाच ‘खो’ घालण्याचे काम करतो. प्राणीसृष्टीत कधी-कधी गुरा-पाखरांनासुद्धा माता भगिनींचा स्पर्श कळतो आणि वात्सल्याचे झरे झुळझुळ वाहू लागतात, पण हेच जेव्हा माणसाला कळेनासे होते, तेव्हा त्याच्या लेखी स्पर्श हा सतत वासनेचा वणवा शांत करणारा उपचार ठरतो. म्हणूनच आपल्या साधू-संतांनी विशिष्ट अवस्थेनंतर स्पर्शाचा जाणीवपूर्वक त्याग केला. केवळ वासनात्मक स्पर्शाचाच नव्हे, तर उच्च-उच्च आसने, मोठमोठ्या गाद्या, गिरद्या, छत्र चामरे, शिष्यांकडून करून घेतली जाणारी शारीरिक सेवा जसे हातपाय चेपणे, हळदी कुंकवाने पायघुणी करून घेणे इ.चा जाणीवपूर्वक त्याग केला. कारण हे सर्व प्रकार स्पर्श नावाच्या विषयाचे भाऊबंद आहेत. जे चोर पावलांनी तना-मनावर मोहिनी घालतात आणि साधक पथभ्रष्ट व्हायला वेळ लागत नाही. जर माकडाला दारू पाजली व त्याच्या हातात मशाल दिली, तर ते गावाला आग लावल्याशिवाय राहत नाही, तसेच आहे. स्पर्श नावाच्या विषयाचे म्हणून ज्याला
खरोखर साधक व्हायचे, त्याने स्पर्श नावाच्या विषयास ओळखावे. असा सदुपदेश देताना संत एकनाथ महाराज म्हणतात -
चिरंजीवपद पावयासी, अन् उपाय नाही साधकासी
नर-नारी सुश्रृषा करिती, उत्तम मध्यम
आसने घालिती, तेणे धरे स्पर्श प्रीती ।

Web Title: These touch points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.