अनंत बुद्धीचे तरंग । क्षणाक्षणा पालटती रंग ॥
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 06:21 PM2020-02-15T18:21:28+5:302020-02-15T18:23:43+5:30
तुकाराम महाराज भवसिंधू तरुन जाण्यासाठी फक्त विचाराचेच साधन सांगतात
- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)
परमेश्वराने जी सृष्टी निर्माण केली त्यामध्ये जारज, स्वेदज, अंडज व उद्भिज अशा प्रकारच्या चार खाणी निर्माण केल्या. त्यांपैकी जारज खाणीतून मनुष्य निर्माण केला. मनुष्याला बुद्धी व ज्ञान असल्याने तो दुःख निवृत्ती करु शकतो व याच ज्ञानाने परमानंद सुखाची प्राप्तीही करुन घेऊ शकतो पण ज्ञानप्राप्ती करुन घेण्यासाठी काय करायला हवे..? तर, तुकोबांनी उपाय सांगितला आहे. महाराज म्हणतात -
क्षणोक्षणा हाचि करावा विचार ।
तरावया पार भवसिंधू ॥
हा देह अत्यंत क्षणभंगूर असल्याने जो विचार करणार आहात तो क्षणोक्षणी करा, दिरंगाई नको. भवसिंधू तरुन जाण्याचा उपाय सोपा असला तरी हा उपाय क्षणोक्षणी करावा लागेल. कारण महाराज म्हणतात -
अनंत बुद्धीचे तरंग । क्षणाक्षणा पालटती रंग ॥
ज्या कर्माचे जसे संस्कार असतील तशीच बुद्धी होते.
शास्त्रकार म्हणतात -
बुद्धि: कर्मानुसारिणी ।
आपण म्हणाल, वेदशास्त्राने एवढी साधने सांगितली असतांना नुसत्या विचाराने काय होणार..? वेद शास्त्राने भवसिंधू तरुन जाण्यास योग, याग, तप, जप, इ. अनेक साधनें सांगितली मात्र तुकाराम महाराज या ठिकाणी भवसिंधू तरुन जाण्यासाठी फक्त विचाराचेच साधन सांगतात हे कसे..?
आज कलियुगाचा विचार करता, तुकाराम महाराज म्हणतात -
अवघ्या वाटा झाल्या क्षीण । कलि न घडे साधन ॥
उचित विधी विधान । न कळे न घडे सर्वथा ॥
ही सर्व साधनें फारच अवघड आहेत. सध्याच्या काळात या शास्त्रातील कर्मे यथासांग घडणें खूप कठिण काम आहे. आणि जर कर्म यथासांग घडले नाही तर संत म्हणतात -
कर्म धर्म न होती सांग । उण्या अंगे पतन ॥
ही सर्व साधनें भवसिंधूत ढकलणारी आहेत. एकमेव विचार हीच साधना भवसिंधुतून निवृत्त करणारी आहे..!
( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा दूरभाष क्रमांक ९४२१३४४९६० )