गुरूंच्या सेवेतूनच मनातील इच्छा पूर्ण होतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 02:24 PM2021-01-09T14:24:34+5:302021-01-09T14:42:41+5:30
जे शहाणे आहेत त्यांनी श्री गुरूंची सेवा करावी. म्हणजे त्यांच्या मनातील सर्व हेतू सिध्दीस जातील. यासाठी सर्वांनी गुरूंची सेवा करणे गरजेचे आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील ओवीमध्ये गुरूसेवेबद्दल काय सांगितले वाचा..
म्हणोनि जाणतेने गुरू भजिजो । तेणे कृतकार्य होई जे ।
जैसे मूळ सिंचने सहजे ।शाखा पल्लव संतोषती ।।
(ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक १, ओवी क्रमांक २५)
ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीमध्ये सांगितले आहे की, जे लोक रूप, रस, गंध, स्पर्श, शब्द व काम, क्रोध, शोक, मोह, भय, षडकिराने विलीन होतात. त्याच्याविषयी सांगितले आहे.
पामर- जे लोक पाप व पुण्य याचा विचार करत नाही. धर्म व अधर्म याचा विचार करीत नाहीत व तामस वृत्तीने आपल्या म्हणण्याप्रमाणे आचरण करतात. त्याला पामर असे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे.
याचे उदाहरण द्यायचे झाले तर आज सध्या मद्यपान करणारे, मांसाहार करणारे, अधर्माने वागणारे समाजात बरेच लोक आहेत.
रूप- पतंग दिव्याचा प्रकाश पाहून त्यावर झडप घालतात आणि मरतात.
रस- मासे मारणारे कोळी मासे मारण्याच्या आपल्या लोखंडी गळाचे आकडे एकत्र जमवून त्यावर आमिष म्हणून काही तरी खाण्याचा पदार्थ बांधून तो गळ पाण्यात सोडतात. लगेच पाण्यातील मासे त्या पदार्थाच्या आषिलाषेने त्या पदार्थातच म्हणजे लोखंडी गळासच आपले तोंडे खुपसून मरण पावतात. यासाठी रस हा विषय दु:खाचे कारण आहे.
गंध- एखाद्या सूर्य विकासी प्रफुल्लीत कमळावर एखादा भ्रमर सुंगधाच्या आभिलाषेने बसून राहतो. सूर्यास्ताबरोबर ते कमळ मिटते. तथापी तो सुवासच्या लोभाने त्यातून बाहेर पडत नाही. काही वेळाने तेथे हत्ती येऊन कमळ उपटून खाऊन टाकतो. याचा अर्थ कमळाबरोबर भ्रमर मरण पावतो म्हणून गंध विषय दु:खाला कारण बनतो.
स्पर्श- हत्ती पकडणारे एक हत्तीण लाकडी बनवितात. तिला रंग देतात व खड्डा करतात. हत्ती हत्तीणीला पाहून अशक्त होतो. खड्ड्यात जाऊन पडतो. याचा अर्थ असा की, अशक्त होऊन हत्ती नाश पावतो. स्पर्श विषय दु:खाला कारण होतो.
शब्द- एकदा एक लबाड सुस्वर कंठाचा पारधी रानात मुद्दाम सुस्वर गाऊ लागतो. त्याच्या गाण्याला नादवून हरीण फाश्यामध्ये अडकते व मरण पावते. याचा अर्थ असा की, शब्द हा विषय दु:खाला कारण बनतो.
रिकामा- याबाबत संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, या वर्गाला काहीच न करण्याची इच्छा असते, त्या वर्गाला रिकामा असे म्हटले जाते.
जिज्ञासा- या वर्गाला ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे की, हे लोक धर्म व अधर्म, पाप व पुण्य हे जाणून धर्माने वागतात. गुरूंची सेवा करतात. आचरण चांगले असते म्हणून महाराजांनी त्याला जिज्ञासू असे म्हटले आहे.
या सर्वाचा सार असा आहे की, जे गुरूची सेवा करतात. त्यांची सर्व इच्छा भगवान (देव) पुरी करतो. त्यासाठी महाराजांनी झाडाच्या मुळाला पाणी घातले की झाडांची पाने आपोआप टवटवीत होतात, असे म्हटले आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर प्रभू रामचंद्रांनी विश्वमित्र वशिष्ठऋषींची सेवा केली. भगवान श्रीकृष्णाने संदीपनऋषींची सेवा केली.
-गोरक्षनाथ महाराज शिंदे
दत्त मंदिर प्रमुख, तळवडी (ता. कर्जत), जि. अहमदनगर.
(९८५०९५६८२७)