मनात निर्माण होणारे विचारच आपल्या जीवनाला देतात आकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 04:56 AM2018-12-08T04:56:52+5:302018-12-08T04:57:06+5:30
- प्रल्हाद वामनराव पै ‘विचार करा विचार’ या लेखमालेत आपण पाहिले की, आपल्या मनात निर्माण होणारे विचारच आपल्या जीवनाला ...
- प्रल्हाद वामनराव पै
‘विचार करा विचार’ या लेखमालेत आपण पाहिले की, आपल्या मनात निर्माण होणारे विचारच आपल्या जीवनाला आकार देत असतात. म्हणून जीवनविद्या सांगते की, विचार तसा जीवनाला आकार आणि म्हणूनच या विचारांकडे प्रयत्नपूर्वक लक्ष दिल्यास लक्षात येते की आपण सकारात्मक विचार करतो की नकारात्मक विचार करतो. यासाठी आपण सतत आपल्या विचारांकडे लक्ष द्यायला हवे. कारण आपण व्यवहारात पाहतो की जर मुलांकडे नीट लक्ष दिले नाही तर मुले बिघडतात. आर्थिक व्यवहाराकडे लक्ष दिले नाही तर नुकसान होते. आरोग्याकडे दुर्लक्ष केले की आरोग्य बिघडते. पत्नीकडे दुर्लक्ष केले की नशीब बिघडते. म्हणजेच आपण व्यस्त जीवन जगत असलो तरी आपण जातीने जसे वरील बाबींकडे लक्ष देतो त्याचप्रमाणे विचारांकडे लक्ष द्यायला हवे. आपले विचार हे आपणच निर्माण केलेली आपली मुलेच आहेत.
या विचारांना रंग असतो, म्हणजे काही लोक काळवंडलेले विचार करीत असतात. त्यात चिंता, काळजी, दु:ख, खेद, निराशा, भय, त्वेष असे कलुषित रंग असतात तर काहींच्या विचारात आनंद, यश, प्रेम, सुख, समाधान यांचे सुंदर रंग भरलेले असतात.
विचारांना गंध असतो म्हणजे एखाद्याचे मत्सराचे विचार ऐकले की आपण सहज म्हणतो याच्या बोलण्यात कुजकट वास येतोय. याउलट काहींच्या बोलण्याला प्रेमाचा, मायेचा सुगंध येतो. विचारांना आकार असतो कारण काहींचे विचार हे छोटे, स्वत:भोवती फिरणारे, संकुचित वृत्तीचे असतात तर काहींचे विचार हे मोठे व्यापक, देशहिताचे, सर्वांच्या कल्याणाचे असतात.
विचारांना तेज असते कारण काहींचे विचार तेजस्वी असतात. असे तेजस्वी विचार ऐकल्याने इतरांना स्फूरण येते, प्रेरणा मिळते. असे समाजाला दिशा दाखवणारे, तेजस्वी विचार देणारे अनेक महात्मे, तत्त्वज्ञ या भारतभूमीत जन्माला आले. त्यांच्या विचारांचे आचरण केल्याने आपलेही विचार व्यापक होऊ शकतात.