तुझी प्रेमखूण देवोनिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 10:56 AM2019-01-19T10:56:42+5:302019-01-19T10:57:47+5:30
मनुष्याचा जन्म मिळालाय. हा नेमका कशासाठी मिळाला, हे आम्हाला समजत नाही. या जन्माचा काहीतरी हेतू आहे. कारण कोणतेही कर्म हेतूशिवाय होत नसते
मनुष्याचा जन्म मिळालाय. हा नेमका कशासाठी मिळाला, हे आम्हाला समजत नाही. या जन्माचा काहीतरी हेतू आहे. कारण कोणतेही कर्म हेतूशिवाय होत नसते. मनुष्य जन्माचा खरा हेतू म्हणजे जीवनमुक्ती मिळविणे, जीवनमुक्ती म्हणजे जीवनापासून मुक्ती नव्हे तर जीवनाचा खरा अर्थ समजणे. हा देह म्हणजे काय? मी कोण आहे? हा देह मी आहे कि देह माझा आहे? किंवा मी देहाचा साक्षी आहे? या प्रश्नाची उत्तरे मिळण्याकरिता मानव जन्म आहे. मरण येत नाही म्हणून जगणारे पुष्कळ आहेत. त्यांच्यात आणि पशुत काहीही फरक नाही. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात ‘पूस नाही पाद चारी । मनुष्य परी कुत्री ती ।।’ आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थच जर कळाला नाही तर आपली अवस्था महाराजांनी सांगितल्याप्रमाणे होईल यात शंका नाही. म्हणून मनुष्याला एक जाणीव हवी कि मी जन्माला का आलो आहे? तर जन्माला यायचे कारण म्हणजे याच जन्मात असे ज्ञान मिळवायचे कि ज्या ज्ञानाने पुन्हा जन्म होणार नाही. कारण जन्म -मृत्य हे मोठे दु:ख आहे व हे दु:ख निवृत्त करता येते पण त्याची खूण आपल्याला माहित नसते. त्यामुळे ते दु:ख नाहीसे पण होत नाही. श्री तुकाराम महाराज एका अभंगात फार छान सांगतात ‘जाणोनी नेणते करी माझे मन। तुझी प्रेमखूण देवोनिया॥ १॥ मग मी व्यवहारी असेन वर्तत। जेवी जळा आत पद्मपत्र॥२॥ ऐकोनी नाईके निंदास्तुती कानी। जैसा का उन्मनी योगीराज॥३॥ देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी। स्वप्नीचिया सृष्टी चेइल्या जेवी॥४॥ तुका म्हणे ऐसे झालीया वाचून। करणे तो शीण वाहतसे॥५॥’ सुंदर जीवन जगण्याची हि मार्मिक हातवटी आहे. चांगले जीवन जगण्याची हि एक शैली आहे. जाणोनि नेणते करी माझे मन .. हे फार महत्वाचे आहे. कारण हे मन सतत काही तरी संकल्प विकल्प करीत असते. ( संकल्प विकल्पात्मक मन:।।) मन कधी स्थिर असे लवकर होतच नाही या मनाला स्थिर करता आले कि समजा तुम्हाला ख-या सुखाचा मार्ग मिळाला. कळून न कळल्यासारखे राहायचे पण! आमचे वेगळे आहे. आम्हाला काहीच कळत नसते. तरीही आम्ही खूप काही कळल्यासारखे वागत असतो. हा खरे तर मूर्खपणाच असतो.
नेणून नेणता, नेणून जाणता, जाणून जाणता आणि जाणून नेणता असे साधारणपणे चार वर्ग मानवाचे पाडता येतात. पहिला वर्ग असा असतो कि त्याला काहीच कळत नसते. धड परमार्थ कळत नसतोच, पण प्रपंच सुद्धा कळत नसतो. याला काय म्हणणार ‘प्रत्यक्ष मूर्ख’. एक मुलगा होता. त्याला कसे वागावे हेच कळत नसे, घरात पाहुणे आले कि हा त्यांच्या मध्ये यायचा आणि पाय पसरून बसायचा. घरातील सर्वांनी त्याचे नाव ठेवले कि हा प्रत्यक्ष मूर्ख आहे. त्याला वाटायचे मला हे मुद्दाम असे म्हणतात. आपण आपले नाव बदलून टाकूया म्हणून तो फिरत फिरत दुस-या एका गावाला गेला. तहान लागली म्हणून नदीकाठी एक झरा होता त्या झ-यावर तो पाणी पिण्यासाठी गेला. झ-यात मध्यभागी उभा राहिला आणि खाकरून खोकरून त्याच झ-यामध्ये थुंकला. एवढ्यात काही स्त्रिया पाणी भरण्यासाठी त्याच झ-यावर आल्या आणि त्यांनी ह्याचे हे वागणे बघितले. रागाने त्या स्त्रिया म्हणाल्या, ‘ए ! मूर्खां ! जे पाणी प्यायचे आहे त्याच पाण्यात तू थुंकला, मूर्ख आहेस का ? हा म्हणतो अरे! मी इतक्या दूरवर आलो. तरी तुम्ही मला कसे ओळखले ? त्या स्त्रिया म्हणाल्या ‘अरे वेड्या ! तुझे आचरणच असे आहे कि जगात कुठेही गेला तरीही लोक तुला ओळखणारच. तात्पर्य हा नेणून नेणता.
काही लोक असे असतात कि त्यांना काही कळत नसते. कळत असल्याचा आव आणीत असतात. मोठमोठ्या गप्पा मारण्यात हुशार असतात. असे वाटते कि याला सर्व माहीतच आहे पण त्याला माहित नसते. यालाच नेणून जाणता म्हणतात. तिसरा वर्ग हा जाणून जाणत्याचा असतो. ह्याला परमाथार्तील माहित असते तसेच ह्याला प्रपंच कसा आहे हे हि माहित असते. ह्याला जाणून जाणता म्हणतात. हे जास्त बोलत असतो कारण ह्याला दोन्हीकडील माहित असते व ते ह्याच्या पोटात राहत नाही. चौथा वर्ग जो असतो तो फार महत्वाचा आहे तो म्हणजे ‘जाणून नेणता’ ह्याला खरे अध्यात्म कळलेले असते खरे ज्ञान यास झालेले असते पण ! व्यर्थ बडबड करीत नाही तर आपल्याला काहीच माहित नसल्यासारखे जगात वावरत असतो. ‘विश्व साक्षी योगी राणा । जाणे सर्वांतरींच्या खुणा । परी तो जना वाटे । वेडियाऐसा ।। मुकुंदराज स्वामी ।।’ किंवा माउली म्हणतात ‘महिमेभेणे दडे । नेणिवेमाजी ।।’ आपल्याला मोठेपण येईल, महिमा येईल म्हणून तो अज्ञानी मनुष्यासारखा वागत असतो.
‘जडभरत राजा हरणिगर्भा गेला । घाला तो घातला वासनेने ।।’ हा जाडंभरत तिस-या जन्मामध्ये एका ब्रह्माणांच्या घरी जन्माला गेला. पण त्याला माहित होते कि फक्त वासना आपल्याला आडवी आली आणि तीन जन्म घ्यावे लागले. तेव्हा आता या जन्मी कोणाशीही बोलायचे नाही तो असाच वेड्यासारखा राहायचा. कोणीच त्याला ओळखले नाही पण राहूगण राजाची भेट झाली. त्या राजाने ह्याला पालखीला खांदा द्यायला सांगितले. ह्यानेहि नाही म्हटले नाही. चालत असताना खाली त्याला मुंग्यांची रांग दिसली म्हणून पाय उचलून टाकला तर पालखीत राज्याच्या डोक्याला लागले तेव्हा राजाने विचारले अरे ! तुला नीट खांद्यावर ओझे पण घेऊन चालता येत नाही का ? इथे मात्र जडभरातला राहावले नाही आणि त्याने पालखी खाली ठेवली आणि त्या राहूगण राजाला अध्यात्म ज्ञान सांगितले. तात्पर्य हा जाणून नेणता असलेला जीवनमुक्त महात्म्याचा श्रेष्ठ वर्ग.
श्री तुकाराम महाराज म्हणतात ‘मला जाणून नेणता कर पण देवा ! त्याचबरोबर तुझी प्रेमखूण मला दे कारण प्रेमाशिवाय कोणतेही कार्य शून्य असते. ग्रंथ पढी पढी पंडित हुवा ना कोय । ढाई अक्षर प्रेमका पढे सो पंडित होई ।। संत कबीर । श्री एकनाथ महाराज म्हणतात, ‘भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा त्यामाजी ।।१।। प्रेमसुख देई प्रेमसुख देई । प्रेमाविण नाही समाधान ।।२।। म्हणून जाणून नेणते व्हायचे पण सोबत प्रेमखूण महत्वाची असे असल्यावर ते खरे जीवन्मुक्त जीवन हीच खरी ‘लाईफ स्टाईल’ पाण्यात जसे कमळाचे पान असते पण त्याला पाणी लागत नाही तसे माझे जीवन अनासक्ती रहित होईल.
जेव्हा असे जाणोन नेणते होता येते. तेव्हा निंदा स्तुती जरी ऐकू आल्या. तरी मनावर काहीही परिणाम होतानाही एखादा योगी जसा उन्मन अवस्थेत असतो तसे हे जीवन होईल. स्वप्नांतील गोष्टी जशा जागे झाल्यावर मिथ्या ठरतात तसे मी हा प्रपंच पाहून न पाहिल्यासारखे करिन म्हणजे माज्या दृष्टीने प्रपंच हा प्रपंच नसून अवघे विश्व देवच आहे असा माझा अनुभव असेल. आणि हे पांडुरंगा असे जर न होईल तर जीवन म्हणजे व्यर्थ शीणच आहे दुसरे काहीही नाही. म्हणून मित्रानो ! चांगले जीवन जगायचे असेल तर जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवले तर आपले जीवन जीवन्मुक्त माहात्म्यासारखे होईल.
भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
गुरुकुल भागवताश्रम , चिचोंडी(पाटील) ता. नगर जि.अहमदनगर
मोबाईल ९४२२२२०६०३