आनंदाकडचा प्रवास आनंदायन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 06:30 PM2018-11-06T18:30:13+5:302018-11-06T18:30:32+5:30
सुखापेक्षा आनंद बरा.! तो आपल्याला विचारतोय मला सांगा.. सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य केलं की ते घरबसल्या मिळतं?
- रमेश सप्रे
सुखापेक्षा आनंद बरा.!
तो आपल्याला विचारतोय
मला सांगा.. सुख म्हणजे नक्की काय असतं?
काय पुण्य केलं की ते घरबसल्या मिळतं?
असं गात म्हणताना तो नि त्याची ती आनंदात नाचत-बागडत असतात. मागची साधी भिंत सुंदर पर्वतासारखी भासते तर समोरचा जलाशय नितळ सरोवरच बनून जातो. दोघंही उमलत असतात, फुलत असतात. झुल्यावाचून झुलत असतात.
हे साधं गद्य प्रश्न विचारणारं गाणं एक महत्त्वाचं जीवनसूत्र सांगून जातं.
सुख म्हणजे काय हे जरी समजलं नाही तरी ते घरबसल्या मिळू शकतं.
हे खरंच आहे की सुखाच्या अनुभवासाठी दाहीदिशा वणवण करण्याची गरज नाही. इथलं घर म्हणजे दगडविटांची वास्तू नाही तर ते अगदी आपलं अंतरंग-अंत:करणही असू शकतं.
एका शिबिरात पहिल्या दिवशी एक गृहपाठ दिला गेला. आपापल्या सुखी होण्याच्या कल्पनेनुसार सुख देणा-या वस्तूंची यादी करायची. अनेकांनी घर, गाडी, सुखसोयीची साधनं यांची समग्र यादी तयार करून आणली.
दुसरे दिवशी या प्रत्येक गोष्टीपुढे अंदाजे किंमत लिहून एकूण किती रक्कम मिळाली की हव्या त्या वस्तू घेऊन आपण सुखी होऊ हे लिहून आणायला सांगितलं. त्याप्रमाणो केल्यानंतर पुढचा गृहपाठ दिला की सा-या ठिकाणाहून मिळणा-या उत्पन्नाचा पैशाचा विचार करून सुखी होण्यासाठी आवश्यक तितके पैसे मिळवायला किती दिवस लागतील त्याचा विचार करायला सांगितला. एका अर्थी प्रत्येकाचा सुखी होण्याचा मुहूर्त ठरला. आता एक विचार पुढे आला की आवश्यक तेवढे पैसे साठण्यासाठी काही वर्षे लागतील. त्या कालात आपल्या यादीतील वस्तूंच्या किमती वाढणार नाहीत का? म्हणजे सुखी होण्याचा दिवस आणखी पुढे गेला नि तो असा जातच राहणार. कारण परिस्थिती बदलत राहणार नि ती आपल्या हातात नसणार.
म्हणजे कुणी सुखी होणारच नाही की काय?
असं असेल तर साधूसंत, महात्मे सत्पुरुष सुखी नव्हते? समर्थ रामदास मनाच्या श्लोकात म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे।
हा प्रश्न नाहिये. कारण पुढच्याच ओळीत ते सांगतात
विचारे मना तूचि शोधूनि पाहे।।
म्हणजे विचार करून, चिंतन करून समजून घेतलं पाहिजे की सदैव सुखात असणारे कोण आहेत नि ते तसे कसे बनले?
यासाठी आपल्याला प्रथम सुख म्हणजे काय ते निश्चित समजलं पाहिजे.
‘सुख’ या छोटय़ा शब्दाचे दोन भाग आहेत. ‘सु’ म्हणजे चांगले. शुभ, कल्याणकारी आणि ‘ख’ म्हणजे आकाश, परिसर, भवताल (आजूबाजूची परिस्थिती) सुखाचा सरळ अर्थ आहे आपल्या भोवती असलेलं, नव्हे आपण निर्माण केलेलं व्यक्ती- वस्तूचं जग जे आपल्याला सुख देणारं असतं. सुखाचा संबंध देहाच्या उपभोगांशी, आरामाशी येतो. त्यामुळे सुख हे सदैव वस्तू, व्यक्ती, परिस्थिती यांच्यावर अवलंबून असतं. अन् या सा-या गोष्टी सदैव बदलणा-या असतात म्हणून संत सांगतात-
‘सुख सुख म्हणता हे दु:ख ठाकून आले’ ‘सुख जवापाडे, दु:ख पर्वताएवढे’
म्हणून सुखाऐवजी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. आनंद कशावरही अवलंबून नसतो. सुखभोगाच्या वस्तू असल्या तरी तसेच नसल्या तरी आनंदात राहता येतं. आनंदाचा उगम आपल्या आतच असतो. तो अखंड उसळत असतो. ख-या आनंदी व्यक्तीमधून आनंदाचा प्रवाह आतून बाहेर वाहत असतो. तो सर्वाना आनंदी बनवत असतो.
प्रपंचात कितीही संकटं आली तरी तुकारामाचा अनुभव हाच होता.
आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचे।।
आनंदमार्गी मी, आनंदयात्री मी.. म्हणणारे कवी अनेक असतात; पण ख-या आनंदाचा अनुभव घेणारे संत नि महामानव वेगळेच असतात. त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेत आपण सुरु ठेवू या आपला आनंदाकडचा प्रवास आनंदायन!