खरी स्पर्धा : समजावून सांगणारे आईबाबा मिळाले नसते, तर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 02:33 PM2020-02-05T14:33:57+5:302020-02-05T14:34:10+5:30
एका प्रतिष्ठित संस्थेनं आयोजित केलेल्या कथाकथन स्पर्धेत स्फूर्तीनं भाग घेतला होता.
- रमेश सप्रे
‘यापुढे मी एकाही स्पर्धेत भाग घेणार नाही’ असे म्हणत काहीसं रडत स्फूर्तीनं हातातलं बक्षिसाचं पाकीट भिरकावलं. त्याचवेळी ऑफिसमधून परतलेल्या बाबांच्या पायापाशी ते पडलं. ते उचलून घेत बाबा हसत हसत म्हणाले, ‘हे काय नवीन नाटक?’ हे ऐकल्यावर छोटी स्फूर्ती धावत जाऊन बाबांना बिलगली नि स्फुंदून स्फुंदून रडू लागली. यावर आई म्हणाली, ‘आल्यापासून हेच चाललंय. काय झालं हे धड सांगतही नाही. नुसतं ‘स्पर्धेत भाग घेणार नाही.. एकाही स्पर्धेत भाग घेणार नाही’ एवढंच रडक्या स्वरात म्हणतेय. बाबा तिला नीट जवळ घेत म्हणाले, ‘आपल्या बाबांनाही सांगणार नाहीस काय घडलं ते?’ आपल्याला समजून घेणारं, आधार देणारं कुणीतरी आहे हे लक्षात आल्यावर स्फूर्तीनं सारा प्रकार सांगितला. तो ऐकून हसावं की रडावं हेच आईबाबांना कळेना. पण बाबांना एक मात्र कळलं की काहीतरी अडचण आहे. वेळीच दूर केली नाही तर पुढे मोठी समस्या बनू शकते.
त्याचं असं झालं. एका प्रतिष्ठित संस्थेनं आयोजित केलेल्या कथाकथन स्पर्धेत स्फूर्तीनं भाग घेतला होता. ‘संस्कार कथा’ हा विषय होता. शाळेतल्या स्पर्धेत स्फूर्ती पहिली आली. नंतर तालुका पातळीवरील स्पर्धेतही पहिली आणि साहजिकच राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी तिची निवड झाली. प्रत्येक तालुक्यातल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्याबरोबर होणारी ही स्पर्धा अर्थातच कथाकथन कौशल्याचा कस पाहणारी होती. स्फूर्तीनं शाळेत ‘देशभक्तीच्या संस्कारां’बद्दल सांगितलेली गोष्ट खरोखर हृदयस्पर्शी होती. तालुका पातळीवरील स्पर्धेत तिनं ‘देशभक्तीचा संस्कार’ घडवणारी साभिनय सादर केलेली कथा सर्वाना भावली. अध्यक्षांनी खूप कौतुक केलं.
आता उरली राज्यपातळीवरील स्पर्धा. खरं तर एकच गोष्ट तिन्ही पातळ्यांवरती सांगितली असती तर चाललं असतं. अनेक विद्याथ्र्यानी तसं केलंही होतं; पण स्फूर्तीचा स्वभाव नावाप्रमाणेच उत्स्फूर्त होता. दरवेळी काहीतरी नवीन करण्यावर तिचा भर असे. चौथीत असलेल्या स्फूर्तीच्या या स्वभावाचं तिच्या पालकांना नि इतरांना खूप कौतुक वाटायचे. शाळेतल्या शिक्षकांना मात्र ही उगीच कटकट वाटे. त्यातून तिचे चौथीचे वर्ग शिक्षक म्हणजे निरुत्साहाचा नि आळसाचा मेरुमणी होते. कोणतीही नवी गोष्ट करायला त्यांची तयारी नसे.
हेच पाहा ना. स्फूर्तीला स्पर्धेच्या ठिकाणी नेणं, तिथं थांबणं नि परत आणणं हे सारं त्यांच्या मनाविरुद्ध होतं. ‘कशाला उगीच तालुक्याला पहिलं बक्षीस मिळवलंस? त्यामुळे पुढची कटकट वाढली ना?’ हा त्यांच्या मनातला विचार त्यांनी स्फूर्तीला अनेकदा ऐकवला. त्यामुळे स्फूर्तीचा ब-यापैकी अवसानघात झाला होता. महाभारतात युद्धप्रसंगी शूरवीर कर्णाचा सारथी शल्य त्याचा असाच तेजोभंग करत होता. हे उदाहरण मोठं वाटलं तरी जवळपास असाच अनुभव स्फूर्तीलाही तिच्या गुरुजींच्या वागण्या बोलण्यातून येत होता; पण बिचारी करणार काय? तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होती बिचारी. सुदैवानं आई बाबा समजून घेणारे नि उत्तेजन देणारे होते.
स्पर्धेचं ठिकाण खूप दूर होतं, त्यामुळे वाटभर गुरूजी नुसते गुरगुरत होते. त्याहीवेळी स्फूर्तीला प्रथम पारितोषिक मिळालं. तिनं ‘माणुसकीच्या संस्कारा’बद्दल सांगितलेली कथा ऐकून अनेकांचे डोळे पाणावले होते. स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. पारितोषिक वितरणाच्या वेळी छोटय़ा स्फूर्तीला अध्यक्षांनी उचलून घेतलं नी सर्वाना उभं राहून टाळ्या वाजवायला सांगितल्या. त्यावेळी झालेला टाळ्याचा कडकडाट आकाशातील विजेच्या गडगडाटासारखा होता.
स्फूर्ती धावत आपल्या गुरूजींकडे आली. पाठीवर शाबासकी मिळणार या अपेक्षेनं तिनं पाकीट गुरूजीकडे दिलं. त्यांनी सर्वप्रथम ते उघडून पाहिलं. आत फक्त सात रुपये होते. त्या काळचे ते सात रुपये आजच्या सत्तर रूपयांएवढे होते. स्पर्धा आयोजित करणारी संस्था तळमळीनं कार्य करणारी होती; पण श्रीमंत नव्हती. अर्थात बक्षिसाचं मोल काय रुपयात मोजायचं असतं? पैशातली किंमत (प्राईस) नि बक्षीस (प्राईझ) यांची तुलनाच होऊ शकत नाही.
या प्रकारानं निराश झालेल्या स्फूर्तीच्या मनाला पुन्हा टवटवीत पालवी फुटावी हे आईवडिलांच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. बाबांनी आईसमोर स्फूर्तीला जवळ बसवून छान समजावून सांगितलं. ‘हे बघ स्फूर्ती, तुझ्या बाबांना सात हजार रुपये पगार आहे. तो बाबांना कसा मिळतो? ऑफीसमध्ये सही करायची नि पगाराचा चेक घ्यायचा बस! तेव्हा कोण टाळ्या वाजवतं? कोण बाबांना उचलून घेऊन शाबासकी देतो? अन् बाबांचा पगार घेतानाचा फोटो काय दुस-या दिवशीच्या वर्तमानपत्रात येतो?’
यावर आई उद्गारली, ‘छे! पण आमच्या स्फूर्तीबाईंचा मात्र उद्या येणार. सगळेजण पाहणार नि कौतुक करणार. हो ना?’ यावर स्फूर्तीची कळी खुलली. ‘आता कळलं बक्षीस कशाला म्हणतात ते! यापुढे मी प्रत्येक स्पर्धेत भाग घेणार.’ या तिच्या उत्स्फूर्त उद्गारांवर बाबा म्हणाले, ‘खरं बक्षीस स्पर्धेत भाग घेणं, खूप तयारी करणं आणि चांगल्यात चांगली कामगिरी करणं हेच असतं. पार्टिसिपेशन इज् द प्राईझ’ स्पर्धेतील सहभाग हेच खरं बक्षीस असतं. जीवनाच्या बाबतीत हा संस्कार किती अमूल्य आहे ना? ...राहून राहून एक विचार मात्र मनात येतो स्फूर्तीला जर समजून घेणारे नि समजावून सांगणारे आईबाबा मिळाले नसते, तर!