जीवनाचे खरे सार यातच..!
By appasaheb.patil | Published: December 7, 2019 12:14 PM2019-12-07T12:14:34+5:302019-12-07T12:14:53+5:30
जीवनात घटना फार कमी घडतात आणि त्याच्या प्रतिक्रियाच फार होतात.
भगवान श्रीकृष्ण आपल्या परमभक्तावर अत्यंत प्रसन्न झाले होते म्हणून तर भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अजुर्नाची विश्वरूप दर्शनाची इच्छा पूर्ण केली होती. अजुर्नाला भगवंतांचे चतुर्भुज दर्शन झाले ते केवळ भगवंतांवरील अतूट भक्तीमुळेच. प्रापंचिक वृत्तीला पूर्णपणे छेद केल्यावर, हवे-नकोचा खेळ संपल्यावर, निष्काम बुद्धीने कर्म करण्याची प्रवृत्ती वाढल्यावर, भक्तीमयी आयुष्याची खरी सुरुवात होते. जीवनाचे खरे सार यातच आहे.
जीवनात घटना फार कमी घडतात आणि त्याच्या प्रतिक्रियाच फार होतात. आजचा दिवस हा जवळ-जवळ कालचाच दिवस असतो. आजचा दिवस माणसे आज जगतच नाहीत. ते जगतात शिळा झालेला, निघून गेलेला, भूतकाळात गेलेला कालचा दिवस. त्यामुळे त्यांना जीवनात आणि जगण्यात काही रसच राहात नाही. सर्वकाही निरस होऊन जातं. रोज रोज तेच ते. तोच दिनक्रम, तीच माणसे, तोच रस्ता, तेच काम, तेच जेवण, तेच घर, तेच आॅफिस, तीच नोकरी किंवा तोच धंदा, तीच गिºहाईके, त्यांच्याशी तेच ते बोलणे, जीवनाचा एक साचा होऊन गेलेला असतो. माणूस घाण्याच्या बैलाप्रमाणे त्याच त्या रिंगणातून फिरत असतो. त्याला जीवन जगताच येत नाही. जीवनात प्रत्येक क्षण आनंदोत्सव बनवता येत नाही. जीवन हे खळाळत्या ओसंडून वाहाणा?्या वाहात्या झºयाप्रमाणे आहे. ते नाविन्याने ओथंबलेले आहे. रसरसलेले आहे. मात्र माणसाला त्यातील मजा घेता येत नाही. त्यामुळे ते नको तिकडे मजा शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी वेगवेगळे सण-समारंभ साजरे करतात. अधे-मधे ट्रीप काढतात. मोठ्या दणक्यात कार्यक्रम साजरे करतात. काहीतरी निमित्त शोधतात आणि कार्यक्रम घेतात. असे कार्यक्रम घेण्यामागचे मानसशास्त्र असे आहे की, या मंडळींना जीवनातील जो मूळ आनंद आहे, तो सापडलेला नसतो. तो दुसरीकडे आनंद शोधीत फिरतात. कार्यक्रम असेल किंवा सण-समारंभ असेल. तो आनंदासाठीच निर्माण केलेला असतो. मात्र दुर्दैव असे की असे कार्यक्रम करून येणारे लोक दमून जातात. नंतर ते थकतात. कारण त्यातही त्यांना जो मूळ आनंद आहे, तो सापडलेला नसतो. आनंदानुभूती घेतल्यानंतर दमून जाणे किंवा थकून जाणे असे होता कामा नये, आनंदाने माणूस थकत नाही. तो अधिक उत्साही बनतो. अधिक कार्यक्षम बनतो. पण या मंडळींना त्यातही आनंद मिळत नाही. तो केवळ आनंदाभास असतो.
- साईनाथ महाराज स्वामी,
शेळगी, सोलापूर