संतांची खरी शिकवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 02:32 AM2020-03-24T02:32:06+5:302020-03-24T02:32:20+5:30
- मोहनबुवा रामदासी साधु दिसती वेगळाले । परी ते स्वरूपी मिळाले । अवघे मिळोनयेकचिजाले । देहातीतवस्तू ।। आपला महाराष्ट्र ...
- मोहनबुवा रामदासी
साधु दिसती वेगळाले । परी ते स्वरूपी मिळाले ।
अवघे मिळोनयेकचिजाले । देहातीतवस्तू ।।
आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आज या विश्वात, जी काही शांती, समाधानाची ज्योत या भयंकर कलीकाळोखातही टिकून आहे, ती संतांची देणगीच आहे. संत ही हिंदुस्थानची खरी शक्ती आहे. जगात जेव्हा दुष्ट शक्ती डोके वर काढतात तेव्हा संतांची शिकवण ध्यानात ठेवत सज्जन हे दुर्जनांशी दोन हात करीत असतात. संयम आणि योग्य वेळी प्रतिकार यांचा समन्वय हा संतांच्या विचारांतूनच सर्वसामान्यांच्या मनावर ठसत असतो. संतांची शिकवण हीच कायम सन्मार्गावर चालण्यासाठी उपयोगी पडत असते. मात्र वर्तमानकाळी संतांचे जातीपातीनुसार विभाजन करून त्यांच्या कर्तृत्वाला तोकडेपणा आणण्याचे महत्पाप आपण करीत आहोत. संतांचे विचार ज्याला खरोखरच पटलेले असतात तो ते विचार आपल्या आचरणात आणतात. जे केवळ ढोंग करीत असतात त्यांना संत खरे कळलेलेच नाहीत, असे म्हणावे लागेल. आज आपला देश खऱ्या अर्थाने समर्थ व अखंड हिंदुस्थान निर्माण करावयाचा असेल तर जातीभेद, सांप्रदायभेद, वर्णभेद, उच्च-नीच भाव इत्यादी जळमटांना दूर सारून ऐक्याचे दर्शन घडवले पाहिजे. यासाठी दासबोध, मनाचे श्लोक, तुकारामांची गाथा, नाथांचे भागवत, संत नामदेवांचे अभंग, इतरही संतांचे साहित्य आपण भक्तांच्या भूमिकेतून अभ्यासणे आवश्यक आहे. या अनुषंगाने श्रीसमर्थांनी केलेला हा उपदेश अत्यंत मार्मिक आहे. संत जरी विविध गुणकर्मानुसार बाह्यांगाने वेगळे दिसत असले तरी ते अंत:करणाच्या स्थितीने एकरूपच झालेले असतात. परंतु अनुयायी त्यांच्या उपदेशाचा भावार्थ समजून त्याप्रमाणे आचरण न करता मतभेद निर्माण करतात. असे न करता सर्व समाजाने आपापल्या उपासना पद्धतीचे अनुकरण करावे व इतरांच्या दैवत व उपासनामार्गाविषयी आदरभाव ठेवावा. समाजात प्रेम वृद्धिंगत करावे.