मृत्यू नावाचे सत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 06:33 AM2019-01-14T06:33:25+5:302019-01-14T06:33:35+5:30
एकंदरीत काय, मृत्यू नावाची कालभक्षक शक्ती अशी आहे की जिच्यासमोर भणंग भिकाºयापासून ते महासम्राटासमोर सगळे समान आहेत.
- प्रा. शिवाजीराव भुकेले
मृत्यू नावाच्या सर्वभक्षक शक्तीचे अचूक वर्णन करणारी एक बोधकथा बुद्ध चरित्रात मिळते. ‘किसा गौतमी नावाच्या वृद्धेच्या एकुलत्या एक मुलाचा अचानक मृत्यू होतो, तेव्हा ही वृद्धा भगवान गौतम बुद्धांकडे जाते व बुद्धास विनंती करते की, ‘मला माझा मुलगा परत हवा, त्याला जिवंत करा.’ यावर गौतम बुद्ध उत्तर देतात, ‘जरूर मी तुझ्या मुलास जिवंत करेन, पण तत्पूर्वी एक काम कर ज्या घरात एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही अशा घरातून मला मूठभर मोहऱ्या आणून दे!’ किसा गौतमी घर-घर फिरली, पण तिला एकही घर असे सापडले नाही जेथे कुणाचाच मृत्यू झाला नाही. शेवटी ती बुद्धांकडे परत गेली व बुद्धाने तिला जीवन-मृत्यूच्या अढळ सत्याचा सदउपदेश दिला.
एकंदरीत काय, मृत्यू नावाची कालभक्षक शक्ती अशी आहे की जिच्यासमोर भणंग भिकाºयापासून ते महासम्राटासमोर सगळे समान आहेत. त्याच्या विळख्यातून कुणाचीच सुटका होऊ शकत नाही. आयुष्याच्या वाटेवरून चालताना अनेक सखे-सोबती व नात्यागोत्याचा गोतावळा गोळा होतो. काही काळ जीवनाची यात्रा रसमय होते, पण जगण्याचा सुंदर क्षण अनुभवताना मरणाचे स्मरण असावे. ज्याचे नेमके वर्णन करताना भगवद्गीतेत म्हटले आहे -
वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृन्हन्ति नरोपरानी
तथाशरिराणि विहाय जीर्णानि
अन्यानि संयाति नवानि देही।।
संत ज्ञानेश्वर माउलीने यावर सुंदर भाष्य करताना म्हटले आहे, जसे जीर्ण झालेला कपडा आपण टाकून देतो व नवा परिधान करतो तसे चैतन्यनाथ आत्मा एक देह टाकून दुसºया देहाचा स्वीकार करतो. या विवेचनाचा अर्थ असाही नव्हे की हे जीवन कसले मरणाची माला, मासोळी झोंबते तोडावयासी गळाला असे मरत-मरत जगावे. खरं तर मरत-मरत जगणाºयास जगण्याचा आस्वादच मिळत नाही. त्याचा अर्थ एवढाच, जगण्याला विचारांचे अधिष्ठान असावे.
आज धनिक म्हणून जगताना धनाची विल्हेवाट कशी लावावी या विवंचनेत जगण्यातला आनंदच नष्ट होतो, तर निर्धन म्हणून जगताना आयुष्यच दु:खाचे कोठार वाटू लागते. यापेक्षा जगण्याच्या मुक्कामात मिळणाºया भौतिक वस्तूत दुसºयाचाही वाटा आहे. जाण्यासाठी तर सारेच आले आहेत, पण गेल्यानंतरही काही शतके उत्तम कीर्तीचा सुगंध जर या पृथ्वीतलावर दरवळत राहिला तर तेच खरे अमरत्व, मोक्ष वा मुक्ती होय.