सत्य असत्याशी मन केले ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:39 PM2018-12-09T12:39:47+5:302018-12-09T12:39:55+5:30

संत तुकारामांच्या अभंगवाणीने अवघ्या महाराष्ट्राला सुसंस्कारीत करण्याचे कार्य केले. समाजमनावर संस्काराचा फार खोल परिणाम त्यांच्या अभंग रचनेने केलेला आहे. ...

Truthfulness of mind | सत्य असत्याशी मन केले ग्वाही

सत्य असत्याशी मन केले ग्वाही

Next

संत तुकारामांच्या अभंगवाणीने अवघ्या महाराष्ट्राला सुसंस्कारीत करण्याचे कार्य केले. समाजमनावर संस्काराचा फार खोल परिणाम त्यांच्या अभंग रचनेने केलेला आहे. त्यांच्या अभंगवाड:मयाशिवाय मराठी साहित्याची व्याख्या पूर्ण होवू शकत नाही.त्यांच्या प्रत्येक अभंगामधून जीवनमूल्यांचा संदेश दिलेला आहे.


पुण्य परउपकार पाप ते परपीडा। आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥
सत्य तो चि धर्म असत्य ते कर्म । आणीक हे वर्म नाहीं दुजे ॥ध्रु.।।(तु.गा.१०२१)


असा सोपा तत्वज्ञानाचा जीवनमूल्यविचार आपल्या अभंगातून सांगीतला. प्रत्येकाला असे वाटावे की, तुकोबा आपल्याच जगण्याची कथा सांगत आहेत. तुकोबा त्यामुळेच सर्वांना जवळचे वाटतात. मराठी विचारविश्व आणि संस्कृतीचा मेरूदंड असणारा जो भागवत धर्म आहे; त्याला अभिप्रेत असणाऱ्या भूमिकेप्रमाणे संत तुकाराम हे खरे लोकशिक्षक ठरलेले आहेत. आपल्या आचरणाच्या माध्यमातून नितीवान जीवन जगण्याचे धडे जगाला देणारे संत तुकाराम संतांची फक्त लक्षणेच पूर्ण करीत नाहीत तर खºया संतत्वाच्या कसोटीला त्यांचे जीवन उतरलेले आहे. समाजशिक्षण हे त्यांचे आद्य कर्तव्य त्यांनी लोकशिक्षकाच्या भूमिकेतून पूर्ण केलेले आहे. मध्ययुगीन काळात त्यांनी मांडलेली लोकशिक्षकाची भूमिका आजही महत्त्वपूर्ण ठरते. 


जेथे किर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे ॥१॥
बुका लावू नये भाळा । माळ घालू नये गळा ॥ध्रु.॥
तटावृषभासी दाणा । तृण मागो नये जाणा ॥२॥
तुका म्हणे द्रव्य घेती । देती तेही नरका जाती ॥३॥
(तु.गा.३०७४)

संत तुकारामांनी आपल्या अभंगवाड:मयामध्ये जी मूल्यसंकल्पना मांडलेली आहे. त्यातील प्रत्येक 'जीवनमूल्य-विचार' हा जणू ज्ञानाचा, अनुभवाचा व आनंदाचा अमृतकुंभच! ज्याद्वारा मानवी जीवनाला नैतिक अधिष्ठान प्राप्त होऊन, जीवन अधिक तेज:पुंज व नितिमान करण्याचा तुकारामांचा अट्टाहास सामान्य व्यक्तीला अलौकिक आनंदाची व समाधानाची अनुभूती देणारा ठरलेला आहे. आजही आपल्याला तो वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अनुभवता येतो. ही त्याची अनुभवप्रामान्यतेची कसोटी आज यंत्रयुगातही प्रत्येक व्यक्तीला लागू होणारी आहे.


आनंदाचे डोहीं आनंदतरंग । आनंद चि अंग आनंदाचे ॥१॥
काय सांगो जालें कांहींचियाबाही । पुढे चाली नाहीं आवडीनें ॥ध्रु.॥
गभार्चे आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥२॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥
(तु.गा. ३२४२)


संत तुकारामांनी सांगीतलेली जीवनमूल्ये ही जीवनाला 'स्वाभिमानी' व 'तेजस्वी' करणारी असून त्याद्वारा कुणालाही आपल्या जीवन कालमयार्देमध्ये समाधानाच्या अत्त्युच्च शिखरावर पोहचता येवू शकते. आजसमाजामध्ये जी अनैतिकता, अराजकता व भ्रष्टाचारी लोकमानसिकता निर्माण झाली आहे. त्याला संत तुकारामांचा त्यागवाद हा प्रतिउत्तर आहे. भ्रष्टाचारी जे पैसा कमवून सुख विकत घेवू इच्छितात. त्यांना समाधान व शांती कधीही प्राप्त होवू शकणार नाही. समाधान प्राप्तीसाठी संत तुकारामांनी सत्यवादी व नितिमान असले पाहिजे, अशी शिकवण दिली. आपण केलेले काम सत्य आहे का? असा सवाल त्यांनी विचारावयास सांगीतला. आपण केलेले काम असत्य, अनितीमान असेल तर आपल्याला कदापीही मन:शांती लाभणार नाही.


सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियले नाही बहूमता


संत तुकारामांनी आपल्या अभंगवाङमयातून सात्त्विकतेचा समाधानी भाव निर्माण केला आहे. त्यामुळेच त्यांचे अभंगवाङ्मय हे अक्षरवाड:मय ठरलेले आहे. त्याच अक्षरवाड:मयातील जीवनमूल्यांमुळे संत तुकाराम हे भागवत संप्रदायातील वैचारिक वाङमयाच्या धर्ममंदिराचे कळस ठरले आहेत.
डॉ. हरिदास आखरे

Web Title: Truthfulness of mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.