तुका झालासे कळस...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 08:42 PM2019-03-22T20:42:17+5:302019-03-22T20:43:22+5:30
आज फाल्गुन व।। द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज. महाराजांच्या वैकुंठगमनाचा पर्वकाळ. म्हणून त्यांचे पुण्यस्मरण.
सतरावे शतक म्हणजे महाराष्टÑातील पुण्यपूर्वच म्हणावे लागते. शिवाजीराजाने भगवा फडकावून स्वराज्याचे तोरण बांधले. अनेक शतकाच्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडल्या आणि अध्यात्माच्या क्षेत्रातही दोन उत्तुंग महात्मे याच शतकात जन्मले व सामान्यांच्या उद्धाराचा मार्ग त्यांनी सोपा केला. यात जगद्गुरू तुकाराम महाराज व समर्थ रामदास हे होत. आज फाल्गुन व।। द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज. महाराजांच्या वैकुंठगमनाचा पर्वकाळ. म्हणून त्यांचे पुण्यस्मरण.
तुकाराम महाराजांचा जन्म देहू गावी झाला. बोल्होबा व कनकाईच्या पोटी तीन पुत्र होते. सावजी, तुकाराम व कान्होबा. घरी शेती, सावकारकी, महाजनकी. त्यामुळे घर अगदी संपन्न होते. पण माता-पितरांच्या मृत्यूनंतर व १६२८ व २९ साली दुष्काळ नंतर अतिवृष्टी. त्यामुळे शेती अर्थातच तोट्यात. घरी असणारा व्यापारही तोट्यात. त्यात सावजी तीर्थयात्रेला निघून गेला. घराची सर्व जबाबदारी तुकारामावर आली, मन सैरभैर झाले.
त्या काळी सामान्य समाजाची, बहुजनाची स्थिती अतिशय दयनीय होती. वर्णवाद तर पराकोटीचा, म्हणूनच क्षत्रिय असूनसुद्धा तुकाराम महाराज स्वत:ला शूद्र म्हणवून घेतात. कारण ब्राह्मणवर्ग त्यांना शूद्रच मानीत होता म्हणून अभंग करणे, गाणे, कीर्तन करणे या महाराजांच्या कृतीला त्यांच्याकडून विरोध होता व म्हणूनच त्यांचा छळ केला जात होता. भक्ती, कीर्तन, भजन-पूजन ही फक्त ब्राह्मणांची मक्तेदारी होती.
अशा अंधारयुगात तुकाराम महाराजांनी -
‘‘बुडती हे जन, न देखवे डोळा
म्हणूनी कळवळा, येत असे’’
हे ध्यानी घेऊन अतिशय सोप्या भाषेत, व्यवहारातील उदाहरणांनी जनप्रबोधन केले. भाषा अतिशय फटकळ पण मर्माघाती. बोध साधा पण भवतारक म्हणूनच आज साडेतीनशे वर्षांनंतरही ‘‘ज्ञानोबा-तुकाराम’’ हा गजर कानी येतो. ज्ञानेश्वरी, गाथा व भागवत ही वारकºयांची प्रस्थानत्रयी आहे. हजारो वारकºयांना गाथेतील अभंग मुखोद्गत आहेत. एवढे अमोल संचित आम्हाला तुकाराम महाराजांनी ठेवले आहे. म्हणूनच ही कृतज्ञता.
सुमारे चार हजार अभंगातून महाराजांनी अध्यात्म, भक्ती याचा मार्ग तर दाखवलाच आहे. पण रोजच्या व्यवहारातील अनेक गोष्टी सांगून ‘‘शहाणे करून’’ सोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
।। वाघे उपदेशिला कोल्हा,
सुखे खाऊ द्यावे मला ।।
।। तुका म्हणे ऐशा नरा,
मोजू माराव्या पैजारा ।।
।। नवसे कन्यापुत्र होती,
मग का कारणे लागे पती।।
।। धिक जिणे तो बाईले अधिन,
परलोक मान नाही दोघा ।।
।। तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण,
तया त्रिभुवन अवघे खोटे ।।
।। वेचुनिया धन उत्तम वेव्हारे,
उदास विचारे वेचकरी ।।
असा सोपा पण अतिशय परखड भाषेत उपदेश केला आहे. तो आजही आम्हाला मार्गदर्शक व लाभदायक आहे. म्हणूनच हे त्यांचे पुण्यस्मरण. तुकोबांना सर्व मराठीजनांचे लाख-लाख प्रणाम!
- प्रमिला देशमुख
(लेखिका या प्राध्यापिका आहेत.)