‘तुका आकाशाएवढा’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 01:54 PM2019-03-22T13:54:27+5:302019-03-22T13:54:40+5:30

‘अणु-रेणु या थोकडा । तुका आकाशाएवढा।’ प्रस्तुत अभंगाचे चरण जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे असून, ते म्हणतात मी अणु-रेणूपेक्षाही सूक्ष्म असून, आकाशाएवढा मोठा आहे.

'Tuka is too much of the sky' | ‘तुका आकाशाएवढा’ 

‘तुका आकाशाएवढा’ 

googlenewsNext


‘अणु-रेणु या थोकडा । तुका आकाशाएवढा।’ प्रस्तुत अभंगाचे चरण जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे असून, ते म्हणतात मी अणु-रेणूपेक्षाही सूक्ष्म असून, आकाशाएवढा मोठा आहे. या सृष्टीमधील अणु-रेणुमध्ये ईश्वरी चैतन्य शक्ती अति सूक्ष्म असून, संपूर्ण ब्रम्हांडामधील घटकात तिचे अस्तित्व आकाशापेक्षाही मोठे आहे. ही चैतन्यशक्ती प्रत्येक माणसात असल्याचे तुकोबा स्पष्ट करतात. 
‘ज्ञानदेवे रचिला पाया । 
तुका झालासे कळस।।’ 
या संत बहिणाबार्इंच्या अभंगात म्हटल्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी सांप्रदायास अद्वैत तत्त्वज्ञान प्राप्त करून दिले असल्याने  त्यांना रचियता म्हटले जाते व संत तुकाराम महाराज या सांप्रदायाचे कळस ठरले आहेत. आपल्या अभिजात अभंग रचनेमधून समाजप्रबोधनाचे महान कार्य केले असून, मराठी भाषेला व साहित्याला सर्वश्रेष्ठ उंची प्राप्त करून देणारे ठरले आहेत. म्हणून ‘तुकाराम गाथेला’ पाचवा वेद म्हटल्या जाते. 
संत तुकोबांचा जन्म सोळाव्या शतकात इ. स. १६0८ मध्ये देहू गावी झाला. वडील बोल्होबा, आई कनकाई, थोरले बंधू सावजी, मधले तुकाराम व धाकटे कान्होबा होत. श्री विश्वंभर बाबा हे आद्य पुरुष असून, त्यांच्यापासून आठव्या पिढीत संत तुकारामांचा जन्म झाला. 
तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा विचार करता सर्वसामान्य जनता हवालदिल झाली होती. चतुर्वर्णाश्रम पद्धतीमुळे सामाजिक विषमता व जातीभेदाचे साम्राज्य सर्व दूर पसरले होते. देवाच्या व धर्माच्या नावावर अतिरेक करून समाजाची दिशाभूल केली जात होती. ज्ञान, कर्म, धर्म व भक्ती यांचे यथार्थ स्वरूप न सांगता सामाजिक वातावरण प्रदूषित केल्या जात होते. 
‘बुडति हे जन न देखवे डोळा । येतो  कळवळा म्हणोनिया ।।’ तुकोबाचे संत मन जागृत होऊन कठोर, परखड उपदेशात्मक विचार ते आपल्या अभंगातून मांडतात. -
मुखे सांगे ब्रम्हज्ञान । जन लोकाची कापतो मान ।। 
कथा करिता देवाची । अंतरी आशा बहु लोभाची ।। 
तुका म्हणे तोचि वेडा । त्याचे हानुनी थोबाड फोडा ।।
ज्ञान सांगणाºयास जर अनुभूति नसेल, देवाच्या नावावर समाजाला फसवून पोट भरत असेल. 
धनाची आशा ठेवत असेल तर त्याच्या थोबाडीत मारले पाहिजे.  त्याच तुकोबाला  २३ जानेवारी १९६0 मध्ये स्वप्नात दृष्टांताद्वारे सद्गुरुची प्राप्ती व ‘रामकृष्ण हरी’ मंत्र मिळाला आहे. जो वारकरी सांप्रदायाचा मूलमंत्र आहे. 
बाबाची आपुले सांगितले नाम । मंत्र दिला रामकृष्ण हरी ।। 
माघ शुद्ध दशमी पाहून गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ।। 
तुकोबांना स्वप्नातील दृष्टांत माघ शुद्ध दशमी गुरुवारी झाला असून, या शुभ दिवशी सद्गुरुद्वारे ते अनुग्रहित झाले व सद्गुरुची परंपरा सांगताना सद्गुरु राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य अशी परंपरा सांगितली आहे. तुकोबाच्या ध्यानी, मनी, स्वप्नी व जागृती पांडुरंगाचाच ध्यास असे, प्रपंचामधून परमार्थाकडे त्यांची वाटचाल स्वत:च्या अनुभूतिद्वारे झाली आहे. 
ईश्वरी भक्तीचा वास असणाºया माणसांमध्ये भेदाभेद कधीही करू नये. धर्म, वंश, जात, पंथ या पलीकडाचा मानवतावाद व समतावाद त्यांनी समाजापुढे मांडला आहे :-
विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगल 
कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।। 
दीनदलित व रंजल्या गांजल्यांची सेवा करणारा, त्यांचे दु:ख जाणून ते दूर करण्यास मदत करणारा, वात्सल्य व ममतवादी माणूसच खरा  साधुसंत असतो. लोण्याप्रमाणे ज्याचे चित्त निर्मळ, शुद्ध व सात्विक असते त्याचे कोणीही वाली नाही, त्यास आपल्या अंत:करणातून प्रेम करणारा खरा साधू असतो. तीच भगवंताची मूर्ती असल्याचे संत तुकाराम महाराज सांगतात. माणसाने प्रयत्नवादी व परिश्रमाने आपले ध्येय , उद्दिष्ट साध्य करावे, त्याकरिता व्यवहारामधील विविध दृष्टांत ते देतात तर आपला व्यवहार हा प्रामाणिकपणे व इमाने इतबारे करण्यात यावा, प्रपंचात राहून परमार्थ कसा, असे ते मोठ्या मार्मिकतेने सांगतात.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ।।
भूत दया गाईपशुचे पालन ।  तान्हेल्या जीवन वनामाजी ।।
परोपकारी नेणे परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणीमाना।।
आपले जीवन जगत असताना इतरांची निंदा कधीही करू नये.  कठीण प्रसंगात सहकार्याची, उपकाराची आपली वृत्ती अंगीकारणे हिताचे ठरते. याशिवाय आपल्या दृष्टीसमोर येणारी महिला ही माझी माता- भगिनी आहे, ही आपली दृष्टी व दृृष्टिकोन असावा. आपल्या घरात असणाºया गाई इ. पशुंचे प्रामाणिकपणे व दयाभाव वृत्तीने पालन- पोषण करावे व रानावनात असणारे पशुपक्षी यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करावा. यालाच तुकोबांनी परमार्थ म्हटला आहे. 
संत तुकोबा आपल्या अभंगवाणी रचनेचे श्रेय स्वत:कडे न ठेवता इश्वराला देतात. ते म्हणतात.. 
आपुल्या बळे नाही मी बोलत। सखा भगवंत वाचा त्याची।।
साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी । शिकविता धनी वेगळाची।।
संत तुकाराम महाराजांची अभंगवाणी आजही समाजाला प्रेरणा देणारी व मार्गदर्शन करणारी आहे. अशा संतांच्या चरणी शतश: नतमस्तक.

Web Title: 'Tuka is too much of the sky'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.