तुळशी माळ
By Admin | Published: August 29, 2016 04:04 PM2016-08-29T16:04:02+5:302016-08-29T16:11:06+5:30
वारकरी संप्रदायाची दीक्षा घेणारास तुळशीमाळ धारण करावयाची असते. त्याचबरोबर त्याला नित्यनेम म्हणून पंढरीची वारी स्वीकारावी लागते
- डॉ. बाळासाहेब गरुड, ठाकूरबुवा
वारकरी संप्रदायाची दीक्षा घेणारास तुळशीमाळ धारण करावयाची असते. त्याचबरोबर त्याला नित्यनेम म्हणून पंढरीची वारी स्वीकारावी लागते. वारकरी तुळशीमाळ हेच भूषण मानून गळ्यात ती धारण करतो. खरे म्हणजे ही दीक्षा घेणे म्हणजे ईश्वर कार्यासाठी जीवन समर्पित करणे असा अर्थ आहे. जेव्हा भगवंताला नैवेद्य अर्पण केला जातो. किंवा जल अर्पण केले जाते त्यावेळी त्यावर तुळशीपात्र ठेवले जाते. ते म्हणजे ‘इदं न मम!’ हे प्रभो हे माझे नाही तुझेच आहे. हा भाव त्यामागे असतो. देह देवाला अर्पण करावयाचा झाल्यास त्यावरही असेच तुळशीपत्र ठेवावे लागेल. परंतू असे करणे शक्य होत नाही. त्याकरिता तुळशीकाष्टाचे मणी बनवून त्याची माळ गळ्यामध्ये घातली जाते. ही माळ सातत्याने स्मरण देत असते की तू तुझा देह भगवंतासाठी अर्पण केलेला आहे म्हणून तुळशीमाळ हे भगभ्दवतीचे, भगवंताला समर्पित देहाचे सर्वोच्च प्रतीक आहे.
माळेद्वारे हे सातत्याने लक्षात ठेवायचे आहे की, ह्या देहाचा मालक भगवान आहे. चालविणारा तोच आहे आणि नियंता भगवानच आहे. ‘‘क्षेत्रज्ञं चापि मां विध्दि सर्वश्रेत्रेपु भारत’’ आपले शरीर हे केवळ शेत आहे आणि ईश्वर त्याचा मालक आहे. तेव्हा या शेतात काय पेरायचे ते देवच निश्चित करतो. या शरीराकडून जे काही कार्य होते ते प्रभूप्रीत्यर्थ झााले पाहिजे. मानव तर देवाच्या हातचे साधन आहे. म्हणूनच गीतेचा कर्मयोग शिकवितो की मानवाने प्रत्येक कृती भगदर्पण भावाने, कुठलाही अहंकार न बाळगता तसेच फळाची अपेक्षा नकरता केली तर चित्र शुध्दी होते. तसेच हे भक्तीचे प्रमुख साधन आहे. भक्तीसाठी जीवनामध्ये सातत्याने देवाचे अनुसंधान ठेवले पाहिजे हे अनुसंधान सहज त्याच्या नाम चिंतनाने होते. तुळशीमाळ हे सतत भगवंतांच्या नामचिंतनाचे प्रतीक आहे आणि जवळजवळ सर्वधम्र आणि संप्रदाय भगवन्नाम चिंतनाचा आग्रह धरुन आहेत. वारकरी संप्रदायाने भक्तीचे प्रमुख साधनच नामचिंतन मानले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘काय नोहे केले । एका चिंतिता विठ्ठले ।।’’ एका विठ्ठल नामाच्या चिंतनाने मानव जीवनासाठी जे अत्यांवश्यक आहे ते सर्वच प्राप्त होते. परंतू हे चिंतन जाणीवपूर्णक झाले पाहिजे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ‘‘हरि बुध्दि जपे तो नर दुर्लक्ष ।।’’ याचाच अर्थ जप हा बुध्दि पुरस्सर झाला पाहिजे.