देवीची उग्र आणि सौम्य अशी दोन रूपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 03:37 AM2018-10-13T03:37:47+5:302018-10-13T03:38:05+5:30
भारतीयांच्या सांस्कृतिक जीवनात शारदीय नवरात्रौत्सवाचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा शारदीय नवरात्रौत्सव आणि त्यानंतर येणारा विजयादशमीचा विजयोत्सव भारताच्या सर्वच प्रांतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
- डॉ. रामचंद्र देखणे
भारतीयांच्या सांस्कृतिक जीवनात शारदीय नवरात्रौत्सवाचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा शारदीय नवरात्रौत्सव आणि त्यानंतर येणारा विजयादशमीचा विजयोत्सव भारताच्या सर्वच प्रांतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. लौकिक आणि पारलौकिक, व्यवहारिक आणि आध्यात्मिक, व्यक्तिगत आणि सामूहिक, धार्मिक आणि सामाजिक, तर भावनिक आणि सांस्कृतिक अशा विविधांगाने या उत्सवाचे स्वरूप आणि त्यामागे उभे असलेले रूपक समजावून घेणे आवश्यक ठरते. असुरी शक्तिंविरुद्ध दैवी शक्ती जेव्हा-जेव्हा युद्ध करते, तेव्हा त्याचे प्रतीक आणि स्मरण म्हणून नवरात्र साजरे केले जाते. आदिशक्ती भगवती, दुर्गा, भवानी हीच शारदीय नवरात्रौत्सवाची उपास्य देवता आहे. ती देवी विविध रूपांनी नटली आहे. भारताच्या प्रत्येक प्रदेशात तिची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात. महाराष्ट्रात ती जगदंबा किंवा भवानी नावाने प्रसिद्ध आहे. बंगालमध्ये हीच देवी दुर्गेचे रूप धारण करते. कर्नाटकात रेणुका किंवा यल्लमा तर म्हैसूर प्रांतात चामुंडादेवी या नावाने ती प्रसिद्ध आहे. राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात देवी नानाविध रूपांनी पुजली जाते. तिची उपासना केली जाते. भक्ती आणि त्यातून शक्तीचा प्रत्यय भाविक घेत असतात. यातून राष्ट्रीय एकात्मताही साधली जाते. देशभरातील भाविक वेगवेगळ्या देवींची आराधना करतात आणि दर्शनाच्या निमित्ताने त्यांची एकात्मताही वाढते. देवीची उग्र आणि सौम्य अशी दोन रूपे पाहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा भवानी ही तिची सौम्य रूपे तर दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही तिची उग्र रूपे आहेत. याशिवाय भद्रकाली, महामारी, रक्तदंतिका ही तिची महारौद्र रूपे आहेत. चराचरात शक्तिरूपाने तीच उभी आहे. वैकुंठात महालक्ष्मी, गोलोकात राधिका, शिवलोकात पार्वती, ब्रह्मलोकात सरस्वती रूपाने तीच नटली आहे. तीच वेदमाता, सावित्री आहे. तीच जनककन्या सीता आहे. तीच भीष्मकन्या रुक्मिणी आहे आणि वृषभानुसुता राधाही तीच आहे. तीच विश्वाची शास्ती आहे. बाह्यत: ती आनितेजाने झळकणारी असून, अंतरी सानतेजाने प्रकाशणारी आहे. दैवी रूपात ती असुरांचा तर आध्यात्मिक रूपात ती अज्ञानाचा नाश करते. महाकाली हे तिचे शरीरबल आहे. महालक्ष्मी हे संपत्तीबल तर महासरस्वती हे ज्ञानबल आहे. सर्व सामर्थ्याने उभी राहिलेली तीच राष्ट्राची महान शक्ती आहे. या शक्तीचे पूजन करण्यासाठी नवरात्रौत्सव आहे.