निष्काम सेवेतून मिळतो निर्भेळ आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 08:31 PM2019-06-06T20:31:10+5:302019-06-06T20:31:41+5:30
शुद्ध आनंदाचा राजमार्ग निरपेक्ष सेवा कर्तव्यभावनेनं करण्यातून जातो हेच खरं.
- रमेश सप्रे
गोष्ट तशी फार जुन्या काळातली म्हणजे वन्स अपॉन अ टाईम अशा थाटाची नव्हे. सत्यकथाही असू शकेल. एक वैद्यबुवा रुग्णांना औषध देण्याचं काम एका खेडेगावात करत होते. आयुर्वेद ही त्यांच्या दृष्टीनं केवळ वैद्यकीय पद्धती नव्हती. तर त्यांच्या सेवा धर्माची संहिता (पवित्र पुस्तक -त्यातलं ज्ञान नि मार्गदर्शन) होती. ते बसायचे त्या जागेसमोरच्या कोप-यात तीन मूर्ती होत्या. फारशा रेखीव नव्हत्या; पण त्यांची मनोभावे पूजा केल्याशिवाय वैद्यबुवांचा दिवस सुरू होत नसे. एक मूर्ती होती हातात अमृतकुंभ (आरोग्यकुंभ) घेतलेल्या धन्वंतरीची तर दुस-या दोन होत्या देवांचेही वैद्य असलेल्या अश्विनीकुमारांच्या.
गावातले, आजूबाजूच्या परिसरातले लोक गरीब होते. वैद्यबुवांची फी सुद्धा रुग्णाला सहज शक्य असेल ती. ठरलेली द्यायलाच हवी अशी नाही. तरीही रुग्ण काही ना काही द्यायचे. सकाळी 8 वा. सेवेसाठी बसण्यापूर्वीच रोग्यांची रांग लागलेली असायची. साधारणपणे सकाळचे दहा वाजले की त्यांची छोटी मुलगी एक कागद आपल्या वडिलांच्या हातात आणून देई. ती एक यादी असायची त्या दिवशी गरजेच्या असलेल्या वस्तूंची. वैद्यबुवा प्रत्येक पदार्थासमोर त्याची बाजारातली किंमत लिहायचे बेरीज करायचे अन् औषध द्यायचे. अनेक वर्ष हा क्रम चालू होता. पत्नीही समाधानी वृत्तीची होती. आनंदात संसार चालू होता. त्याचा आधार होता निष्काम सेवेचा. एकदा एक आलिशान गाडी दारासमोर थांबली. पंक्चर झालेलं चाक काढण्यात ड्रायव्हर गुंतलेला असताना मालक सहज आत आले. त्यांचे उंची कपडे पाहून वैद्यबुवांनी खुणेनंच त्यांना खुर्चीवर बसायला सांगितलं.
समोरची व्यक्ती वैद्य आहे नि त्यांची वृत्ती नि मुद्रा अतिशय सात्विक आहे हे त्या श्रीमंत व्यक्तीच्या लक्षात आलं, त्यांनी आपल्या खूप वर्षाच्या पोटदुखीसाठी औषध मागितलं. त्यांची माहिती विचारल्यावर समजलं की ते दिल्लीला मोठे व्यापारी आहेत. त्यांची विधवा बहीण त्या भागात राहते तिला भेटायला ते कधीतरी येतात. त्यांनी हेही सांगितलं की लग्न होऊन बरीच वर्षं झाली तरी त्यांना मूल झालेलं नाही. वैद्यबुवांनी पोटदुखीचं औषध दिल्यावर काही पुडय़ा बांधल्या. त्यातलं एक औषध त्या गृहस्थासाठी तर दुसरं त्यांच्या पत्नीसाठी होतं. हे औषध नियमित घ्या निश्चित अपत्यप्राप्ती होईल.
पुन्हा यायची आवश्यकता नाही. हे संभाषण चालू असताना वैद्यबुवांची चिमुरडी नेहमीप्रमाणे यादी घेऊन आली. शांतपणो प्रत्येक पदार्थापुढे त्याची किंमत लिहून बेरीज केली. त्या दिवशी जमलेले पैसे पाहिजे ते पुरेसे होते. त्यानंतर त्या श्रीमंत व्यापा-यानं फी विचारल्यावर वैद्यबुवा समाधानपूर्वक म्हणाले, ‘ईश्वरी इच्छेने आज पुरतील एवढे पैसे जमलेत. आता सा-या रुग्णांची सेवा विनाशुल्क करायची हे माझं व्रत आहे. तेव्हा तुमच्याकडून मी काहीही घेऊ शकत नाही. आपली पोटदुखी बरी होवो. मुख्य म्हणजे आपल्याला अपत्यप्राप्ती व्हावी ही ईश्वरचणी मनापासून प्रार्थना करतो. हे म्हणताना वैद्यबुवांच्या चेह-यावर देवासमोर असलेल्या निरांजनासारखा मंद प्रकाश झळकत होता. त्या देवमाणसाला नमस्कार करून तो व्यापारी निघून गेला.
वर्षामागून वर्षं उडून गेली. वैद्यबुवांचा व्रतस्थ व्यवसाय सुरू होता. मुलगी लग्नाची होऊन तिचा विवाहही ठरला होता. काही दिवसांवर ते मंगलकार्य येऊन ठेपलं होतं. एक दिवशी त्या दिवसाच्या आवश्यक पदार्थाची यादी लिहून झाल्यावर पत्नीनं लिहिलं होतं. पुढच्या आठवडय़ात मुलीचं लग्न आहे. खरेदी करायला हवी. नेहमीप्रमाणे पदार्थासमोर किमती लिहिल्यावर मुलीच्या लग्न खरेदीच्या पुढे वैद्यबुवांनी लिहिलं. ‘परमेश्वरा ही तुझीच मुलगी आहे हिची सारी काळजी तुलाच.’
दुस-या दिवशी एक गाडी दारात थांबली. तोच दिल्लीचा श्रीमंत व्यापारी आला. काही वेळ बोलणं झाल्यावर वैद्यबुवांना ओळख पटली. त्यांनी सहज विचारलं, ‘आपल्याला मूल नव्हतं ना?’ यावर तो व्यापारी म्हणाला, ‘तेच तर सांगायला आलोय, तुमच्या औषधामुळे पत्नीला लगेचच दिवस गेले. आम्हाला मुलगी झाली. तिच्या लग्नाचं आमंत्रण बहिणीला द्यायला आलोय. एक गोष्ट परमेश्वराच्या प्रेरणेनं मी केलीय. मनात सहज विचार आला की तुमची मुलगीही लग्नाची झाली असेल. म्हणून जे जे माझ्या मुलीसाठी खरेदी केलं ते ते तुमच्या मुलीसाठीही घेतलं. मी सा-या वस्तू घेऊन आलोय कृपया त्यांचा स्वीकार करा नि मला तुमचं थोडं तरी ऋण फेडल्याचं समाधान मिळू द्या.’
हे शब्द ऐकताच वैद्यबुवांनी त्या व्यापा-यासाठी पाणी व गूळ घेऊन आलेल्या पत्नीकडे पाहिले. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या श्रवणधारा ओघळत होत्या. मुलीच्या विवाहाची सारी व्यवस्था परमेश्वरानंच केली होती. परस्पर सर्वाना दिव्य आनंद झाला. वैद्यबुवांचेही डोळेही पाणावले. हात जोडले गेले. धन्वंतरी, आश्विनीकुमारांबरोबर त्या देवदूतासारख्या आलेल्या व्यापा-यासाठीही. खरं तर ते त्यांच्याच निष्काम सेवेचं फळ होतं. पण त्यातून सर्वाना धन्यकृतार्थ वाटून निर्भेळ आनंदाचा अनुभवही येत होता. शुद्ध आनंदाचा राजमार्ग निरपेक्ष सेवा कर्तव्यभावनेनं करण्यातून जातो हेच खरं.