बुद्धांवरचा निराधार कलंक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 06:01 AM2020-04-23T06:01:14+5:302020-04-23T06:01:25+5:30
जेव्हा शरीरी आणि चित्ताच्या अनित्य क्षेत्राचे अतिक्रमण करून इंद्रियापलीकडील नित्य, ध्रुव, शाश्वत निर्वाणाचा साक्षात्कार होतो, हेच विपश्यनेतून शक्य होते.
- फरेदुन भुजवाला
भगवान बुद्धांवर एक नितांत, निराधार कलंक लावला जातो की, त्यांच्या मान्यतेतून सर्वकाही भंगुरच भंगुर आहे़ अपरिवर्तनीय काहीही नाही़ शतकानुशतके आमच्या देशवासीयांच्या मनावर या खोट्या आरोपणाचे किती घट्ट लेप लावले गेले. अनेक लोक भगवान बुद्धांवर दु:खवादी आणि अनित्यवादी होण्याचा कलंक लावून आजही विपश्यना विद्येला विरोध करतात. अनेक लोकांच्या मनात हा मोठा गैरसमज आहे की, विपश्यना साधनेचे एकमेव लक्ष्य अनित्याचे ध्यान आहे़ परंतु जे साधना करतात ते खूप समजतात की, शरीर आणि चित्त तसेच समस्त इंद्रिय क्षेत्राच्या अनित्येचा अनुभव अशासाठी करीत आहेत की, त्यामुळे याविषयी जागलेला तादात्म्यभाव दूर होईल, असे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका सांगतात़ ते म्हणतात, तादात्म्यभाव असतो तेव्हा आसक्ती आणि द्वेष जागतो़ साधक स्वानुभूतीच्या स्तरावर जाणू लागतो की, शरीर आणि चित्त ‘मी’ नाही, ‘माझे’ नाही, ‘माझा’ आत्मा नाही़ स्वानुभूतीद्वारे या सत्यात जेवढा-जेवढा पुष्ट होतो, तेवढा-तेवढा याविषयीचा त्याचा तादात्म्यभाव नष्ट होतो़ देहात्म आणि चितात्म बुद्धी नष्ट होते़ त्याचा परिणाम म्हणून त्याविषयीची आसक्ती आणि द्वेष नष्ट होतात़ साधना करीत असताना स्वानुभूतीने समजू लागतो की, जे अनित्य आहे़, त्याबद्दल काय आसक्ती जागवू? तरी आपल्या जुन्या स्वभावाव्या अधीन होऊन कधी-कधी कोणत्या सुखद अनुभूतीवर आसक्ती जागविण्याची चूक करून असतो़ काही वेळानंतर जेव्हा ती सुखद संवेदना बदलते, तेव्हा त्याच्याविषयी जेवढी खोल आसक्ती होती, तेवढे मोठे दु:ख प्रकट होते़ या सत्याला वारंवार अनुभूतीवर उतरवता-उतरवता आसक्ती आपोआप नष्ट होते़ शेवटी अशी अवस्था उत्पन्न होते की, जेव्हा शरीरी आणि चित्ताच्या अनित्य क्षेत्राचे अतिक्रमण करून इंद्रियापलीकडील नित्य, ध्रुव, शाश्वत निर्वाणाचा साक्षात्कार होतो, हेच विपश्यनेतून शक्य होते.