सागराची विशालता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 07:42 AM2020-04-25T07:42:11+5:302020-04-25T07:42:58+5:30
सागरासारखा विशालहृदय, मनाच्या अंतरंगात दडलेली नीरवता, स्थिरता, स्पष्टता अनुभव करा. जे या चर्मचक्षुंनी कधी दिसू शकले नाही ते सर्व काही आपणास या अंतर्विश्वात दिसू लागेल. जीवनाचा प्रवास सरळ आणि सुखद होईल.
- नीता ब्रह्मकुमारी
कितीही लाटा आल्या आणि किनाऱ्याला वेगाने धडकल्या, तरी त्यांना पुन्हा सागराकडे परतावेच लागते. मनुष्याच्या जीवनातही तसेच आहे. आपण कितीही क्रोधीत झालो, आदळआपट केली तरी शेवटी आपण प्रेमाचे, शांतीचे, आनंदाचे भुकेले आहोत. आपली धाव परत त्या सुखाच्या, प्रेमाच्या सागराकडेच असते. सागर कितीही विशाल असला तरी त्याची एक लाटही सुखद अनुभव देऊन जाते. आपल्या दिवसभराचा असा एखादा सुखद क्षणही पुरेसा असतो. विशाल हृदयाने, मुक्त मनाने विचार प्रकट करण्याची सवय लावावी. कारण, विचारांचे दमन हे अतिशय नुकसानकारक आहे. शुद्ध विचारांचा स्पर्श जीवनाला सुखद बनवण्यासाठी मदत करतो. आपण जेव्हा किनाऱ्यावर उभे राहतो, तेव्हा अलगद आपले पाय वाळूत रुततात, खड्डा पडतो. काही वेळाने समुद्राच्या लाटा ती जागा भरून काढतात; पण आपण पुन्हा त्याच जागेवर उभे राहिलो, तर पाय आणखी आत जातात. जीवनातही तसेच आहे.
विचारांच्या शुद्ध लाटा येऊ दिल्या तर परिस्थितीरूपी खड्डा अलगद भरून येतो; पण त्याच परिस्थितीवर वारंवार विचार करीत राहिलो, तर ती परिस्थिती आपल्याला खोलवर नेते. सागरकिनारी कोणीही उभे राहिले, तरी त्याला सागराची विशालता, शुद्धतेचे दर्शन होते. आपणही संपर्कात येणाºया सगळ्यांसाठी सागराप्रमाणे एकसमान राहावे. मनात प्रत्येकाप्रति शुभभावना, कल्याणाची भावनाच ठेवावी. ही भावना सर्वांना आपलेसे करील. विचारांच्या अथांग सागराला उधाण आले, तरी त्याच्या तळाशी अनुभवांचे, ज्ञानाची रत्ने दडलेली आहेत. मनुष्यजीवन अमूल्य आहे. त्यातून जे योग्य आहे ते सामावून, बाकी राहिलेले किनाऱ्यावर सोडून द्या. सागरासारखा विशालहृदय, मनाच्या अंतरंगात दडलेली नीरवता, स्थिरता, स्पष्टता अनुभव करा. जे या चर्मचक्षुंनी कधी दिसू शकले नाही ते सर्व काही आपणास या अंतर्विश्वात दिसू लागेल. जीवनाचा प्रवास सरळ आणि सुखद होईल.