एकला विजया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 05:39 AM2020-06-05T05:39:57+5:302020-06-05T05:40:26+5:30
बा. भो. शास्त्री जय-पराजय ह्या मानवी नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुखाइतकाच सहजतेने दु:खाचाही स्वीकार हवा, असं गीता व इतर ...
बा. भो. शास्त्री
जय-पराजय ह्या मानवी नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुखाइतकाच सहजतेने दु:खाचाही स्वीकार हवा, असं गीता व इतर धर्म सांगतात. अनुकरण कृतीचं असतं व अनुसरण विचाराचं असतं. अनुकरणानं फसगत होते व अनुसरणातही पतन होतं. तेव्हा काय करावं, असं नागदेव श्रीचक्रधरांना विचारतात. त्यातून सावरण्याचा मार्ग आहे का? तेव्हा स्वामींनी ‘एकला विजया’ हे सूत्र सांगितलं. आपण तीन कप्प्यांत जगणारी माणसं आहोत. एक सामाजिक, दुसरा कौटुंबिक, तिसरा वैयक्तिक. प्रत्येक कप्प्याचे अनुभव वेगळे असतात. समाजात वावरताना सन्मान, अपमान मिळतो. कुटुंबात प्रेम, जिव्हाळा मिळतो. तिसरा व्यक्तिगत कप्पा महत्त्वाचा असतो. इथंच वैयक्तिक आवडी-नावडी जपता येतात. एकमताने निवड करायची ही एकमेव जागा असते. एकांतात भावी नियोजनाला वाव मिळतो. त्याला विवेकाचं अधिष्ठान असावं हे लक्षात घ्यावं. नागदेवाचं सामाजिक जीवन विकार-विकल्पाने भरलेलं होतं. कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त झालं होतं. सर्वत्र पराभव झाला. आता विजयाची उपलब्ध करून देणारी एकच जागा शिल्लक होती. जी तुकोबांना सापडली,
‘येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत
आकाश मंडप पृथिवी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’
असा एकला साधक विजयाचा अधिकारी आहे; पण संसारिकाचं काय? त्यासाठी हे सूत्र आहे. साधक नित्य, तर गृहस्थ दिवसातून तासभर एकला असावा. लोकांतात जय, तर एकांतात एकट्याचा विजय आहे. आपल्यातल्यांना आपलंसं करून घेता येतं. कोण आपल्यातले नकारात्मक ऊर्जा देणारे आपले मनोविकार असतात, त्यांना आपुलाची वाद आपणासी करून सकारात्मक ऊर्जा देणारे करता येते. तेव्हा क्रोधाला बोध, मोहाला विमोह करता येतं. संत मीरा एकटी एकतारी होती. एकदा तानसेनने मीराचं गायन ऐकल्यावर म्हणाला, ‘तू छान गातेस, पण तुझ्या गाण्यात राग दिसला नाही.’ मीरा म्हणाली, ‘मी रागात नाही अनुरागात गाते.’ हा अनुराग वैयक्तिक कप्प्यात तयार होतो.