विद्या विनयेन शोभते..!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 12:31 PM2019-05-06T12:31:54+5:302019-05-06T12:34:30+5:30
सिकंदरने जग जिंकले होते. मृत्यूपत्रात त्याने अंत्ययात्रेच्या वेळेस माझ्या हाताचे तळवे आकाशाकडे मोकळे दिसतील अशा पद्धतीने माझी अंत्ययात्रा काढा असा उल्लेख केला होता.
- दत्ता कोहिनकर-
सकाळच्या रम्य प्रहरी केंद्रात फिरत असताना आचार्य सत्यनारायण गोएंकाजींचा एक दोहा कानावर पडला, जिसके मन मे प्रज्ञा जगी- होय विनम्रह्य विनित। जिस डाली को फल लगे- झुकने कि ही रीत॥ मला महात्मा गांधीची आठवण झाली. एकदा गांधीजी-चार्ली चॅप्लीनला भेटण्यासाठी त्यांच्या छोट्या घरी गेले. भेटून झाल्यावर गांधीजींनी चॅप्नीलला विचारले. आमच्या प्रार्थनेची एक झलक तुम्हाला पहायची आहे का? चॅप्लीनन उत्तर दिलं कि त्याचं घर खूपच लहान असून प्रार्थना करणार कोठे? गांधीजी म्हणाले, तुम्ही सोफ्यावर बसा, आम्ही खाली बसून प्रार्थना करू. त्याचप्रमाणे त्यांनी तसे केलं सुद्धा. पुढे चॅप्लीनन लिहिलंय, गांधीजी व त्यांच्या साथीदारांना माझ्या पुढेच जमिनीवर बसण्याची लाज बिलकुल वाटली नाही पण मी मात्र त्यांच्यापुढे वर सोफ्यावर बसून खाली पाहताना खजिल झालो होतो. मित्रांनो...खरोखर आयुष्यात महत्त्कार्य करताना विनम्रता या गुणाचा विकास करावा लागतो. अहंकाराचा त्याग करावा लागतो. सिकंदरने जग जिंकले होते. मृत्यूपत्रात त्याने अंत्ययात्रेच्या वेळेस माझ्या हाताचे तळवे आकाशाकडे मोकळे दिसतील अशा पद्धतीने माझी अंत्ययात्रा काढा असा उल्लेख केला होता. मृत्यूपत्राच्या माध्यमातून सिकंदरने आपल्या सर्वांना एक संदेश दिला होता,मी सिंकदर मी जग जिंकले पण खाली हाताने आलो होतो आणि खाली हातानेच परत चाललोय. म्हणून कितीही पैसा, प्रतिष्ठा, सत्ता मिळवली तरी वृथा अभिमान बाळगु वृथा अभिमान बाळगु नका, नेहमी नम्र रहा.