आनंदाचं गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 06:49 PM2019-08-16T18:49:18+5:302019-08-16T18:49:23+5:30
प्रत्येकानं बालपणी घेतलेला हा रम्य अनुभव. यातलं सर्वात महत्त्वाचं आहे ते ‘मामाचं गाव’.
- रमेश सप्रे
काही बालगीतं मराठीत अमर झालीयत. तशी बडबडगीतं (नर्सरी -हाईम्स) ध्वनीगीतं, कृतीगीतं पिढय़ानपिढय़ा चालत आलेली असतात. काऊचिऊच्या गोष्टीही अशाच चिरंजीव असतात; पण काही बालगीतं (चित्रपट गीतंसुद्धा) अशीच बालांच्या तसेच मोठय़ांच्याही मनात घर करून बसतात. जशी ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?’, ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा’, ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच’ अशी अनेक गीतं आहेत. यातलंच एक गीत आहे ‘झुक झुक झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहू याùù मामाच्या गावाला जाऊ याùù’
प्रत्येकानं बालपणी घेतलेला हा रम्य अनुभव. यातलं सर्वात महत्त्वाचं आहे ते ‘मामाचं गाव’. मुलांच्या दृष्टीनं आनंद निधान, आनंदाची खाण किंवा आनंदाचा खजिना म्हणजे मामाचं गाव. तिथं जणू मुक्तसंचार असतो. काहीही करायचं जणू लायसन्सच मुलंना मिळतं; पण ‘मामाचा गाव’ हा मुलांच्या दृष्टीनं आनंदाचा गाव असला तरी मामा-मामी, घरातील इतर वडील मंडळी, त्या गावातील लोक, त्यांचे व्यवहार हे इतर गावाप्रमाणेच सुखाच्या अंगानं कमी नि दु:खाच्या अंगानं अधिक प्रमाणात जात असतात. मग ‘आनंदाचा गाव’ असं म्हणून काही नसतंच का? ‘आनंदाचा डोह’ जर असतो तर ‘आनंदाचं गाव’ का नसावं?
जरा विचार करून पाहिलं तर ते असतंच असतं. बाहेर कुठं नाही तर आपल्या (प्रत्येकाच्या) आतच असतं. म्हणून तिथं पोचणं अवघड असतं. जिथं मी आहेच तिथं आणखी कसं पोचायचं? संतांनी आपल्या जीवनात याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं.
गीतेत एक महत्त्वाचा शब्दप्रयोग या संदर्भात येतो. ‘इंद्रियग्राम’ म्हणजे आपल्या शरीराच्या सा:या इंद्रियांचा समूह किंवा गाव. इंद्रियांच्या गावात मजेत, आरामात विहार करणं हे सहज शक्य आहे. यासाठीही शब्दप्रयोग वापरलाय इंद्रियाराम!
या दोन्ही शब्दप्रयोगात महत्त्वाचा शब्द आहे इंद्रियं. म्हणजे शरीराचे अवयव. आनंद हा इंद्रीय-मन-बुद्धी यांच्या पलिकडे असणारा नि तिथून आपल्यापर्यंत येणारा अनुभव आहे. म्हणजे आनंदाचं गाव वसलंय आत, पण आपण आनंद अनुभवायचा असतो जीवनात. आनंदाचा उगम जरी असला तरी तो आपल्या तनामनातून बाहेर बरसत असतो. वाहत असतो. अखंडपणे. आपल्याला या आनंदाची जाणीव मात्र असली पाहिजे.
एका साधूला विचारलं, ‘आपलं नाव काय? त्यानं उत्तर दिलं ‘आनंद’, ‘आपले गाव?’ याही प्रश्नाला उत्तर ‘आनंद’ आणि ‘आपलं काम काय’ याचं उत्तरही ‘आनंद’च होतं. त्या साधूबद्दल सर्वाना प्रचंड कुतूहल असायचं. हा साधना-उपासना-पूजा-मंत्र-जप यापैकी काहीही करत नाही तर याच्यातून सतत अनुभवाचं प्रक्षेपण (ट्रान्स्मिशन) मात्र होत असतं. हा जातो तिथं आनंदाचं सिंचन करत असतो. याचं काय रहस्य?
त्या गावातील काही मंडळी एकदा ठरवून त्याच्याभोवती जमली नि त्यांनी हा प्रश्न साधूला विचारला. साईबाबांभोवती शिर्डीला अशीच मंडळी जमत असत. हास्याविनोद प्रश्नोत्तरं, अनेकांची सुखदु:खाची गा-हाणी नि या सर्व प्रसंगात साईबाबांच्या मुखावरील हास्यातून निथळणारा आनंद. जसं चंद्रातून चांदणं पाझरत असतं. साधूला आपल्या आनंदाचं रहस्य विचारल्यावर आणखीनच आनंद झाला. तो म्हणाला ‘मी सांगतो ते नीट ऐका नि त्याप्रमाणे जगायला आरंभ करा. खरं तर मी या क्षणाची वाटच पाहत होतो. असो.’
मी कायम आनंदाच्या गावीच असतो. देहानं असतो; पण खरा आनंद उपभोगतो तो देहापलिकडच्या अनुभूतीतून. हे पाहा, माझ्यासमोर अनेकांचे वाद, भांडणं होतात. अनेकांवर अत्याचार केले जातात; पण मला बाहेरच्या डोळ्यांनी भांडताना दिसतात नि बाहेरच्या कानांनी ते एकमेकाला देत असलेल्या शिव्याही ऐकू येतात; पण तितकंच. दृष्य नि शब्द आत शिरताना ते आनंदाचे बनूनच शिरतात. तशी रचना (सवय) मी इंद्रियांना करून घेतलीय. एक प्रकारचं फिल्टर लावलं प्रत्येक इंद्रियाला. वाईट काही दिसत वा ऐकू येत नाही. एक प्रार्थना मनात सुरू होते ‘प्रभू, या लोकांना एकमेकांना समजून घेण्याची, एकमेकांवर प्रेम करण्याची बुद्धी दे! त्यांना नि:स्वार्थी बनव. निरपेक्ष भावनेनं एकमेकाची सेवा करण्याची युक्ती शिकव’ मी स्वत: हे करताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. जखमी जनावरांच्या जखमा धुवून त्यावर मला माहीत असलेल्या झाडपाल्याचं औषध लावून त्यांच्यावर मायेची फुंकर घालून प्रेमाचा उबदार वत्सल स्पर्श करून आनंद देता देता मीही आनंदी होत असतो. तसंच इतर इंद्रीयांचं. नाकाला कधी दुर्गंध येतच नाही. जिभेला काहीही अमृतासारखं गोडच लागतं. स्पर्शाचं विचाराल तर मांजराची नखं, कुत्र्याचे दात किंवा गरीब कष्टक-याचे खडबडीत हात मला गुलाबाच्या पाकळ्यांसारखे मखमली वाटतात.
मनानं तर मी सजीव निर्जीवाचं कल्याणच चिंतीत असतो नि बुद्धीनं सर्वाचं हित कशानं होईल याचाच विचार नि त्याप्रमाणे आचार करत असतो. बस! हे रहस्य माझ्या आनंदाचं! सर्व इंद्रीयातून आनंदच उपभोगल्यामुळे मी कायम आरामात असतो. जिथं जातो तिथं आनंद शिंपून आनंदाचे मळे पिकवतो. आनंद माङयाकडे वस्तीला असतो नि माझा मुक्काम असतो सदैव आनंद ग्रामात. आनंदाच्या गावात!