विश्वासो गुरुवाक्येषु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 02:04 PM2019-01-31T14:04:21+5:302019-01-31T14:05:29+5:30
मानवी जीवनात काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मनुष्य हा भावनाशील सुद्धा असला पाहिजे, नाही तर त्याच्या जीवनात काहीही अर्थ राहत नाही.
मानवी जीवनात काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मनुष्य हा भावनाशील सुद्धा असला पाहिजे, नाही तर त्याच्या जीवनात काहीही अर्थ राहत नाही. प्रेम, दया, सहनशीलता, भावना असली पाहिजे. नाही तर जीवन नुसते रुक्ष होते. काम, क्रोध, लोभ, मत्सर, मोह, असूया हे विकार आहेत. यामुळे मनुष्याची फार मोठी हानी होऊ शकते. म्हणून या विकारापासून दूर असले पाहिजे. तसेच जीवनात श्रद्धा, विश्वास सुद्धा असणे गरजेचे आहे. श्रद्धा असावी पण ती अंधश्रद्धा नको. गीतेमध्ये म्हटले आहे कि, ‘श्रद्धामयोयम पुरुषो’ प्रत्येक मनुष्य हा श्रद्धावान असतोच फक्त त्याच्या श्रद्धेचा विषय भिन्न असतो. माझ्या ओळखीचे एक साहित्यिक आहेत पण ! ते नास्तिक आहेत, देवाला मानत नाहीत. त्यांच्या मते देव अस्तित्वातच नाही. एक दिवस याच साहित्यिकाच्या घरी त्यांना भेटावयास गेलो, कारण त्यांची पत्नीचे निधन झाले होते. साधारण दोन महिने होऊन गेले होते. त्यांच्या पुढच्या बैठकीत गेलो आणि समोर पहिले तर एका स्टूलवर त्यांच्या पत्नीचा फोटो ठेवला होता व काही जास्वंदीचे फुले त्या फोटोसमोर ठेवले होते. मी विचार केला ह्या व्यक्तीचा देवावर विश्वास नाही पण ! पत्नीवर मात्र आहे. वास्तविक पाहता त्याची पत्नी आता अस्तित्वात नाही. पण ह्याच्या मनात मात्र तिच्याविषयी प्रेम असल्यामुळे तिचा फोटो ठेवला व त्या फोटोकडे पाहून त्याला आनंद होतो. मी त्याला काही म्हणालो नाही. पण मनात हा विचार केला कि प्रत्येक माणूस हा श्रद्धामय असतो. फक्त श्रद्धेचा विषय भिन्न असतो इतकेच. पण श्रद्धेच्या अगोदर विश्वास असतो जर विश्वास नसेल तर श्रद्धा काही कामाची नाही.
व्यवहारात सुद्धा विश्वास आवश्यक आहे. अगदी नेहमीचे उदाहरण म्हणजे आपण न्हाव्यापुढे दाढी करण्यासाठी बसलो असतांना तो आपल्या गळ्यावरून वस्तरा फिरवीत दाढी करीत असतो पण ! आपल्याला मात्र असे कधीही वाटत नाही कि हा आपला गळा तर कापणार नाही ना ? हा विश्वास आपण कसा काय ठेवतो ? एस टी.मध्ये आपण बसतो. तेव्हा त्या ड्रायव्हरवर विश्वास टाकूनच बसतो. आपल्याला असे कधी वाटत नाही कि हा ड्रायव्हर कुठे धडक मारणार नाही. लोक बोलतांना म्हणतात कि अहो ! काय सांगावे सध्या असा जमाना आलाय कि कोणावर विश्वास ठेवावा कि नाही हेच समजत नाही. त्याच वेळी दुसरा म्हणतो कि, ‘अहो ! विश्वासराव गेले पानिपतमध्ये.’ कोणावरही विश्वास ठेवू नये. पण विश्वासाशिवाय तुमच्या जीवनाला तसा काही अर्थ राहत नाही. परमार्थामध्ये सुद्धा विश्वस महत्वाचा असतो. जगण्याकरीता जेवढी श्वासाची गरज असते तेवढीच गरज परमार्थात विश्वासाची असते. जगद्गुरू श्री तुकाराम त्यांच्या एका अभंगामध्ये सांगतात, ‘भाविक विश्वासी पार उतरले त्यासी ेतुका म्हणे नासी’ कुतक्यार्चे कपाळी’ किंवा भाविक विश्वासी ‘तुका म्हणे नमन त्यासी’, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता’ संतांचिये पायी हा माझा विश्वास सर्वभावे दास झालो त्यांचा’ असे अनेक प्रमाणे देता येतील. तात्पर्य जीवनामध्ये विश्वस महत्वाचा आहे. अध्यात्मातील पहिली पायरी विश्वास आहे. कारण तुमचा विश्वास नसेल तर काहीही उपयोग नाही. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही व ज्ञान हे संतांच्याकडे असते व ज्यांच्याकडून ते ज्ञान घ्यायचे त्यांच्यावर प्रथम विश्वास असणे गरजेचे आहे. कुतर्क काही उपयोगाचा नसतो. श्री तुकाराम महाराज सांगतात, ‘ताकीर्काचा टाका संग’ पांडुरंग स्मराहो तार्किक माणसाची संगती करू नका, कारण त्याचा कोठेच विश्वास नसतो व तर्काची शास्त्रात अप्रतिष्ठा सांगितलेली आहे. याचा अर्थ असा नाही कि कोठेही डोळे झाकून विश्वास ठेवायचा, विश्वास हा सुद्धा डोळस असावा. एक सुभाषितकार म्हणतात, नदीनांच नाखीनांच शृंगीनाम शस्त्रपाणीनाम’ ‘विश्वासो नैव कर्तव्य स्त्रीषु राजकुलेषु’ नदी,नखाचे प्राणी,शिंगाचे प्राणी, शस्त्र बाळगणारा, स्त्री, राजकुल म्हणजे राजकारणी लोक यांच्यावर अतिविश्वास ठेवू नये. केव्हाही विश्वासघात होऊ शकतो. मित्रांवर सुद्धा अति विश्वास कामाचा नाही कारण कधीकधी तुमच्या नाशाला मित्रच कारणीभूत होऊ शकतो. जुलियस सीझरला त्याचा मित्र ब्रुटस यानेच धोका दिला व संपवला. फितुरी हि जवळच्या माणसाकडून होत असते. म्हणून डोळे झाकून विश्वास कोठेही ठेवू नये. दुर्जनाच्या गोड बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नये, ‘दुर्जन:प्रियवादिती नैतद्विश्वास कारणम’ ‘मधु तिष्ठते जिव्हाग्रे हृदये तु हलाहलम’ काही लोक बोलतांना मोठे मधुर बोलतात पण त्यांचा कावा कळत नाही. आप्त स्वकीय यांच्यावरही विश्वास ठेवू नये कारण ‘सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी’ इतकेच नाही तर, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी’ अंती जासील एकाला प्राण्या माझे माझे म्हणोनी’ म्हणून अगदी बायको मुलांवर सुद्धा विश्वास ठेवू नये. जोपर्यंत तुमच्याजवळ काही धन दौलत आहे तोपर्यंतच हे लोक तुम्हाला प्रेम देतील तुमच्याजवळचे वैभव संपले कि मग हे सुद्धा तुम्हाला सोडून देतात असा अनुभव सुद्धा येतो. धनाचा भरवसा धरता येत नाही कारण धन सुद्धा चंचल आहे त्याच्या मागे भागवतामध्ये चौदा अनर्थ सांगितले आहेत. अर्थस्य पुरुषो दासो े हे खरे आहे पण हाच अर्थ कधीही अनर्थ होऊ शकतो.
अगदी आपला जो देह आहे त्याचा सुद्धा विश्वास धरता येत नाही कारण, ‘देह आधी काय खरा’ देह्संबंधी पसारा’ बुजगावणे चोरा’ ‘रक्षणसे भासतसे’ देह सुद्धा खरा नाही कारण हा देह बालपणचा तरुण होतो. तरुणपणीचा देह वृध्द होतो व एक दिवस मृत्यू पावतो तेव्हा देहाचा सुद्धा भरवसा धरता येत नाही. मदालसा आपल्या पुत्राला उपदेश करतांना म्हणत , ‘या देहाचा भरवसा पुत्रा न धरावा ऐसा’ पंचमहाभूतांचा देह हा उसना आणलेला आहे तो परत द्यावा लागणार आहे.
संत हेच जगात असे आहेत कि त्यांच्यावर ठेवलेला विश्वास हा सार्थ असतो कारण त्यांना तुमच्याकडून काहीही नको असते. ऐसी कळवळयाची जाती’ करी लाभाविण प्रीती. त्यांच्यावर ठेवलेला विश्वास हा सार्थ असतो म्हणून भागवतामध्ये म्हटले आहे. विश्वासो गुरुवक्येषु स्वस्मिन दिनत्व भावना’श्रीगुरुंच्या वाक्यावर विश्वास ठेवून त्यांच्यापुढे दिन होऊन त्यांची सेवा करावी म्हणजे मग ते आपल्या उद्धाराचा मार्ग दाखवतील. त्यांचे वाक्य महत्वाचे आहे ते म्हणजे ‘हे जीवा तु ब्रह्म आहेस , तत्वमसि’ याच गुरुवाक्याने जीवाला ब्रह्मत्व प्राप्त होते. माउली सुद्धा ज्ञानेश्वरीत ४ थ्या अध्यायात ३४ व्या श्लोकवर भाष्य करतंना म्हणतात , ‘ते ज्ञान पै गा बरवे’ ‘जरी मनी आथी आणावे’ तरी संता या भजावे े सर्वस्वेसी’ म्हणून जीवनात विश्वासाचे अत्यंत महत्वाचे स्थान आहे पण तो विश्वास नेमका कोठे ठेवावा हे जर आपल्याला समजले तर निश्चित मानवी जीवन सुजलाम सुफलाम होईल यात शंका नाही.
भागावाताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले
गुरुकुल भागावाताश्रम , चिचोंडी(पाटील) ता. नगर
मोबाईल :-९४२२२२०६०३