वासनेच्या ज्वालामुखीने प्रेमातील उदात्तपणा संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 03:13 PM2019-09-21T15:13:21+5:302019-09-21T15:14:42+5:30

आज आपण ज्याला प्रेम म्हणतो, ते प्रेम नसतेच. तो असतो वासनेचा ज्वालामुखी.

The volcano of lust ends the sublimity of love | वासनेच्या ज्वालामुखीने प्रेमातील उदात्तपणा संपला

वासनेच्या ज्वालामुखीने प्रेमातील उदात्तपणा संपला

googlenewsNext

- हभप भरतबुवा रामदासी बीड 

आचार्य रजनीशांचे एक सुंदर वचन आहे. आचार्य म्हणतात, 
‘प्रेम खोजनेकी कला नही है, प्रेम खोने की कला है! प्रेम जिने की कला नही है, प्रेम मरणे की कला है! प्रेम लेन नही है, प्रेम देन है! प्रेम माँग नही है, प्रेम दान है! प्रेम भिक नही है, प्रेम तो स्वयं का समर्पण है. .....!’
शुद्ध प्रेमाचे हे चिंतन वाचल्यावर असे वाटते की, या बाजारू जगात निष्काम प्रेम करणारे सापडतील का. .? असा प्रेमातला उदात्तपणा आज खरंच हरवला आहे का. ? प्रेम कधी शब्दातून व्यक्त केले जात नाही. प्रेम एक दिव्य अनुभूती आहे. ती शब्दातीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात,
प्रेम नये सांगता बोलता दाविता !
अनुभव चित्ता चित्त जाणे!!

आईचे निष्काम, निरागस प्रेम कोणत्या मापाने मोजणार ..? एक मुलगा डॉक्टर आहे. भरपूर पैसा मिळवतो. गावात मान, मरातब, प्रतिष्ठा आहे. म्हणून आई त्याच्यावर खूप प्रेम करते का. .? व दुसरा मुलगा सेवक आहे. निर्धन आहे. म्हणून आई त्याला लाथाडते का. ? सज्जनहो. .! मुलगा कसाही असला तरी आईच्या प्रेमात तिळमात्र फरक नसतो. 
तुकोबा म्हणतात, ऐसी कळवळ्याची जाती!करी लाभाविन प्रीती!!
आज मानवी जीवनातल्या परस्पर संबंधातील प्रेमाचा उदात्तपणा संपत चालला आहे. आज दिसते ते फक्त उथळ व बेगडी प्रेम. आज आपण ज्याला प्रेम म्हणतो, ते प्रेम नसतेच. तो असतो वासनेचा ज्वालामुखी. प्रेम तर खूप नितळ असते. आज शरीराच्या आकर्षणालाच लोक प्रेम म्हणतात.
आज पतीने मनासारखी साडी घेतली नाही म्हणून पतीपासून घटस्फोट घेणारी पत्नी वर्तमान काळात दिसत आहे. याला प्रेम म्हणणार का. .? वडीलांनी मौज मजा करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून वडीलांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून करणारा मुलगा आजच्या वर्तमान काळात दिसतो, याला प्रेम म्हणणार का. .? सज्जनहो. ..! वासनेने आंधळे झालेले प्रेम हे प्रेम नसतेच. असे प्रेम हे प्रेमाची यात्रा नसते ती वासनेची जत्रा असते. आज कथा, कादंबरी व चित्रपटात दाखवणारे प्रेम हे बेगडी असते. कारण. ...
प्रेमाला ठावे देणे, देण्यातच हरवून जाणे! 
प्रेम यज्ञी पूर्णाहूती कर्त्याने संपून जाणे!!

व्यवहारातले गणित असे असते, जो स्वत:ला वाचविल तो वाचेल व जो स्वत:ला संपवील तो संपेल. प्रेमाचे गणित या उलट आहे. प्रेमाच्या राज्यात जो जो संपून जायला तयार असतो तोच वाचतो व जो स्वत:ला वाचवू पाहतो, तो संपून जातो. कारण प्रेमाला ठावे देणे. ..!

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्र. 8329878467 )

Web Title: The volcano of lust ends the sublimity of love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.