वारी : व्यापक विचारांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 01:38 PM2019-07-09T13:38:43+5:302019-07-09T13:38:48+5:30

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील आशयाप्रमाणे वारकरी भाविकांचा संत वचनावर नितांत विश्वास आहे.

Wari: Tradition of comprehensive ideas | वारी : व्यापक विचारांची परंपरा

वारी : व्यापक विचारांची परंपरा

Next


संताचिये पायी हा, माझा विश्वास
सर्वभावे दास, झालो त्यांचा
संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील आशयाप्रमाणे वारकरी भाविकांचा संत वचनावर नितांत विश्वास आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपानकाकांच्या पालखीचा अनोखा संगम सासवडमध्ये पाहायला मिळतो. सासवडमध्ये संत सोपानकाका यांच्या पालखीचे प्रस्थान होते. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी संतांचे स्थान आहे, त्या ठिकाणावरुन त्या त्या संतांची पालखी प्रस्थान करते. त्यामुळे आषाढी वारीत मानाच्या पालख्यांचा सन्मान केला जातो. श्रीक्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी निघते. श्रीक्षेत्र पैठण येथून संत एकनाथ महाराजांची पालखी निघते. श्रीक्षेत्र मेहून येथून संत मुक्ताबार्इंची पालखी निघते. शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी निघते. अशा अनेक ठिकाणांवरून पालख्या वारीनिमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या सर्व पालख्यांचे स्वागत पंढरपूर येथे केले जाते. वारकरी संप्रदायामध्ये हे वेगळेपण आहे की, संत कोणत्याही जातीतील असो किंवा पंथातील असो त्यांचा समावेश वारकरी संप्रदायामध्ये आहे हे आपल्याला पाहायला मिळते. वारकरी संप्रदायामध्ये वारकरी ही एकच जात पाहिली जाते. त्यामुळेच वारकरी परंपरेमध्ये स्त्री-पुरुष, जात-पात, वर्ण-आश्रम, धर्म-पंथ पाहिले जात नाही. विश्वामध्ये व्यापक विचार मांडणारा केवळ एकमेव वारकरी संप्रदाय आहे.
हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर
किंबहुना चराचर, आपण जाहलो
या संत वचनाप्रमाणे वारकरी परंपरा व्यापक पाहायला मिळते. कारण या पालखी सोहळ्यामध्ये स्त्री-पुरुष सर्वजण एकत्रित पद्धतीने फुगडी खेळणे आणि पाऊले खेळणे असे विविध प्रकार वारीमध्ये चालत असताना पाहायला मिळतात. भेदभावरहित होऊन समन्वयाने भजन, कीर्तन करत ही सर्व मंडळी पंढरपूरकडे चालत येतात. वारी कालावधीमध्ये चालत असणाऱ्या भाविकांच्या मनात सात्विक भाव असतो. प्रत्येकजण एकाच विचारांमध्ये चालू राहतो की, मला माझ्या पांडुरंगाला भेटायचे आहे. या विचारांमध्ये चालत असताना आपण संत ज्ञानेश्वर माऊलींबरोबर म्हणजेच एका महान संतांबरोबर चालत आहोत याचे समाधान असते. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये आत्मिक समाधान प्राप्त झाल्याचे त्यांच्या चेहºयावरून ओसंडत असते. वैचारिक आणि श्रद्धायुक्त प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये फक्त वारकरी संप्रदायामध्ये पाहावयास मिळतो. कारण श्रद्धाची विशिष्ट उंची व बौद्धिक उंची पालखी सोहळ्यांमध्ये चालत असताना पाहावयास मिळते. त्यामुळे वारकरी भाविकांना पालखी सोहळ्यासाठी कोणत्याही प्रकारचे आमंत्रण द्यावे लागत नाही. लौकिक उपचाराची अपेक्षा न ठेवता वारकरी भाविक सोहळ्यामध्ये सहभागी होतात. हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे.

- सुधाकर इंगळे महाराज

Web Title: Wari: Tradition of comprehensive ideas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.