अनुसरणाच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 05:26 AM2019-12-17T05:26:32+5:302019-12-17T05:26:34+5:30
प्रत्येक शब्दाला स्वत:चा अर्थ असतो. समानार्थी शब्द नसतातच असं काही विद्वानांचं मत आहे. ज्या त्या शब्दाला वेगळी अर्थछटा असते. ...
प्रत्येक शब्दाला स्वत:चा अर्थ असतो. समानार्थी शब्द नसतातच असं काही विद्वानांचं मत आहे. ज्या त्या शब्दाला वेगळी अर्थछटा असते. श्रीचक्रधर स्वामी कधी उत्स्फूर्त तर कधी प्रसंंगानुसार सूत्राचं निरुपण करीत असत. ते सूत्रात अचूक शब्दांंचा प्रयोग करीत असत.
शब्दात सामर्थ्य असतंं, हे त्यांनी मान्यच केलंं आहे. शब्दाला जसा अर्थ असतो, तसा चुकीच्या शब्दाने अनर्थही होतो. म्हणूनच तर संत तुकोबा शब्दांत रत्नांचं मूल्य, शस्त्राची धार, देवाचं देवत्व व पूजा पाहिली. शब्दसमुद्र अफाट आहे. त्यात काही शिंंपल्यासारखे आहेत, काही मोत्यासमान, काही अमृतासारखे तर काही विषारीही असतात. तसाच अनुसरण हा शब्द अमृतासारखा अद्वितीय आहे. सरण, म्हणजे जाणे. अनु उपसर्ग लागल्याने अनुसरण म्हणजे मागे जाणे असा त्याचा अर्थ होतो. कुणाच्या मागे? सदाचाराच्या मागे जाणे. संस्काराला अनुसरणे. रस्ते व प्रवासी अनेक असतात. ते सगळेच अनुसरलेले असतात असंं नाही. त्यातले बरेच निसटणारे असतात. अनुसरणात निष्ठा असते. स्वामींनी अनुसर शब्द मोकळा सोडला नाही. ते म्हणतात, ‘येथं अधीन होईजे यथौनि म्हणीतले ते किजे ते अनुसरण’ अधीन होणे ही पहिली अट आहे. जसंं सांंगितलं तसंं करणं ही दुसरी अट आहे. त्यात पूर्ण समर्पणाचा भाव असावा. सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी त्यात देवापुढे केलेलं स्वत:चंं विसर्जन आहे. बीज स्वत:चं अस्तित्व मातीत मिटवून नवा जन्म घेतंं असतं, ते नव्या पिढ्या घडवतं. आईच्या काखेत बाळ असतंंं ते परतंंत्र नाही. ते सुरक्षाकवचात सुरक्षित असतं.
इथंं परतंत्र शब्दाचा अर्थ परक्याचंंं तंंत्र असा नसून पर म्हणजे परमेश्वर, त्याचंं तंंत्र असा आहे. दिव्य विचाराची पूर्णता व शुद्ध आचाराची निपुणता यालाच अनुसरण म्हणतात. अनुकरण आंंंधळं, तर अनुसरणाला डोळे असतात. लोकांंंनी नावे ठेवू नये म्हणून करणे हे अनुकरण आहे. त्याची गाडी लोकांच्या उताराने चालत असते. त्यात लोकांचा आग्रह असतो.
बा.भो. शास्त्री